लाव्हा

वरवर जगास आता मी शांतच भासत असतो
पण हृदयातिल ह्या लाव्हा नेहमी उफाळत असतो

आपुलकी नसते पाण्याची तलावामध्ये डुंबणार्‍याला
प्रेम तयाचे पाण्यावर, जो काठावरुनी पाहत असतो

कसे कळावे त्या पिल्लाला, "राजहंस मी बदक नव्हे"
पाण्याचा ह्या गढुळ आरसा चित्र वेगळे दावत असतो

नसेल बोलायचे तुला तर, नको बोलु, पण हास जरा
तुझ्याच हास्यातून, उन्हातहि, चांदणेच मी झेलत असतो

प्रेमातूनच जन्मा यावे, प्रेमाने ओथंबुन जावे
प्रेमच केवळ बरसविणारा मेघ हेच तर सांगत असतो

कधी सकाळी टीव्हीवरती वासुदेव गाताना दिसतो
देत उजाळा जुन्या स्मृतींना मीहि नव्याने गुंगत असतो

येतात किती! बसतात किती! उठतात किती! जातात किती!
बागेमधला बाक लाकडी शांतपणे हे साहत असतो

स्वातंत्र्य मिळाले? कोणाला पण? कशास आणिक ?
गांधीजींचा उघडा पुतळा उन्हामध्ये तर तळपत असतो

गझल: 

प्रतिसाद

कसे कळावे त्या पिल्लाला, "राजहंस मी बदक नव्हे"
पाण्याचा ह्या गढुळ आरसा चित्र वेगळे दावत असतो
वा...वा...
कधी सकाळी टीव्हीवरती वासुदेव गाताना दिसतो
देत उजाळा जुन्या स्मृतींना मीहि नव्याने गुंगत असतो
फारच छान...
 
येतात किती! बसतात किती! उठतात किती! जातात किती!
बागेमधला बाक लाकडी शांतपणे हे साहत असतो
अप्रतिम...
स्वातंत्र्य मिळाले? कोणाला पण? कशास आणिक ?
गांधीजींचा उघडा पुतळा उन्हामध्ये तर तळपत असतो
छान....
 
अमोघ,
तुझ्या या गझलेत चांगलाच जोर  आहे... जोरदार गझल.  वेगळ्या, अभिनव कल्पना चांगल्या मांडल्या आहेस. पण  अक्षरगण वृत्तातही  आवर्जून लिहीत जा.  मात्रावृतात सारखे सारखे लिहिण्याचा  एक धोका असतो...कवी शब्दखोर बनण्याचा !  हा धोका टाळून तुला लिहिता आले तर उत्तमच.  मनापासून शुभेच्छा. लिहीत राहा....

येतात किती! बसतात किती! उठतात किती! जातात किती!
बागेमधला बाक लाकडी शांतपणे हे साहत असतो
फार वेगळा आणि मस्त शेर आहे! राजहंसाचा शेरही विशेष आवडला.

तुझ्या या गझलेत चांगलाच जोर  आहे... जोरदार गझल.  वेगळ्या, अभिनव कल्पना चांगल्या मांडल्या आहेस.
ह्या प्रदीप कुलकर्णी ह्यांच्या म्हणण्याशी सहमत आहे.

२, ५, ७, ८ - हे शेर खूप सुंदर झालेत.