खर्डेघाशी
दिवसांवर दिवसांच्या राशी
जीवन म्हणजे खर्डेघाशी
फोडासम ज़पलेले शैशव
खपली धरते तळहाताशी
तुझ्या बटांशी खेळुन जावे,
वार्याची इतकी बदमाशी?
बांधू जेथे घरटे आपण
तिथेच मथुरा,तिथेच काशी
भुकेल्यांस भाकरी नसे, अन्
खाणारे खाऊन उपाशी
तुझ्याविना जगण्याची शिक्षा
हीच का मरेस्तोवर फाशी?
जरी वादळे येती ज़ाती
लाटांना भिडतात खलाशी
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
गुरु, 21/02/2008 - 10:58
Permalink
वा!
छोट्या मात्रावृत्ताच्या मर्यादा आहेत. पण सगळेच शेर एकंदर छान झाले आहेत. फोडासम जपलेले शैशव ही ओळ फार आवडली. पण शेर काही पुरता समजला नाही.
शुभेच्छा!
मिल्या
गुरु, 21/02/2008 - 12:51
Permalink
आवडली
मतला, घरटे, फाशी खूप आवडले.
तळहातावरच्या फोडाचा वापरही आवडला..
चक्रपाणि
गुरु, 21/02/2008 - 13:46
Permalink
थोडा प्रयत्न करतो
बालपण, बालपणीच्या आठवणी, दंगामस्ती इ. फोडासारख्या जपल्या = खोडकरपणे वागलो, तारुण्यसुलभ वयातही लहान पोरासारखे वागलो इ. फोड फुटू नये (बालपण हरवू नये) म्हणून असे वागून ते जपत आलो. पण आता तसे वागता येत नाही. पोक्तपणे, व्यवहाराने, वयपरत्त्वे वागाबोलावे लागते. (म्हणजे फोड फुटला) आता राहिल्यात त्या त्या बालपणीच्या आठवणी(खपली)
असा काहीसा अर्थ अभिप्रेत आहे. पोचत नसल्यास काही सुधारणा करता येईल का, याबद्दल काही सुचवण्या असतील तर जरूर कळवावे.
- चक्रपाणि जीवन चिटणीस
धोंडोपंत
गुरु, 21/02/2008 - 16:53
Permalink
झकास
वा चक्रपाणि,
झकास ग़ज़ल. सहजसुंदर. मजा आली.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
आपला,
(संतुष्ट) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
डॉ.श्रीकृष्ण राऊत (not verified)
गुरु, 21/02/2008 - 22:48
Permalink
मनात झिरपत जाणवणारी काव्यात्मकता
फोडासम ज़पलेले शैशव
खपली धरते तळहाताशी.
शेर आवडला.अभिनंदन.
शेर मनात रेंगाळत- रेंगाळत, उलगडत-समजत जातो.
त्यात न समजण्यासारखं काय आहे? हे मात्र समजलं नाही.
उलट `अभिप्रेत अर्थ' समजावून सांगण्यात आपण शेरातल्या शब्दांतून मनात झिरपत जाणवणारी काव्यात्मकता घालवतो. असे वाटत नाही का?
- डॉ.श्रीकृष्ण राऊत
चित्तरंजन भट
शुक्र, 22/02/2008 - 00:24
Permalink
नक्कीच
त्यात न समजण्यासारखं काय आहे? हे मात्र समजलं नाही.
मला काय वाटले ते मी ('खपली धरणे'चा अर्थ वगैरे, वगैरे वगैरे) चक्रपाणी ह्यांना दिलेल्या उपप्रतिसादात दिले आहे. त्यावर तुमचे मत जाणून घ्यावेसे वाटते.
उलट `अभिप्रेत अर्थ' समजावून सांगण्यात आपण शेरातल्या शब्दांतून मनात झिरपत त्यात न समजण्यासारखं काय आहे? हे मात्र समजलं नाही.जाणवणारी काव्यात्मकता घालवतो. असे वाटत नाही का?
नक्कीच. पण एकदा आस्वाद घेऊन झाल्यावर ह्या गझलकारांच्या मंचावर थोडी (थोडीच :) ) वस्तुनिष्ठपणे चर्चा झाल्यास उत्तमच, असे मला वाटते.
चित्तरंजन भट
शुक्र, 22/02/2008 - 00:34
Permalink
'खपली धरणे' चा अर्थ
'खपली धरणे' हे जखम/फोड बरे होऊ लागल्याचे चिन्ह असते, असा माझा समज. त्यामुळे माझ्या मनात वर सुचविलेला अर्थ डोकावला असला तरी दुसरा अर्थही डोकावला.
नितीन
शुक्र, 22/02/2008 - 18:17
Permalink
माझे (ही) मत...
मला वाटते की, ज्या गोड आठवणी आहेत (बालपण, बालपणीच्या आठवणी, दंगामस्ती इ) त्यांची तुलना फोडाशी (जो की दु:खतो, त्रास देतो) केल्यामुळे चक्रपाणि यांना अभिप्रेत असलेला अर्थ वाचकांपर्यंत पोचण्यास मर्यादा येत आहेत... त्यामूळे चित्तरंजन यांच्या मताशी मी सहमत आहे.
