मला मनाचे पटले नाही

मला मनाचे पटले नाही
वाद आमचे मिटले  नाही


मला नेहमी ऐकू येते
मनातही जे म्हटले नाही


राग तुला याचाच असावा
नाव तुझे पुटपुटले नाही


मला भेटल्या जखमा सुंदर
कुणात मन गुरफटले नाही?


अभिलाषेचे वादळ आले
पाय काधी लटपटले नाही


फक्त ठेवले नावा पुरते
नाते मी विस्कटले नाही


शब्द आणले उधार थोडे
दुःख तरी पण नटले नाही


तुझे एवढे कर्ज उरावर
 या श्वासांनी फिटले नाही


नको नकोसे जगणे झाले
पाश तरी पण तुटले नाही


तुझ्या पाहिले डोळ्यांमध्ये
व्यसन कधी मग सुटले नाही


अनिरुद्ध अभ्यंकर

गझल: 

प्रतिसाद

शब्द आणले उधार थोडे
दुःख तरी पण नटले नाही
तुझे एवढे कर्ज उरावर
 या श्वासांनी फिटले नाही
हे शेर छान आले आहेत. 'नावापुरते नाते' आणि 'व्यसन' ही आवडले.
मतला, 'अभिलाषेचे वादळ', 'पाश' या शेरांमधे 'नाही' हे 'नाहीत' असं बहुवचनी असायला हवं असं वाटलं.
चू. भू. दे. घे.
-सतीश

जखमा, नाते, कर्ज, शब्द, व्यसन - शेर फार आवडले! "नाहीत" बद्दल सतीशशी सहमत.

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी)अनिरुद्ध अभ्यंकर

व्यसन शेर डेडली. बाकी ठीक.

छोटे वृत्त सांभाळून लिहिणे तसे कठीणच असते. तरी छान.

पण यातील ...

वाद आमचे मिटले  नाही
पाय काधी लटपटले नाही

पाश तरी पण तुटले नाही

वाद आमचे, पाय ... लटपटले, पाश तुटले हे अनेकवचनी आहे. तर नाही असे योग्य वाटत नाही. चुभूद्याघ्या.

आवडली गझल.

राग तुला याचाच असावा! मस्त शेर आवडला.