मी अहल्येसारखी... !
.........................................
मी अहल्येसारखी...!
.........................................
शेवटी गेलास ना निखळून तू ?
जायचे ना जग जरा उजळून तू !
आंच दुःखाची जराशी लागता...
का असा जातोस रे वितळून तू ?
वेळ भरतीची तुझ्या समजेचना...
ये अवेळी आजही उसळून तू !
संपलो मी ! वैर माझे संपले...
जा फुले माझ्यावरी उधळून तू !
दुःख झाले कोणते इतके तुला ?
हासशी सर्वांग का घुसळून तू ?
काळजाला सल पुन्हा काट्यापरी...
...आणि मग डोळ्यांत जा तरळून तू !
फेकली कोणी तळाशी पौर्णिमा ?
काढ अंधारास या ढवळून तू !
ही कुठे काया ? अरे, छायाच ही !
एवढा गेलास का हुरळून तू !!
चारचौघांसारखा आहेस ना ?
चारचौघांच्यात जा मिसळून तू !!
शब्द तू एकेक हा घासून घे...
अर्थही एकेक घे विसळून तू !!
मी अहल्येसारखी आहे शिळा...!
एकदा जाशील का जवळून तू ?
- प्रदीप कुलकर्णी
प्रतिसाद
पुलस्ति
बुध, 23/04/2008 - 23:54
Permalink
क्या बात है!!
फुले, दु:ख, सल, काया, शब्द आणि अहिल्या - फार आवडले!!
अर्थही एकेक घे विसळून तू - अप्रतिम मिसरा!!
सोनाली जोशी
गुरु, 24/04/2008 - 01:10
Permalink
वा!
मस्त गझल फार आवडली
चारचौघांसारखा आहेस ना ?
चारचौघांच्यात जा मिसळून तू !!
शब्द तू एकेक हा घासून घे...
अर्थही एकेक घे विसळून तू !!
मी अहल्येसारखी आहे शिळा...!
एकदा जाशील का जवळून तू ?
हे तीन शेर तर खासच!
नचिकेत
गुरु, 24/04/2008 - 09:30
Permalink
सहमत
अगदी असेच म्हणायचे आहे. अभिनंदन!!
मनीषा साधू
गुरु, 24/04/2008 - 16:35
Permalink
अरे! जबरदस्त!
वाह प्रदीपदा!
खुप चांगले शेर...
सतीश
शुक्र, 25/04/2008 - 10:43
Permalink
वा! वा!
शेवटी गेलास ना निखळून तू ?
जायचे ना जग जरा उजळून तू !
आंच दुःखाची जराशी लागता...
का असा जातोस रे वितळून तू ?
वेळ भरतीची तुझ्या समजेचना...
ये अवेळी आजही उसळून तू !
काळजाला सल पुन्हा काट्यापरी...
...आणि मग डोळ्यांत जा तरळून तू !
ही कुठे काया ? अरे, छायाच ही !
एवढा गेलास का हुरळून तू !!
मी अहल्येसारखी आहे शिळा...!
एकदा जाशील का जवळून तू ?
प्रदीप कुलकर्णी आणि उत्तम गजल हे माझ्यासाठी समानार्थी झालं आहे. तुमच्या शेरातली सहजता आणि कल्पनांची समृद्धता याबद्दल काय म्हणावं - हे आपल्याला एका मिसर्यात तरी साधावं असं नेहमीच वाटतं. विशेष उल्लेख केल्याशिवाय राहावलं नाही म्हणून काही शेर वर उल्लेखिले इतकंच. खरं तर सर्वच गझल अप्रतिम आहे. 'काया - छाया' तर फारच!
-सतीश
पुलस्ति
शुक्र, 25/04/2008 - 16:20
Permalink
अगदी
मनातलं बोललात सतीश!
जयन्ता५२
शुक्र, 25/04/2008 - 16:38
Permalink
ताकदीची गझल
ही कुठे काया ? अरे, छायाच ही !
एवढा गेलास का हुरळून तू !!
---- प्रदीप! ताकदीची गझल! केवळ अप्रतिम.
जयन्ता५२
प्रदीप कुलकर्णी
शुक्र, 25/04/2008 - 22:24
Permalink
मनापासून आभार.
पुलस्ती, सोनाली, नचिकेत, मनीषा, सतीश, जयंतराव...
प्रतिसादाबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद.
चित्तरंजन भट
रवि, 04/05/2008 - 20:55
Permalink
मस्त!
मी अहल्येसारखी आहे शिळा...!
एकदा जाशील का जवळून तू ?
सुरेख!!!!
ही कुठे काया ? अरे, छायाच ही !
एवढा गेलास का हुरळून तू !!
वा!! क्या बात है! एकंदर मस्त गझल!