ठेवला दडपून ज्यांनी...

ठेवला दडपून ज्यांनी नेमका इतिहास माझा
आज त्यांच्या संस्कृतीला होत आहे त्रास माझा

लाभले नाही  महाली सौख्य ज्यांच्या जीवनाला
वाटतो त्यांना सुखाचा मलमली वनवास माझा

लोक ते आता नव्याने लागले बहरावयाला
लाभला ग्रीष्मात ज्यांना श्रावणी सहवास माझा

देह माझा तडफडाया लागतो जेव्हा भुकेने
वाटते सार्‍या जगाला हा असे उपवास माझा

हे कसे स्वातंत्र्य आता लागले मजला छळाया
केवढा रमणीय होता धुंद कारावास माझा

वाढतो आहे तिथे बाजार निर्देशांक त्यांचा
घट्ट होतो भाववाढीचा इथे गळ्फास माझा

योजनेआधीच माझे गाव तंटामुक्त होते
लागला बघ योजनांनी गाव झगडायास माझा

तू नको ज्योतिष्य माझे वर्तवू आताच काही
आजही माझ्या असे हातावरी विश्वास माझा

                                    - गौरवकुमार आठवले
' प्रेरणा ' रो. हौस. क्र. २, पारिजात नगर,
लोखंडे मळा, विठ्ठल मंगल कार्यालयासमोर, जेल रोड,
नाशिक रोड, ४२२१०१ : भ्रमणध्वनी  ९४२३४७५३३६

गझल: 

प्रतिसाद

लोक ते आता नव्याने लागले बहरावयाला
लाभला ग्रीष्मात ज्यांना श्रावणी सहवास माझा

देह माझा तडफडाया लागतो जेव्हा भुकेने
वाटते सार्‍या जगाला हा असे उपवास माझा.

मस्त शेर

-मानस६

सुखद अनुभव आहे..
गझलचे तंत्र दादांनी शिकवले..
आता येथील तांत्रिक बाबीदेखील समजून घ्याव्या लागतील..
संगणकाशी मैत्री होते आहे..होईल...
गझलमध्ये ' संस्क्रुती ' हा शब्द टाईप करणे जमले नाही..आपण सुधार करावा व कसे टाईप करावे हे सांगावे..
आपला,गौरवकुमार

प्रिय गौरवकुमार,

आपले स्वागत आहे. संस्कृती sMskRutI किंवा saMskRutI असे लिहावे. अधिक माहिती देवनागरीत असे लिहावे! इथे मिळेल.

गझल आवडली. पुढील गझलेसाठी शुभेच्छा.


शेवटचे ३ शेर फार फार आवडले!!

योजनेआधीच माझे गाव तंटामुक्त होते
लागला बघ योजनांनी गाव झगडायास माझा
वा! वा!
पुढील गझलेच्या प्रतीक्षेत...

गोैरवकुमार,
आपली माटुंग्याच्या कार्यशाळेत भेट झाली होती.
त्याच सुमारास 
तारूण्य तुझे नजरेने नजरेस खुणावत होते ...
असे काहीसे शब्द असलेली गझल  एेकली होती. 

हीही गझल आवडली.  
 

ंस्वागत, गौरवकुमार...

लोक ते आता नव्याने लागले बहरावयाला
लाभला ग्रीष्मात ज्यांना श्रावणी सहवास माझा

देह माझा तडफडाया लागतो जेव्हा भुकेने
वाटते सार्‍या जगाला हा असे उपवास माझा

हे कसे स्वातंत्र्य आता लागले मजला छळाया
केवढा रमणीय होता धुंद कारावास माझा

एकूणच गझल उत्तम. त्यातही वरील शेर खूप आवडले.  अभिव्यक्तीची पद्धत थेट.  बंदुकीतून गोळी सुटावी, तशी. आवडली.  कल्पना, विचार जोरकस.   सफाईदारपणा, सहजता वाखाणण्याजोगी. अजून येऊ दे  गौरवकुमार अशाच उत्तमोत्तम गझला... वाट पाहत आहे...शुभेच्छा.

गौरवकुमार, आधीच्या प्रतिसादींशी सहमत आहे. गझल फार आवडली.

योजनेआधीच माझे गाव तंटामुक्त होते
लागला बघ योजनांनी गाव झगडायास माझा

वा! हा शेर फारच आवडला.

गझल आवडली :) माझ्या खास लक्षात राहण्याजोगे शेर-

योजनेआधीच माझे गाव तंटामुक्त होते
लागला बघ योजनांनी गाव झगडायास माझा

तू नको ज्योतिष्य माझे वर्तवू आताच काही
आजही माझ्या असे हातावरी विश्वास माझा