तुझ्यामुळे...
मीपण माझे क्षणात विरले, तुझ्यामुळे
तुझे हासणे, जणु कमळाचे हळूच खुलणे
पाहुनिया ते भ्रमरहि फसले, तुझ्यामुळे
तुझे बोलणे, खुदकन हसणे, हळू लाजणे
जग हे किति मज सुंदर दिसले, तुझ्यामुळे
दवबिंदूंचे अळवावरच्या मोती झाले
वेलीवरती फूल उमलले, तुझ्यामुळे
चंद्र उगवला पुनवेचा तो आकाशी, पण
आज चांदणे पिठूर पडले, तुझ्यामुळे
मदनाचे जरी प्रेम रतीवर जिवापाड ते
हृदय तरी त्याचे धडधडले, तुझ्यामुळे
चातक होउन किती किती मी वाट पाहिली
प्रेमरूप हे मेघ बरसले, तुझ्यामुळे
पडली होती अबोल माझी इथे लेखणी
तिला अचानक बोल लाभले, तुझामुळे
साथ मिळाली तुझी नि मजला मार्ग गवसला
सोनेरी आयुष्य जाहले, तुझ्यामुळे
गझल:
प्रतिसाद
अनंत ढवळे
शनि, 22/03/2008 - 18:52
Permalink
अपेक्षित
आपण मतल्यात सुट घेतलेली दिसते.असो.माझ्या मते आपली गझल छान आहे,पण ताज्या दमाच्या कविंकडून काहीतरी अधिक अपेक्षित आहे.जीवनाच्या अफाट समुद्रात उतरायचे की यार्-प्यार ,मोगरे ,जखमा करत बसायचे याचा निर्णय नव्या पिढीने स्वत:च घ्यावा.
मधुघट
मंगळ, 25/03/2008 - 20:35
Permalink
धन्यवाद
सूचनेबद्दल आभारी आहे.
चित्तरंजन भट
सोम, 24/03/2008 - 20:07
Permalink
छान!
अमोघ, गझल छान आहे. तुम्ही फार कमी वेळात गझलेचे तंत्र आत्मसात केल्यासारखे वाटते आहे. शब्दक्रमावर जरा लक्ष द्या. उदा: अळवावरच्या दवबिंदूंचे मोती झाले हे जास्त योग्य वाटते.
लिहीत रहा आणि विचारपूर्वक लिहीत रहा. लिहिता लिहिता तुम्हाला तुमचे ईप्सित मिळेल.