बाकी गझल उत्तम आहे यात शंकाच नाही... :-)
चू.भू.द्या.घ्या.
डॉ.श्रीकृष्ण राऊत (not verified)
शुक्र, 22/02/2008 - 23:29
Permalink
लक्षणार्थ आणि एक साधा प्रश्न
चित्तरंजन,
'खपली धरणे' हे जखम/फोड बरे होऊ लागल्याचे चिन्ह असते, असा तुमचा समज.
तो वाच्यार्थाने बरोबर आहे.कवितेतले शब्द आशयाला वाच्यार्थाकडून लक्षणार्थाकडे नेतात.म्हणून तर-
त्यामुळे तुमच्या मनात वर सुचविलेला अर्थ डोकावला असला तरी दुसरा अर्थही डोकावला.
ह्या दोन्ही अर्थातून लक्षणार्थसूचनक्षमता ही स्थलकालसापेक्षतेने अनेकार्थ सुचवू शकते.
खूप वर्षांपूर्वी वाचलेला एक शेर सहज आठवला-
हर जख्म का मरहम मौजूद है मेरे यार के पास
बहारे फिर आयेगी और ये जख्म फिर हरे हो जायेंगे|
(जख्म या शब्दात ज या अक्षराखाली नुक्ता आहे. इथे तो मला टाईप करता आला नाही.)
यातील हरे या शब्दाने आपल्या मनात कोणता रंग उमटतो?
आता राहिला वस्तुनिष्ठ चर्चेचा मुद्दा,
खरे तर मला सुरेश भट.इन वर चर्चा तशीच अपेक्षित आहे.पण-
मुंगी उडाली आकाशी....अन् पडली तोंडघशी ! या ब्लॉगवर मिलिंदने गझलच्या चर्चेबाबत
हे का लिहिले-
गझल आणि सुबोधता - आग्रह की दुराग्रह
ही चर्चा मी खरं तर मनोगत वर मांडणार होतो. पण तिथे चालणाऱ्या तिरक्या अभिप्रायांमध्ये आणि तिरकस शेरेबाजी व कट्टाछाप टवाळकीमध्ये मूळ चर्चा बाजूला राहते, विषयांतरात लुप्त होते वा वैयक्तिक उखाळ्या-पाखाळ्यांमध्ये रुपांतरित होते. म्हणून तिला इथे, जालनिशीवर मांडायचे ठरवले.
हा प्रश्न मला सतत पडत असतो.
आणि मग सुरेश भटांचा शेर हमखास आठवतो-
एक साधा प्रश्न माझा लाख येती उत्तरे;
हे खरे की ते खरे की ते खरे की ते खरे.
-डॉ.श्रीकृष्ण राऊत
पण एकदा आस्वाद घेऊन झाल्यावर ह्या गझलकारांच्या मंचावर थोडी (थोडीच :) ) वस्तुनिष्ठपणे चर्चा झाल्यास उत्तमच, असे मला वाटते.
अमित वाघ
शनि, 23/02/2008 - 14:41
Permalink
छान.......
गझल मस्त आहे..
आणि चर्चा पण मस्तच..
चर्चेची तुलना केल्यास चर्चेत चक्रपाणि साहेबांचा वाटा (नेहमीपेक्षा) फार कमी वाटतोय... असो..
"शैशव" शेर मस्तच आहे..
"मी माझ्या मुलाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले"
या ओळीमधे मुलाने केवळ मला त्रासच दिलाय किंवा तोच त्रास आहे हे बरोबर असेल तर 'नितीन' ह्यांच्याशी सहमत..
मुळात "तळहाताच्या फोडाप्रमाणे " म्हणजे खूप सांभाळून/ जपून असा होतो..
"तुम दिल की धडकन मे रहते हो" असे म्हटल्यावर ..
समोरच्याने एकदम "दाखव" म्हणावं असं काहीसं इथे झालेलं वाटतं..
चर्चेसाठी चर्चा म्हणून खूप काही लिहिता येइल पण एवढेच पुरेसे वाटते....
" थांबणेही अघोरी कला यार हो"
गझल आवडली...
आणि...
खरच वस्तुनिष्ठपणे चर्चा झाल्यास उत्तमच, असे मला(ही) वाटते.
चक्रपाणि
शनि, 23/02/2008 - 15:55
Permalink
शेराचा अर्थ
सर्वप्रथम,
चर्चेची तुलना केल्यास चर्चेत चक्रपाणि साहेबांचा वाटा (नेहमीपेक्षा) फार कमी वाटतोय... असो..
