...शांत समईसारखा !

...............................
...शांत समईसारखा !
...............................


वाट माझी संपता, येतील मागे मग किती ?
जीव देणारे जिवाला राहिले जिवलग किती ?


कैद मी भोगून आलो कैक वर्षांची जणू...
- आणि हे बदलून गेले भोवतीचे जग किती !


झुंज माझ्याशीच माझी चाललेली हारलो...
शेवटी मीही तसा धरणार होतो तग किती ?


वागणे आता मला झाले कळेनासे तुझे...
यायची घाई किती अन् जायची लगबग किती !


पाहिजे तितकी न खुलली रातराणीची कळी...
लागली आहे तिला या चांदण्याची धग किती !


नेहमीच्या त्याच त्या टाळ्या, हंशे ते, ते बघ्ये...
नेहमीचा तोच तो वठवायचा मी वग किती ?


चार डोळ्यांतून गेला शेवटी बरसून तो...
दाटले होते अबोल्याचे मनांवर ढग किती !


भेटण्यासाठी मला तू एकदा ये...एकदा... !
या जिवाची आणखी तडफड किती ? तगमग किती ?


कोण जाणे कोणते घेऊन ओझे मी जगे....
काळजाला लागली आहे कधीची रग किती !


तू असा भ्रमतोस का ? श्रमतोस का ? वेड्या मना...
ही कुणासाठी ? कशासाठी तुझी दगदग ? किती ?


आशयाची ही शिदोरी नीट ने सांभाळुनी....
व्यर्थ शब्दांचे तुझ्या वाटेवरी हे ठग किती !


एकदा तेवून बघ तू शांत समईसारखा...
चालली आहे तुझी ही सारखी झगमग किती !


- प्रदीप कुलकर्णी



 

गझल: 

प्रतिसाद

प्रदीपजी, अप्रतिम गझल आहे!
मतला, लगबग, धग, दगदग हे शेर मस्त! समई शेर तर अगदी सव्वाशेर आहे!!

प्रदीप, तुमच्या गझलेतला प्रत्येक शेर मस्त॓! आहे
जायची घाई, रातराणीची कळी आणि चार डोळ्यांचे हे तीन विशेष !
सोनाली
 

"जीव देणारे जिवाला राहिले जिवलग किती ?"
वा! अत्यंत सुरेख गझल झाली आहे. सगळेच शेर फार आवडले. पण

कैद मी भोगून आलो कैक वर्षांची जणू...
- आणि हे बदलून गेले भोवतीचे जग किती !
क्या बात है!!
झुंज माझ्याशीच माझी चाललेली हारलो...
शेवटी मीही तसा धरणार होतो तग किती ?
क्या बात है!!

हे शेर कायम लक्षात राहतील.

झाली आहे गझल.
झगमग नि लगबग फारच आवडले.

कैद मी भोगून आलो कैक वर्षांची जणू...
- आणि हे बदलून गेले भोवतीचे जग किती !

व्वा !!!!

प्रदीपजी,क्या बात है.
चार डोळ्यांतून गेला शेवटी बरसून तो...
दाटले होते अबोल्याचे मनांवर ढग किती !

आशयाची ही शिदोरी नीट ने सांभाळुनी....
व्यर्थ शब्दांचे तुझ्या वाटेवरी हे ठग किती !

एकदा तेवून बघ तू शांत समईसारखा...
चालली आहे तुझी ही सारखी झगमग किती !  वाहव्वा

खरतर सर्वच शेर छान आहेत.

 

आशयाची ही शिदोरी नीट ने सांभाळुनी....
व्यर्थ शब्दांचे तुझ्या वाटेवरी हे  ठग किती !
--- द्रुष्ट लागावी असा शेर!जियो.


जयन्ता५२

खरेच, खूपच सुन्दर.

प्रदीपजी,
तुमच्या गझलमधून मिळणार्‍या आनंदाचं वर्णन करण्यासाठी नवनवीन शब्द सापडणं हेही कठीण वाटतं कारण तो आनंद अवर्णनीयच आहे. तसंच त्या काव्यासाठी प्रशंसेचे शब्द सापडणंही! खूपच छान! लगबग, रातराणी, वेड्या मना, आशयाची शिदोरी -शब्दांचे ढग, कैद, समई...एकाहून एक बहारदार शेर आहेत.
-सतीश

सगळे शेर खणखणीत. सुरेख गझल. ( चित्तरंजन यांच्या फेबु वॉलवर मिळाली... धन्यवाद चित्तरंजन )

भन्नाट....

वा! क्या बात है!

नि:शब्द !