"हिशोब"


कर्जाचे अन कर्जमाफीचे ओघ ठेवले.
दान दिले पण परताव्याचे योग ठेवले.


पाणी आता साधन झाले लढण्यासाठी,
पिण्यास बाकी पेप्सी आणि कोक ठेवले.


दर रविवारी संस्कृतिरक्षण पुरले नाही.
रोज पार्वती अन तुलसीचे "सोप" ठेवले.


विचार मांडायाला त्यांनी दिली मुभा पण,
छातीवरती तलवारीचे टोक ठेवले.


देवा तुजला नवसाचा बघ चेक फाडला.
गार्‍हाणे मी मात्र आपुले "रोख" ठेवले.


चित्रगुप्तही मला म्हणाला कमाल झाली.
हिशोब होते मीही ऐसे "चोख" ठेवले..!


--   अभिजीत दाते

गझल: 

प्रतिसाद

गझल छान आहे....
आवडली...
अभिनंदन अभि...
पु.ले.शू.


अमित वाघ

पत्ता: ''गुरुमंदिर'', सुधीर कॉलनी. अकोला- ४४४००१.
मो. क्र. ९९२१६११६११; ९८५०२३९८८२.
ब्लॉग:
www.gazalnavihotanna.blogspot.com
www.gajalnahihotito.blogspot.com

विचार मांडायाला त्यांनी दिली मुभा पण,
छातीवरती तलवारीचे टोक ठेवलेवा, मस्त!!!! पेप्सी आणि कोकची द्विपदीही. एकंदर रचना फार आवडली. अकारान्त स्वरयमके बहुधा उर्दूतही चालत नाहीत, असे वाटते. तसेच टॉपिकल शेर (जसे तुलसीचा सोप) कालांतराने कालबाह्य होण्याचा धोका असतो असे माझे मत आहे. त्यामुळे टाळावेत असे मला वाटते.

विचार मांडायाला त्यांनी दिली मुभा पण,
छातीवरती तलवारीचे टोक ठेवले
सुंदर....
 
चित्रगुप्तही मला म्हणाला कमाल झाली.
हिशोब होते मीही ऐसे "चोख" ठेवले..!
या शेरातून साध्य काहीच होत नाही.  टाळीघेऊ शेर आहे हा !
गांभीर्याने गझललेखन करू इच्छिणाऱ्यांनी  अशा शेरांचा मोह  टाळल्यास स्वतः गझलकाराची आणि पर्यायाने गझलेचीही वाड्मयीन उंची वाढेल, किमान तिचा ठुसकेपणा कमी होईल...! 
स्वरयमकांबाबत आणि प्रासंगिक शेराबाबत चित्तरंजन भट यांच्याशी सहमत.