बाग
प्रेमात आग आहे.
जळणेच भाग आहे.
शापीत चंद्र झाला...
इवलाच डाग आहे
मागा खुशाल गर्दी;
शांती महाग आहे.
स्वप्नास खूप चिंता...
झोपेस जाग आहे.
नाही भिती विषाची
पाळीव नाग आहे.
झालेत खून येथे;
गुपचूप बाग आहे!
-अभिशेक उदावंत
संवेदना रायटर्स कंम्बाईन, अकोला.
मो. नं. ९९२२६४६०४४
गझल:
प्रतिसाद
प्रमोद हरदास
मंगळ, 19/02/2008 - 14:18
Permalink
सुरेख
छान रचना आहे.... फार आवडली....
मानस६
मंगळ, 19/02/2008 - 21:41
Permalink
स्वप्नास खूप चिंता...
स्वप्नास खूप चिंता...
झोपेस जाग आहे.... वा अतिशय सुंदर!
-मानस६
चक्रपाणि
गुरु, 21/02/2008 - 01:06
Permalink
सुंदर
सुंदर गझल आहे.
मागा खुशाल गर्दी;
शांती महाग आहे.
स्वप्नास खूप चिंता...
झोपेस जाग आहे.
हे विशेष आवडले.
- चक्रपाणि जीवन चिटणीस
धोंडोपंत
गुरु, 21/02/2008 - 16:58
Permalink
सुंदर
सुंदर ग़ज़ल. अप्रतिम. वृत्त मस्त हाताळलाय तुम्ही.
इतक्या लहान वजनात आशय पोहोचवणे कठीण असते. पण सर्व शेर व्यवस्थित झालेत. कुठेही कल्पना अर्धवट राहिल्याचे जाणवले नाही.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
आपला,
(रसिक) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
अभिषेक उदावंत
गुरु, 20/03/2008 - 19:55
Permalink
आभार.....
अभिप्राय कळविल्याबद्द्ल आपणा सर्वाचे आभार.....
असाच स्न्नेह ठेवावा. धन्यवाद.....!
अनंत ढवळे
शनि, 22/03/2008 - 18:44
Permalink
नव्या जाणिवा अपेक्षित
गझल छान आहे,पण ताज्या दमाच्या कविंकडून काहीतरी अधिक अपेक्षित आहे.जीवनाच्या अफाट समुद्रात उतरायचे की यार्-प्यार ,मोगरे ,जखमा करत बसायचे याचा निर्णय नव्या पिढीने स्वत:च घ्यावा.
अभिषेक उदावंत
बुध, 26/03/2008 - 19:36
Permalink
'एकदम धावत सुटाव ही अपेक्षा करणे कुठ्वर योग्य आहे ?'
ढ्वळे साहेब प्रथम आपले आभार.....!
नविन पिढी आत्ता कुठे रांगायला शिकली आहे. त्यांनी एकदम धावत सुटाव ही अपेक्षा करणे कुठ्वर योग्य आहे? हं नविन पिढी धावेलही पण त्यांना थोडा वेळ द्या .जीवनाच्या अफाट समुद्रात उतरायचे की यार्-प्यार ,मोगरे ,जखमा करत बसायचे याचा निर्णय नव्या पिढीने स्वत:च घ्यावा. ---( मान्य)आपल्या मताशी सहमत चु. भू.मा.
अनंत ढवळे
शनि, 29/03/2008 - 09:40
Permalink
धावाधाव?
धावाधाव ? मी नव्या जाणिवांचा उल्लेख केला होता.असो.आपल्या लिखाणास माझ्या हार्दिक शुभेच्छा !
अभिषेक उदावंत
रवि, 30/03/2008 - 18:26
Permalink
खंत ...
या गझल साईडवर ''तू मला सांभाळ आता, मी तुला सांभाळतो'' अशीच काही गुळ्गुळीत चालणारी बरीचशी पोकळ चर्चा वाचून वाईट वाट्ते . या गझल साईडवर दमदार आणि अर्थपूर्ण गझलां उपेक्षीत राहतात असे मला जाणवले जसे - प्रा. श्रीकृष्ण राउत याच्या या खालील गझलेवर कुणीच प्रतिसाद देऊ नये याचे नवल वाट्ते. चु. भू.मा.
कशी वेळ आली?
क्षमा क्रूर झाली
हसे आज कुंकू;
गमावून लाली.
करा बंद वर्षा;
पिके तर जळाली.
बगीच्यात प्रेते
फुलांची मिळाली.
बघा ही गटारे;
सुगंधात न्हाली.
खुनी देव झाले;
पुजारी मवाली!
