...दिसत नाही !

...दिसत नाही !

चीडही दिसेना कोठे; राग दिसत नाही !
पेटल्यां मनांची आता आग दिसत नाही !

तेज याज्ञसेनीचे तू आज शोधशी का ?
आज यज्ञ नाही कोठे...याग दिसत नाही !

पाठलाग माझा आता मी कसा करावा ?
मज अजून माझा येथे माग दिसत नाही !

खूण दंशल्याची देते डागण्या मनाला...
शोध घेउनीही कोठे नाग दिसत नाही !

जे नकोच; त्याचे केले दान मी जगाला...
-पण कुणास माझा हाही त्याग दिसत नाही !!

ही दुपार...टाकू कोठे अंग सावलीला ?
आसपास एखादीही बाग दिसत नाही !

ऐकलेच नाही माझे शिंकणे कुणी का ?
माध्यमांत बोभाटा वा गाग दिसत नाही !!

वेगळा मुखवटा त्याने घातला असावा...
आजकाल चंद्रावर तो डाग दिसत नाही !

तेवढीच  पाने कोणी फाडलीत  माझी ?
या कथेत माझा कोठे भाग दिसत नाही !

हे खरेच, डोळे आता उघडले तुझेही...!
- पण अजून तुज आलेली जाग दिसत नाही !!

- प्रदीप कुलकर्णी

गझल: 

प्रतिसाद

ही दुपार...टाकू कोठे अंग सावलीला ?
....

तेवढीच  पाने कोणी फाडलीत  माझी ?
या कथेत माझा कोठे भाग दिसत नाही !
वाव्वा!!

हे खरेच, डोळे आता उघडले तुझेही...!
- पण अजून तुज आलेली जाग दिसत नाही !!
वाव्वा!!


पाठलाग माझा आता मी कसा करावा ?
मज अजून माझा येथे माग दिसत नाही !

 वेगळा मुखवटा त्याने घातला असावा...
आजकाल चंद्रावर तो डाग दिसत नाही !

तेवढीच  पाने कोणी फाडलीत  माझी ?
या कथेत माझा कोठे भाग दिसत नाही !    
हे शेर विशेष आवडले.

जे नकोच; त्याचे केले दान मी जगाला...
-पण कुणास माझा हाही त्याग दिसत नाही !!
हा शेर विशेष आवडला.