याचे प्रयोजन कळले नाही, कारण शेराचा अर्थ (जो मला अभिप्रेत होता) तो अगोदरच स्पष्ट केला आहे. चित्तंना तो अर्थ उलगडला होता, पण त्याचबरोबर त्यांना अर्थाचा दुसराही पदर असावा, असे वाटून गेल्याने त्यांनी प्रश्न केला. एक तर (लागलीच) प्रतिसाद न देणे म्हणजे चर्चा 'न वाचणे' नव्हे; त्यासाठी इतरही बरीच कारणे असू शकतात/आहेत. आणि मला विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिल्यावर प्रतिप्रश्न न झाल्याने, माझा मुद्दा/अर्थ पटला असावा, असे मी (साहजिकच?) गृहीत धरले. सबब, दुसरा प्रतिसाद दिला नाही. असो.
राहता राहिला मुद्दा वस्तुनिष्ठ चर्चा होण्याचा, तर त्याच्याशी मी सहमत आहे. दुसरा मुद्दा होता, अर्थाच्या दृष्टीने शेराचे चर्विचरण होण्याचा, तर त्याबाबत चित्तंनी स्वतःच म्हटले आहे की अशा वस्तुनिष्ठ चर्चेची सुरुवात, त्यावर राऊत साहेबांनी व इतर वाचकांनी मांडलेली मते या सगळ्याची सुरुवात शेराचा तसेच गझलेचा आस्वाद घेतल्यानंतर झाली आहे (जे अपेक्षितच आहे/असावे) असे असताना चर्चेकरी म्हणून मी या मुद्द्यांवर मत मांडणे अपेक्षित असल्यास ते या प्रतिसादातून मांडलेच आहे. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे स्वतंत्र चर्चा सुरू करावयाची झाल्यास त्यालाही माझी ना नाही. उलट सहभागी व्हायला आवडेलच!
वेळेचे नियोजन/अभाव, दैनंदिन वेळापत्रक अशा खाजगी कारणआंव्यतिरिक्त उशीरा प्रतिसाद द्यायचे कारण हेच की गझल एक गझल म्हणून वाचली जावी, तिचा आस्वाद घेतला जावा, त्यायोगे चर्चेसाठीचे मूळ मुद्दे समोर यावेत आणि तिथून चर्चा पुढे जावी. आता मुद्दा समोर आलाच आहे, तर चर्चेस कोणाचीच ना नसावी.
- चक्रपाणि जीवन चिटणीस
विश्वस्त
सोम, 25/02/2008 - 16:30
Permalink
गझल आणि सुबोधता - आग्रह की दुराग्रह ...
गझल आणि सुबोधता - आग्रह की दुराग्रह ...हा चर्चाप्रस्ताव ह्या संकेतस्थळावर आला आहे. वरील दुव्यावर टिचकी देऊन बघावे.
चित्तरंजन भट
सोम, 25/02/2008 - 16:35
Permalink
मिलिंद ह्यांनी
मिलिंद ह्यांनी जे काही लिहिले आहे ते तसे का लिहिले आहे त्याचे उत्तर मिलिंदच देऊ शकतील आणि त्यांनीच देणे योग्य ठरेल. तुम्ही म्हणता ती चर्चा ह्या संकेतस्थळावरही झाली आहे. पुढील चर्चा तिकडे करू या.
ह बा
शनि, 05/06/2010 - 16:57
Permalink
तुझ्या बटांशी खेळुन
तुझ्या बटांशी खेळुन जावे,
वार्याची इतकी बदमाशी?
बांधू जेथे घरटे आपण
तिथेच मथुरा,तिथेच काशी
भुकेल्यांस भाकरी नसे, अन्
खाणारे खाऊन उपाशी
तीनही शेर अप्रतिम!!!
प्रणव.प्रि.प्र
शनि, 05/06/2010 - 17:13
Permalink
चक्रपाणि आज अचानक ही गझल वर
चक्रपाणि आज अचानक ही गझल वर आली. वाचनात आली
फोडासम ज़पलेले शैशव
खपली धरते तळहाताशी
फारच सुंदर व वेगळा विचार. खूप आवडला.
मस्तच व्वा व्वा
ज्ञानेश.
शनि, 05/06/2010 - 21:55
Permalink
सुंदर गझल. वाचनातून सुटली
सुंदर गझल. वाचनातून सुटली होती.
हबाच्या उत्खननामुळे सापडली. :)
'शैशव' हाच शेर मलाही फार आवडला.
ह बा
सोम, 07/06/2010 - 18:41
Permalink
सुंदर गझल. वाचनातून सुटली
सुंदर गझल. वाचनातून सुटली होती.
हबाच्या उत्खननामुळे सापडली. :)
मागील पानांवर काही अप्रतिम रचना आहेत. वेळ मिळाला की त्या सार्या खोदून काढणार आहे. ज्ञानेश जी आपण उत्खनन हा शब्द अगदी योग्य वापरलात. मला या संकेत स्थळाच्या भुतकाळाचे रेखीव अवशेष मिळताहेत, आजच्या काही उत्तम गझलकारांचा लेखन प्रवास मजेशीर आहे. त्यांच्या सुरूवातीच्या गझला आणि आजच्या गझला यांच्यातला फरक पाहीला की हसू आल्याशिवाय राहत नाही. असो. उत्खननात जे सापडेल ते वर टाकतो आहे. त्यामुळे आपणास न वाचलेली गझल वाचायला मिळाला याचा आनंद आहे.