परखड
सोम, 31/03/2008 - 11:31
Permalink
परखडपणे सांगायचे झाल्यास
परखडपणे सांगायचे झाल्यास मुळात कल्पनाच तुटपुंजी असते किंवा ती चांगली असली तरी तिचा विस्तार करण्याची ताकद कवीत नसते म्हणून कवी मोठी वृत्ते टाळत असावीत. खुनी देव झाले, पुजारी मवाली.. वाचले!! बातमी कळाली. नवे काय आणि पुढे काय? वरील गजलेतला२,३,४ शेर छान.
अभिषेक उदावंत
गुरु, 03/04/2008 - 19:53
Permalink
आपला विचार महत्वाचा....
परखड----
परखडपणे सांगायचे हेच परखडपणे सांगितले हेच खुप झाले.कल्पना आणि अर्थ मोठा असला तरी आपण त्याचा तुटपुंजाच विचार करतो. राहीला प्रश्न " मुळात कल्पनाच तुटपुंजी असते किंवा ती चांगली असली तरी तिचा विस्तार करण्याची ताकद कवीत नसते म्हणून कवी मोठी वृत्ते टाळत असण्याचा " - तर जर मोठा आशय दोन ओळीत किंवा दोन शब्दात स्पष्ट होत असल्यास त्यावर निबंध लिहण्याची काय गरज? वृत्ते छोटी असो वा मोठी शेवटी त्यातील आशय महत्वाचा असतो.
परखड
शुक्र, 04/04/2008 - 19:59
Permalink
मोठ्या वृत्तात लिहून दाखवा
"मोठा आशय दोन ओळीत किंवा दोन शब्दात स्पष्ट होत असल्यास त्यावर निबंध
लिहण्याची काय गरज? वृत्ते छोटी असो वा मोठी शेवटी त्यातील आशय महत्वाचा
असतो."
अभिशेक वरील छापील वाक्यं ठीक आहेत. तुम्ही जरा मोठ्या वृत्तात लिहून दाखवा बरं. पटलं तर घ्या. नाही तर राहू द्या.
अभिषेक उदावंत
शनि, 05/04/2008 - 19:33
Permalink
'अभिशेक
'अभिशेक वरील छापील वाक्यं ठीक आहेत. तुम्ही जरा मोठ्या वृत्तात लिहून दाखवा बरं.'' परखड मला या आपल्या विधानाचे आश्चर्य वाटले , आपला मोठ्या वृत्ताबद्द्ल एवढा आग्रह का हेच मला अजुनपर्यत कळलेलं नाही मी याआधीच स्पष्ट केले की, वृत्ते छोटी असो वा मोठी शेवटी त्यातील आशय महत्वाचा असतो."पण तरी तुमच्या समाधानासाठी माझी ही मोठ्या वृत्तातील गझल---
लढाई
जिंकण्याची एवढी केली तयारी
हारणे झाले मला मग खूप भारी
का विठोबा पावला नाही मला तू
सोडली नाही तुझी मी एक वारी
पाखरांची शेवटी रे हार झाली
माणसांनी घेतली जेंव्हा भरारी
आजही आकाश बघ तेथेच आहे
ये जरा तू चार भिंतीतून दारी
साप जेव्हा विष विकाया लागले मग
तेवढे ते राहिले नाही विषारी
एकदा जवळून बघ जळ्ती चिता तू
शेवटी ही आग नसते संपणारी
जिंकला तू ज्या भरोशावर लढाया
ती तुला झाली अता तलवार भारी
- अभिषेक उदावंत
संवेदना रायटर्स कम्बाईन, अकोला
परखड
रवि, 06/04/2008 - 02:37
Permalink
जे टाकाऊ ते टाकाऊच
का विठोबा पावला नाही मला तू
सोडली नाही तुझी मी एक वारी
या शेरातला अर्धा शेर सोडल्यास बाकी शेर शेर बराए शेर आहेती, संदिग्ध आहेत. वाइट वाटल पण किरकोळ आहेत. किंबहुना तुम्हाला काय सिद्ध करायचं ते कळलं नाही. जे टाकाऊ ते टाकाऊच.
अभिषेक उदावंत
रवि, 06/04/2008 - 13:16
Permalink
तुम्हाला काय सिद्ध करायचं ..,
''या शेरातला अर्धा शेर सोडल्यास बाकी शेर शेर बराए शेर आहेती, संदिग्ध आहेत. वाइट वाटल पण किरकोळ आहेत.'' परखड ,आपले हे विधान समजले नाही किंबहुना तुम्हाला काय सिद्ध करायचं ते मला पण कळ्लेलं नाही . जे टाकाऊ त्याचा आपण फारसा विचार करु नये.