स्थित्यंतरे

कापली नाहीत अजुनी तेवढी मी अंतरे
योजिली आहेत माझी मी निराळी अंबरे


मी भरारी घेतली अन दशदिशा भारावल्या
वेधले मी या नभाचे कोपरे अन कोपरे


पडझडीचा काळ माझा संपता कळले मला
सारखी येणार आता ही अशी स्थित्यंतरे


मी मनाच्या ताकदीने पंख हे फैलावले
अन क्षणातच मुक्त झाले हे युगांचे पिंजरे


जे जसे वाट्यास आले ते तसे स्वीकारले
शोधले नाही कधीही मी सुखाचे आसरे


पेलतो आव्हान आता कोणतेही लीलया
जिद्द माझी अन सचोटी हीच त्याची उत्तरे


                                             - जनार्दन केशव म्हात्रे
२/ खलिफा निवास, गांधी नगर, जुना बेलापूर रोड,
कळवा-ठाणे ४००६०५.  भ्रमणध्वनी: ९३२३५५५६८८

गझल: 

प्रतिसाद

हा शेर फार फार आवडला! बाकी गझलही छान!
पुढील लेखनास शुभेच्छा.

प्रिय जनार्दन,

पडझडीचा काळ माझा संपता कळले मला
सारखी येणार आता ही अशी स्थित्यंतरे
वा, फार चांगला शेर आहे.

मी मनाच्या ताकदीने पंख हे फैलावले
अन क्षणातच मुक्त झाले हे युगांचे पिंजरे
वाव्वा.

एकंदर गझल आवडली. पुढील गझलेसाठी शुभेच्छा.

म्हात्रेसाहेब,
गझल फार आवडली. सगळेच शेर चांगले झालेत; मात्र पुढील शेर विशेष आवडले -
मी भरारी घेतली अन दशदिशा भारावल्या
वेधले मी या नभाचे कोपरे अन कोपरे

मी मनाच्या ताकदीने पंख हे फैलावले
अन क्षणातच मुक्त झाले हे युगांचे पिंजरे

- चक्रपाणि जीवन चिटणीस

पडझडीचा काळ माझा संपता कळले मला
सारखी येणार आता ही अशी स्थित्यंतरे ...    वा...वा...

जे जसे वाट्यास आले ते तसे स्वीकारले
शोधले नाही कधीही मी सुखाचे आसरे...         सुंदर

पेलतो आव्हान आता कोणतेही लीलया
जिद्द माझी अन सचोटी हीच त्याची उत्तरे .,.  छान
स्वागत आणि शुभेच्छा !

वाहवा जनार्दन !!
सारखी येणार आता ही अशी स्थित्यंतरे..
ई-विश्वात स्वागत !!
 


.........या शुभेच्छा कायम जपून ठेवेन...

सायबर विश्वात स्वागत !!!
खरंच मजा आली. सुंदर  गझल आहे.  पुढच्या कामासाठी शुभेच्छा !!!!!!!!!
 
 
 

पेलतो आव्हान आता कोणतेही लीलया
जिद्द माझी अन सचोटी हीच त्याची उत्तरे

असेच लिहित रहा,
शुभेच्छा...