...थकलास तू किती !

............................................
...थकलास तू किती !
............................................


आलो तुझ्यासमोर ! दचकलास तू किती !
मी तूच ! व्यर्थ दूर सरकलास तू किती !


आहे तुझ्याच आसपास...जे तुला हवे....
शोधात दूर दूर भटकलास तू किती !


नव्हतेच जे कधीच...सापडेल  ते कसे ?
साराच भूतकाळ उचकलास तू किती !


आहे तुझ्या मनात चांदणे खरेच का ?
ही सावली तुझीच...टरकलास तू किती !


नाही तुझी तुलाच थोरवी कळायची...
गर्दीस त्या सुमार खटकलास तू किती !


मी सांगताच -  `राग हा न, आग आग ही... `
हे ऐकलेस मात्र भडकलास तू किती !


मन मोकळे करून टाकलेस तू म्हणे....
जग मात्र हे म्हणेल- `बहकलास तू किती !`


बोलावणार कोण यापुढे तुला तिथे ?
त्या काजव्यांसमोर चमकलास तू किती !


तुज वाटले असेल - चिकटणार मी तुला...
तो प्रश्न लागलीच झटकलास तू किती !


गुंत्यास घाबरून राहिलास एकटा...
या मोकळेपणात अडकलास तू किती !


चालून वाट संपवून टाक तू तुझी...
थांबून राहिलास व थकलास तू किती !!



- प्रदीप कुलकर्णी

गझल: 

प्रतिसाद

आहे तुझ्या मनात चांदणे खरेच का ?
ही सावली तुझीच...टरकलास तू किती
वा..वा..
मन मोकळे करून टाकलेस तू म्हणे....
जग मात्र हे म्हणेल- `बहकलास तू किती !
छान्..मस्त.
गुंत्यास घाबरून राहिलास एकटा...
या मोकळेपणात अडकलास तू किती !
क्या बात है!
 
हे शेर भिडले अगदी!
 
पूर्ण गझल आवडली.
प्रदीपराव,आमची अभिरुची घडते आहे की काय नकळे?

बहकलास, झटकलास आणि थकलास हे शेर विशेष आवडले!!

चालून वाट संपवून टाक तू तुझी...
थांबून राहिलास व थकलास तू किती !!
सुंदर...
 

वा~ प्रदीप. गझल नेहमीप्रमाणेच. चांगली. खालील शेर विशेष आवडले :

आलो तुझ्यासमोर ! दचकलास तू किती !
मी तूच ! व्यर्थ दूर सरकलास तू किती !

आहे तुझ्याच आसपास...जे तुला हवे....
शोधात दूर दूर भटकलास तू किती !
तुज वाटले असेल - चिकटणार मी तुला...
तो प्रश्न लागलीच झटकलास तू किती !

चालून वाट संपवून टाक तू तुझी...
थांबून राहिलास व थकलास तू किती !!