अनंतची गझल

उर्दूतली तरलता, हिंदीच्या दुष्यंतकुमाराची सरलता आणि आपल्या गझलेला असलेला आपला स्वतःचा चेहरा हे अनंतच्या गझलेची वैशिष्ट्ये आहेत... ... ती संयतही आहे आणि हळूच भाष्य करणारीही. समाज, प्रेम, दुःख, उत्सव साऱ्यांनी ती युक्त आहे.

मराठी गझलविश्वात आपले वेगळेपण सिद्ध करणाऱ्या गझलकारांपैकी डॉ. अनंत ढवळे हा एक तरुण गझलकार आहे. समृद्ध उर्दू गझलपरंपरचे भान त्याला आहे. मराठीसह उर्दूतूनही तो सातत्यपूर्ण लिखाण करतो. उर्दू अवगत असल्याने शायर बशर नवाज, काझी सलीम यांच्या रचनांचे देवनागरीत लिप्यंतरणाचेही काम त्याने केलेले आहे. काझी सलीम यांच्या 'मिसफीट' या कवितेचा त्याने केलेला ओघवता अनुवाद त्याच्याही प्रतिभेचा सहज झलक दाखवून जातो. मीर तकी 'मीर' सारख्या मोठ्या शायराच्या प्रेमापोटी त्याने त्यांचा अल्पपरिचय, गझलांचे संपादित केलेले 'मीर' हे पुस्तक मराठीत आल्यानंत मीर अनेकांना जवळचा वाटू लागला हेही तितकेच खरे.

उर्दूतली तरलता, हिंदीच्या दुष्यंतकुमाराची सरलता आणि आपल्या गझलेला असलेला आपला स्वतःचा चेहरा हे अनंतच्या गझलेची वैशिष्ट्ये आहेत. अनंतचा 'मूक अरण्यातली पानगळ' हा गझलसंग्रह साक्षात प्रकाशन या संस्थेने प्रकाशित केलेला आहे.


 त्यापूर्वी अनंतच्या गझला 'कवितारती', 'साक्षात', 'कुसुमाकर', 'किस्त्रीम' आदी साहित्यविषयक नियतकालिकांमधून प्रकाशित झालेल्या होत्या. मराठी गझलेत हमखास समोर येणारी अन्याय झाल्याची भावना, द्वेष अशा प्रचलित बाबींपासून अनंतची गझल दूर आहे. ती संयतही आहे आणि हळूच भाष्य करणारीही. समाज, प्रेम, दुःख, उत्सव साऱ्यांनी ती युक्त आहे. वैविध्यपूर्ण आहे, शब्दोत्सवही तिच्यात आहे. खरेतर केवळ मानवी भाव-भावनांपुरत्या असलेल्या गझलेत निसर्ग, समाज, समकालीन वास्तव अनंतने उतरविले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या अलीकडे वाढल्या असल्या तरी अनंतनं चार-पाच वर्षांपूर्वी या विषयाची दाहकता पाहिली होती.


पिके वाळलेली उभी खिन्न शेते
स्मशानाहुनी भासती खिन्न शेते

कितीदा तरी सांडले रक्त आम्ही
कितीदा तरी वाळली खिन्न शेते
(मूक  अरण्यातली... पृष्ठ-३)


लोकशाहीकडून असलेल्या अपेक्षा अजूनही पुऱ्या झालेल्या नाहीत. पाण्याचे प्रश्न, हुंड्यासारख्या प्रथा अजूनही समाजात आहे. याचे सूचक वर्णन तो करतो. अनंत लिहितो...


गणतंत्राची अशी विलक्षण वरात होती
नाल्यामधुनी भयाण गरिबी वहात होती

पाण्यावरुनी भांडत होत्या काही बाया
भेदरलेली पोरे दुरुनी पाहत पहात होती

लटकुन मेला तीन मुलींचा बाप बिचारा
दोन उजवल्या एक पोरगी घरात होती...

