जाग आली


आटुनी गेले जिव्हाळे,जाग आली
कातडीवर आळ आले,जाग आली ।


वास्तवाशी तह नव्याने काल केला
आणि पुन्हा युद्ध झाले,जाग आली ।


का नव्याने शोधिली कृष्णात भक्ती
का मिरेचे विष प्याले,जाग आली ।


वाटले मज तू कुणी नाही निराळा
पण तुझे सारे निराळे! जाग आली ।


भावनेच्या मखमली गुंगीत जाता
स्वप्न कासावीस झाले,जाग आली ।


आठवानी खरवडे जखमा पुराण्या
तरुण सारे घाव झाले,जाग आली ।


मी तुला माझ्यातुनी 'चल जा!'म्हणाले,
आणि माझे प्रेत झाले! जाग आली ।


गझल: 

प्रतिसाद

टुनी गेले जिव्हाळे,जाग आली
कातडीवर आळ आले,जाग आली ।
ओहो...अतिशय वेगळी, धीट कल्पना. अभिनंदन.
वाटले मज तू कुणी नाही निराळा
पण तुझे सारे निराळे! जाग आली ।
अ प्र ति म. 
मी तुला माझ्यातुनी 'चल जा!'म्हणाले,
आणि माझे प्रेत झाले! जाग आली ।
वा...वा...वा...
........................................
कल्पना छानच आहेत. मंत्र जमलाय ;  आता  थोडे तंत्र राहिले आहे बाकी, तेही लवकरच जमो तुम्हाला.  शुभेच्छा.  अशाच कसदार गझला येऊ द्या आणखी....प्रतीक्षेत.
 

रचना.
जिव्हाळे आटणे, तरुण घाव, कासावीस स्वप्ने... वा...

  'जाग आली' ही गझल अतिशय अतिशय आवडली. अगदी वेगळी आहे. ताज्या दमाची आहे. अभिनंदन. पुढील गझलेसाठी शुभेच्छा!!

प्रदीपदांशी सहमत.... थोडे तांत्रिकीकरण जमले की अतिउत्तम होईल.
खूप खूप शुभेच्छा :)
 

मनीषा
खूप सुंदर
मी तुला माझ्यातुनी 'चल जा!'म्हणाले,
आणि माझे प्रेत झाले! जाग आली ।    हासिले गझल ... वा... 
किरण

गझल फार आवडली!!

वाटले मज तू कुणी नाही निराळा
पण तुझे सारे निराळे! जाग आली ।
मनिषा, सर्वच कल्पना मस्त आहेत. वर उल्लेख केलेला शेर तर खूपच छान

धन्यवाद !
तुम्हा सगळ्यांच्या प्रेरणेने मी गझल लिहायला,
व मुख्य म्हणजे इथे पाठवायला सुरवात केलिय.
तुमच्या सगळ्या सुचना मोकळेपणाने येउ द्या.
मझ्यात कही सुधारणा दिसल्यास त्याही सांगा.