...टाळतो

रोजचा छळवाद आता टाळतो
मी तुझी ती याद आता टाळतो

पाहिजे आहे मनाला शांतता
एवढाही वाद आता टाळतो

मूळ भाषेची खुमारी आगळी
वाचणे अनुवाद आता टाळतो

सोडले लिहिणे गझल केव्हाच मी
मानभावी दाद आता टाळतो

साद स्वप्नांनी कितीही घातली
मी तरी प्रतिसाद आता टाळतो

हा पहा मृत्यूसवे मी चाललो..
जीवनाची ब्याद आता टाळतो

      दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा..!

गझल: 

प्रतिसाद

छान साफसाफ, सफाईदार गझल.

मूळ भाषेची खुमारी आगळी
वाचणे अनुवाद आता टाळतो
हा शेर विशेष.

केदार, गझल आवडली. आणि अनुवाद शेर मस्तच!

मूळ भाषेची खुमारी आगळी
वाचणे अनुवाद आता टाळतो  .....
...

सुंदर शेर !!

साधीसोपी, प्रवाही गझल. सगळेच शेर सहज, आवडले. मतला, वाद सगळ्यात जास्त आवडले.
- चक्रपाणि जीवन चिटणीस

गझलबांधणीतील, ओळींतील सफाई अतिशय प्रशंसनीय आहे. मूळ भाषेची खुमारी आगळी |वाचणे अनुवाद आता टाळतो|| ही द्विपदी छान आहे. पण परखडपणे सांगायचे झाल्यास एकंदर ही गझल  ५ सपाट विधानांची मालिका वाटते.

धन्यवाद सर्वांंना ...प्रतिसादाबद्दल.


पाहिजे आहे मनाला शांतता
एवढाही वाद आता टाळतो
वा...वा...

मूळ भाषेची खुमारी आगळी
वाचणे अनुवाद आता टाळतो
सुंदर...

सोडले लिहिणे गझल केव्हाच मी
मानभावी दाद आता टाळतो
छान...

साद स्वप्नांनी कितीही घातली
मी तरी प्रतिसाद आता टाळतो
मस्तच...
शुभेच्छा, केदार. लिहीत राहा. आपल्या हाती एवढेच असते !!!

सोडले लिहिणे गझल केव्हाच मी
मानभावी दाद आता टाळतो... वा
-मानस६

केदार,
छान लिहतोस तू!अनुवाद्चा शेर , मक्ता लक्षणीय

जयन्ता५२

धन्यवाद सर्वांना...

मस्त, टाळता आले तर सोप्प झाल आस्त

गझलबांधणीतील, ओळींतील सफाई अतिशय प्रशंसनीय आहे. मूळ भाषेची खुमारी आगळी |वाचणे अनुवाद आता टाळतो|| ही द्विपदी छान आहे. पण परखडपणे सांगायचे झाल्यास एकंदर ही गझल  ५ सपाट विधानांची मालिका वाटते. - परखड

मि. परखड,
         परखडपणे आपण आतापर्यंत खूपकाही सांगितले. समजलेही.  आता जरा तुम्हीदेखील व्यक्त व्हा.  तुमचा नुस्ता काथ्याकूट बघून  "कुणाचा गुरुजी व्हायच्या आधी गुरुजींना देखील काही येतं का ?" हे जानून घ्यायची आता या मराठी रसिकाची ईच्छा होतेयं.
                   तेव्हा लोकांना शिकवण्याआधी काही जमतं का बघा !

साद स्वप्नांनी कितीही घातली
मी तरी प्रतिसाद आता टाळतो...

त्या नंतरची अस्वस्थता घेऊन कलाकारच जगू  शकतो...

परखड मते असावीत पण बिन्बुडाची असू नयेत...

वाह केदार! सहजता ही या गझलेची खास बात.
[प्रतिसाद संपादित -विश्वस्त]

निळ्या रंगातील शेर नवा.

समीक्षा:
रोजचा छळवाद आता टाळतो
मी तुझी ती याद आता टाळतो
छान शेर! पण तसा अर्थाने साधाच. हा मुद्दा सांगताना खूप नवीन मांडणी आवश्यक आहे.

पाहिजे आहे मनाला शांतता
एवढाही वाद आता टाळतो
सुंदर.

मूळ भाषेची खुमारी आगळी
वाचणे अनुवाद आता टाळतो
खरंय. जो स्वतःच कवी आहे त्याला तर स्वतःच्या भाषेचे प्रेम फारच असते.

सोडले लिहिणे गझल केव्हाच मी
मानभावी दाद आता टाळतो
व्वा! फार सुंदर!  यात एक व्यथा आहे पण शायराला त्याच्या काव्यप्रवासात येणार्‍या काही स्थितींचे वर्णनही आहे. सुंदर शेर!

साद स्वप्नांनी कितीही घातली
मी तरी प्रतिसाद आता टाळतो
परत साध्या अर्थाचा शेर. पण तरीही चांगला, सहज गुणगुणण्यासारखा!

हा पहा मृत्यूसवे मी चाललो..
जीवनाची ब्याद आता टाळतो

परत साध्या अर्थाचा शेर. हा विचार अगणित वेळा गझलेत येऊन गेला आहे.काहीतरी वेगळे पाहिजे.
एकंदर गझल छान! सोपी, गाता येण्यासारखी, लक्षात राहण्यासारखी!
१०० पैकी ४६

नवा शेर मस्तच आहे केदार सर,
अगदी  'हासिल्-ए-गझल' की काय म्हणतात, तसा !

मानभावी म्हणजे काय ते माहितीय का? ऑ? मानभावी म्हणजे सगळे करूनसवरून न केल्यासारखे वागणे किंवा दाखवणे. काहीतरी खोडी किंवा गुन्हा किंवा चूक करून वगैरे.
दाद मानभावी म्हणजे काय रे? ऑ?
म्हणजे दाद न देऊन दाद दिल्यासारखे दाखवणे का? का देऊन न दिल्यासारखे दाखवणे? काय अर्थ काय मानभावी दाद चा?
घेतला वृत्तातला एक शब्द अन टाकला गझलेत!
फसवणारी
कोरडीशी
त्रास होतो
कितीतरी पर्याय आहेत की?
 

गझल छानच आहे. साद्-प्रतिसाद आवडले...अभिनंदन....
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

नवा शेर...
प्रेमओली झोपडी चालेलही
---कोरडे प्रासाद आता टाळतो