...शून्य माझी कलमकारी !!

.....................................
...शून्य माझी कलमकारी !!
.....................................


`मित्र ` एखादा मला भेटेल कोठे समविचारी ?
जो कधी करणार नाही काजव्याची मिनतवारी !


मी तुला आनंद देतो, तू मला थोडे हसू दे...
जीवनाचे नाव आहे हीच, असली उसनवारी !


ज्या सुखांसाठी जिवाची लावली मी काल बाजी...
आज येऊ लागली का त्या सुखांची मज शिसारी ?


ते शहाण्याची कराया लागले आहेत व्याख्या..
...दोन वेड्यांची कधीची चालली ही मगजमारी !!


हा उन्हाचा एवढा तुकडाच का शालीन झाला ?
कोण येथे चांदणे उधळून गेले भरदुपारी ?


बोल, अधिकारात कुठल्या दूषणे देशी मला तू ?
बोल, तू केलीस का माझी कधीही तरफदारी ?


दर्शनी भागात शोभेच्या फुलांना बहर आला
...पण जुई फुललीच नाही एकदाही परसदारी !


राबतो सारेच आयुष्या तुझ्या संस्थेत आम्ही...
नोकरी ही श्वास घेण्याची...फुकाची, बिनपगारी !!


एकही अश्रू कुणाचा जर न मी पुसला कधीही...
व्यर्थ ही कविताच माझी ! शून्य माझी कलमकारी !!


- प्रदीप कुलकर्णी

गझल: 

प्रतिसाद

चांदणे उधळून गेले, उसनवारी, मक्ता हे शेर फार आवडले.
मगजमारी चा शेर विशेष उल्लेखनीय!:)
 गझल आवडली हे ही आलेच!

हा उन्हाचा एवढा तुकडाच का शालीन झाला ?...
काय सुंदर उला-मिसरा आहे !!
 

क्या बात है प्रदिपजी...!!!
शेवट फारच सुन्दर झालाय......!

शिसारी, उसनवारी, चांदणे आणि कलमकारी हे शेर फार फार आवडले!

वाचता ही गझल,माझे शब्द करती तरफदारी
रोख आहे दाद माझी ,ना इथे चाले उधारी

ते शहाण्याची कराया लागले आहेत व्याख्या..
...दोन वेड्यांची कधीची चालली ही मगजमारी !!


खासच


हा उन्हाचा एवढा तुकडाच का शालीन झाला ?
कोण येथे चांदणे उधळून गेले भरदुपारी ?

खास शेर प्रदीप!

एकही अश्रू कुणाचा जर न मी पुसला कधीही...
व्यर्थ ही कविताच माझी ! शून्य माझी कलमकारी !!

लाजवाब! माझ्यामते आदर्श शेर!

 

हा उन्हाचा एवढा तुकडाच का शालीन झाला ?
कोण येथे चांदणे उधळून गेले भरदुपारी ?
अतिशय सुरेख. विशेषतः वरची ओळ फारच सुरेख. नेहमीप्रमाणे चांगली कसलेली गझल.

गझल खूप आवडली.
- चक्रपाणि जीवन चिटणीस

प्रदीपजी,
नेहमीप्रमाणेच बावनकशी सोनं, !
प्रत्येक शेर चिंतनीय. 
मराठी कवितेच्या अभ्यासक्रमात आपल्या गझला लावायला हरकत नाही.   

हा उन्हाचा एवढा तुकडाच का शालीन झाला ?

जो कधी करणार नाही काजव्याची मिनतवारी !
व्यर्थ ही कविताच माझी ! शून्य माझी कलमकारी !!
नोकरी ही श्वास घेण्याची...फुकाची, बिनपगारी !!
Excellent!. I liked these SHERs. Rest of them are again like Mr Bhat's Gazal.
नोकरी ही श्वास घेण्याची...फुकाची, बिनपगारी !!   SUPERB.