काय म्हणावे परिस्थितीच्या तफावतीला
कुठे उन्हाच्या झळा, कुठे चांदरात होती...
(मूक  अरण्यातली... पृष्ठ-४)


स्वातंत्र्याने पन्नाशी गाठलेली आहे. परिस्थिती मात्र भयानकच, त्यात कधीकधी संसदेत चाललेल्या निराशाजनक घडामोडी... अस्वस्थ करणारे असते.


हमरस्त्यावर सरसर पुढती चाले कोणी
आयुष्याचा गाडा ओढे, राबे कोणी...

पडावयाला आले हे घर पन्नाशीचे
बदलुन टाका याचे तुळई वासे कोणी...

रस्त्यावरचे प्रश्न अम्ही सोडवून घेतो
अरे! थांबवा संसदेतले राडे कोणी....
(मूक  अरण्यातली... पृष्ठ-१५)


जीवनाचे सार्थक केवळ लौकिकापुरते मर्यादित ठेवणे हे संवेदनशील मनाला मंजूर नसतेच. समाज, चांगल्या-वाईटांविषयीही विचार केला गेला पाहिजे.


जागतो कोण चांदण्यासाठी
जागतो याद काढण्यासाठी...

जोडुनी हात सांगणे आले
हात नसतात तोडण्यासाठी...

जन्म कवियासा लाभला दैवे
शब्द लोकांस वाटण्यासाठी...
(मूक  अरण्यातली... पृष्ठ-२१)


याशिवाय,


काय मिळाले सांग तुला
गरिबाचे पेटवुनी घर...

भरपाईची भीक नको
जखमांवर घाला फुंकर
(मूक  अरण्यातली... पृष्ठ-२२)


जीवनाच्या या प्रवासात मागे वळून पाहताना आपले अस्तित्व, समाजाविषयीच्या कृतज्ञता या साऱ्यांचा विचार मनात येतो...


कसे सांगू तुला मी स्थान माझे
कथेच्या शेवटाचे पान माझे

अरे! मी साधनेतच मग्न होतो
कुणी सांभाळले उद्यान माझे...
(मूक  अरण्यातली... पृष्ठ-४०)


'मूक अरण्यातली पानगळ' हा वैविध्यपूर्ण आशय आणि अनंतच्या प्रतिभासौंदर्याने नटलेला गझलसंग्रह आहे. जो परंपरेसह वेगळेपणाची साक्ष वाचक, रसिकांना देतो.


संजय कुलकर्णी
sanjey_gazal@rediffmail.com

('दैनिक गावकरी'मधून साभार)प्रतिसाद

अभिनंदन...अनंतराव.
अशीच प्रगती करीत राहा...तुमच्या गझलांवर वृत्तपत्रांमधून आणखी लेख प्रसिद्ध होवोत, ही शुभेच्छा.

मनःपूर्वक अभिनंदन!!

तुमचे अनंतराव!
तुमच्या गझला इथे एकत्रित वाचायला मिळतील का? 

संग्रहाच्या प्रकाशनाबद्दल अभिनंदन!

लेख आवडला

पुस्तक येऊन दोनेक वर्षं झालीत ...!!

सर्वांचे आभार...

चांगल्या कवी/कविता संग्रहाची दखल उशीरा घेतली जाणे नवीन नाही...

Excellent! I liked the 'SHERs' that are given above in the information page.
Wish you all the success Mr Anant. Hope to meet you somewhere.
KITIDA TARI SANDALE RAKTA AAMHI...WAH!
 
 

अनंत,
हा लेख आणि तुमच्या गझल-संग्रहाबद्दल फार उशिराच वाचलं.... अभिनंदन!!!!
प्रस्तावनेतले 'खिन्न शेते' ही रदीफ असलेले शेर फार आवडले.
- कुमार

प्रिय अनन्त, तुझ्या गझला खुप छान अहेत. तुझ्यातल्या सहित्यिकाला प्रनाम. यु आर सुपर्ब ....
चीयर्स