काटाकाटी श्वासांचीही..

अवतीभवती थकलेल्यांना वाचत जातो
शब्दांना तेव्हाही वाटे, जाचत जातो

प्रत्येकाच्या अग्रावरती मीपण असते
'मी'च तरीही प्रत्येकाला डाचत जातो

जीवन म्हणजे काटाकाटी श्वासांचीही,
छातीलाही मांझा त्याचा काचत जातो

चुकवत गेलेला मृत्यूही अनुशेषासम
आयुष्याच्या काठावरती साचत जातो

मरगळलेल्या निमिषांनाही पडताळाया,
मोर उगाचच उत्साहाचा नाचत जातो

फाटत जाणारी रक्ताची नातीगोती
कोणी रक्ताच्या धाग्यांनी टाचत जातो

- प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, उदगीर

गझल: 

प्रतिसाद

सुरेख गझल!! सर्वच शेर मस्त...
मीपण, अनुशेष, नातीगोती ... वा वा!
मामुली निरीक्षण - श्वासांचीही, मृत्यूही, निमिषांनाही, छातीलाही - या शब्दांमधले "ही" जरा बुचकळ्यात टाकतात. "आणखी कशाची, आणखी कशाला" असे प्रश्न पडतात. चु.भू.द्या.घ्या.

सूक्ष्मपणे विचार केला तर कुणाला ते स्पष्टपणे भरतीचे शब्द वाटू शकता. मात्र प्रत्यक्षात ते तसे नाहीत. थोडा आग्रहाचा मात्र भाग आहे. अधिकाधिक पटवून देण्याचा भागही आहे. कुठे प्रकर्ष जाणवून देण्याचा प्रश्न आहे. उदा. श्वास ते काय ! खरे म्हणजे जगताना जाणवतही नाही की आपण श्वास घेतो आहोत (म्हणून जगतो आहोत, जिवंत आहोत). पण त्यांचीसुद्धा काटाकाटी वाटावी असे जीवन वाटायला लागते तेव्हा तो शेराचा विषय होतो. श्वास आणि छाती (धीर, संयम, हिंमत, धारिष्ट्य असा अनेक अर्थांनी) यांचा संबंध लक्षात घेता, पुन्हा ऐन छातीलाच जर श्वासरूपी (पतंगाचा !) मांझा काचायला लागला तर...
२. निमिषाची अल्पता / स्वल्पता लक्षात घ्यावी.
माझीही  चूक भूल द्यावी घ्यावी. पुनःश्च धन्यवाद.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

जीवन म्हणजे काटाकाटी श्वासांचीही,
छातीलाही मांझा त्याचा काचत जातो
वाव्वा, संतोषराव!

फाटत जाणारी रक्ताची नातीगोती
कोणी रक्ताच्या धाग्यांनी टाचत जातो
वा!

सूक्ष्मपणे विचार केला तर कुणाला ते स्पष्टपणे भरतीचे शब्द वाटू शकता. मात्र प्रत्यक्षात ते तसे नाहीत. थोडा आग्रहाचा मात्र भाग आहे. अधिकाधिक पटवून देण्याचा भागही आहे. कुठे प्रकर्ष जाणवून देण्याचा प्रश्न आहे. उदा. श्वास ते काय ! खरे म्हणजे जगताना जाणवतही नाही की आपण श्वास घेतो आहोत (म्हणून जगतो आहोत, जिवंत आहोत). पण त्यांचीसुद्धा काटाकाटी वाटावी असे जीवन वाटायला लागते तेव्हा तो शेराचा विषय होतो. श्वास आणि छाती (धीर, संयम, हिंमत, धारिष्ट्य असा अनेक अर्थांनी) यांचा संबंध लक्षात घेता, पुन्हा ऐन छातीलाच जर श्वासरूपी (पतंगाचा !) मांझा काचायला लागला तर...
२. निमिषाची अल्पता / स्वल्पता लक्षात घ्यावी.
कॄपया, कळवावे.