खरेच राणी...

खरेच राणी... कधीपासुनी गझल एकही सुचली नाही
मनातली ही माझी घुसमट तुला अजुनही कळली नाही


किती खुणावू तुला खुणेने... कुठली ही तुज खुण कळेना
किलकिलत्या पापण्यात तुझिया अजुन चांदणी हसली नाही


क्षणभरही मी, तुझ्या आठवांना या... दूर न करतो केव्हा
तुझी आठवण हलके-हलके फुलली पण... मोहरली नाही


अताशा कुठे... स्वप्नामध्ये... वावरण्या तू येते माझ्या
अजुन पुरेशी गडद निशाणी... स्वप्नांनी उमटवली नाही


पत्रातुनही तुझे हासणे... हलक्याने मी टिपून घेतो
समजुन घेतो ती भाषा, जी स्वप्नांनाच समजली नाही


एकसारखे दोघांनाही... परस्परांचे... भासच होती
खरेच राणी... किती दिसांपुन भेट आपली घडली नाही


- जनार्दन केशव म्हात्रे
२/ खलिफा निवास, गांधी नगर, जुना बेलापूर रोड,
कळवा-ठाणे ४००६०५.  भ्रमणध्वनी: ९३२३५५५६८८

गझल: 

प्रतिसाद

गझल एकही सुचली नाही , हे पण गझलमधुन सांगता ... वा वा काय कल्पना आहे..
मानलं बुवा ..

आठवण आणि निशाणी हे शेर खूप आवडले.

 

छान ! जनार्दन,

अताशा कुठे... स्वप्नामध्ये... वावरण्या तू येते माझ्या
अजुन पुरेशी गडद निशाणी... स्वप्नांनी उमटवली नाही

पत्रातुनही तुझे हासणे... हलक्याने मी टिपून घेतो
समजुन घेतो ती भाषा, जी स्वप्नांनाच समजली नाही

या ओळी आवडल्या.
अशाच गझला सुचूही देत आणि त्याबरोबर राणीही मिळू देत. ही शुभेच्छा.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०