फोटो : डॉ.श्रीकृष्ण राऊत


ना झोपतो, ना जागतो, मी वागतो वेड्यापरी;
तंद्रीत एका वेगळ्या मी राहतो वेड्यापरी.


सत्यात अन् स्वप्नातही झाल्या किती भेटी तुझ्या;
रात्रंदिनी बोटावरी मी मोजतो वेड्यापरी.


वेणीत जी तू खोवली  होती गुलाबाची फुले;
एकेक त्यांच्या पाकळ्या सांभाळतो वेड्यापरी.

नाते मला लागे पुसू,  "आहेस माझी कोण तू?"
प्रश्नास ह्या साध्यासुध्या मी हासतो वेड्यापरी.


होणार ते होवो उद्या त्याची न मजला काळजी;
प्रेमात माझ्या आजच्या मी झिंगतो वेड्यापरी.


चोरून सर्वांपासुनी जो ठेवला फोटो तुझा;
त्यालाच एकांती कधी मी चुंबितो वेड्यापरी.


(‘गुलाल आणि इतर गझला’ह्या संग्रहातून) भेटा : http://www.mazigazalmarathi.blogspot.com  
 

प्रतिसाद

खूपच छान गझल आहे. सगळे शेर आवडले; पण बोटावर मोजणे, झिंगणे आणि फोटो तर दणदणीत झालेत. फारच आवडले. फोटोच्या शेरात अलामत भंगली आहे. झिंगण्याच्या शेरात 'त्याची न मजला काळजी' हे 'त्याची मला ना काळजी' असे भाषकदृष्ट्या अधिक सोपे करता येईल काय, याचा विचार करावासा वाटतो. 'मजला' टाळायचा प्रयत्न म्हणून, विशेष असे काही नाही.
पुढील लेखनासाठी अनेकोत्तम शुभेच्छा.
- चक्रपाणि जीवन चिटणीस

उर्दू गझलेचा इतिहास सांगतो की स्वर-चिन्हा चे/ची  भान/जाण नसल्याने उर्दू गझलेचे विशेष काही बिघडले नाही. कशाला किती महत्व द्यायचे ते प्रत्येकाने आपले आपण ठरवावे...

स्वरचिन्हाचे भान ठेवल्याने / जाण असल्याने मराठी गझलेचेही काही बिघडेलसे वाटत नाही. मराठी गझलेचा स्वतःचा इतिहास निर्माण होऊ दे की!
- चक्रपाणि जीवन चिटणीस

स्वरचिन्हाचे भान ठेवल्याने / जाण असल्याने मराठी गझलेचेही काही बिघडेलसे वाटत नाही.
अगदी सहमत. पण आग्रह कशाला?
मराठी गझलेचा स्वतःचा इतिहास निर्माण होणारच याबद्दल दुमत नाही, पण अश्या आग्रहामुळे
होईल असे मुळीच वाटत नाही.

वरणभात, लोणचे, बटाटाभाजी, पुर्‍या, श्रीखंडपुरी, मटकीची उसळ असे साग्रसंगीत जेवण आहे. भरपेट जेवण व्हायच्या आणि मग तृप्त ढेकर द्यायच्या मार्गावर असतानाच शेवटच्या घासाला नेमकी उसळीतील चोरमटकी दाताला लागते. अस्सल खवय्या पाहुणा पोटावरून हात फिरवत पण अंशभर अतृप्त मनाने उठेल कारण शेवटच्या घासातील कणकण मनातून जाणार नाही.
ज्यांना तात्पर्य समजून घ्यायची इच्छा आहे, त्यांना ते समजले असेलच, अशी आशा आहे. अधिक लिहिण्याची गरज नाही.
- चक्रपाणि जीवन चिटणीस


नाते मला लागे पुसू,  "आहेस माझी कोण तू?"
प्रश्नास ह्या साध्यासुध्या मी हासतो वेड्यापरी.

मस्त. मस्त. एकंदर गझल फार आवडली. 

राऊतसाहेब, लहान तोंडी मोठा घास घेतो. एक किरकोळ गोष्ट. 'एकेक त्यांच्या पाकळ्या' ऐवजी  'एकेक त्यांची पाकळी' हवे होते का?

चक्रपाणी, माझ्या मते:

१. इथे अलामतीचा जरी विचार केला तरी  'चुंबितो' मधला 'बि' ऱ्हस्व आहे. ऱ्हस्व स्वराची अशी सूट एखाद्या दुसऱ्या शेरात घेतली तर काहीच हरकत नसते, असे वाटते. दीर्घ स्वराची सूट मात्र चालत नाही. आणि तसेही 'चुंबितो' ऐवजी 'चुंबतो'ही म्हणता येतेच की! माझ्या मते हा मुद्दा तसा फारच किरकोळ आहे.


२. 'त्यांची न मजला काळजी' हे मला 'त्यांची मला ना काळजी' हे लयीच्या दृष्टीने कानांना अधिक बरे वाटते. 'ना' सारखा एकाक्षरी आकारयुक्त नकार कुठे वापरायचे ते कानांवर सोडून द्यावे, असे मला वाटते. तसेच ह्या संपूर्ण गझलेत एकच 'मजला' आला आहे, त्यामुळे ही बाबदेखील किरकोळच आहे.

शेवटी, चूभद्याघ्या.
चित्तरंजन

नको त्या गोष्टींमधे गझलेला दाद द्यायचो विसरलोच.
चित्तरंजनशी सहमत
नाते मला लागे पुसू,  "आहेस माझी कोण तू?"
प्रश्नास ह्या साध्यासुध्या मी हासतो वेड्यापरी.

चित्त,
तुमचे म्हणणे मी चूक म्हणतच नाही. प्रथमदर्शनी पाहता गझल तांत्रिकदृष्ट्या बिनचूक निघाली की एका तंत्रशुद्ध गझलेचा अर्थ, वळणे, शब्दयोजना, प्रासादिकता सगळ्याचा आस्वाद घेण्यातला आनंद आपसूक द्विगुणित होतो, इतकेच माझे म्हणणे. अलामतीची किंवा अन्य सूट घेण्याच्या नादात, लयबद्धतेला अधिक महत्त्व देण्याच्या नादात मात्रांकडे, तंत्रशुद्धतेकडे कानाडोळा करणे आणि तंत्रशुद्ध पण तरीही कलात्मक, सुंदर, गोटीबंद गझल लिहिणे यांच्यातला फरक मला बाजारीकरणातून प्रेक्षकांच्या सोईसाठी प्रसिद्धीस आलेले २०-२० क्रिकेट आणि तंत्रशुद्धता आणि कलेचा संगम असलेले कसोटी क्रिकेट यांच्यातला फरकाइतकाच प्रकर्षाने जाणवतो. असो. कुणी कुणी काय करावे, हे वैयक्तिक जजमेन्ट आहे शेवटी; त्यात माझे मत नोंदवणारा मी कोण?
जुनाट वळणाच्या शब्दप्रयोगांनासुद्धा आक्षेप नाही; मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे शक्य असेल तिकडे ती टाळता आली तर बरे, इतकेच! बाकी विशेष असे त्यात कुठे काय?
- चक्रपाणि जीवन चिटणीस

चित्तदा...
शेरातील वरच्या ओळीतील 'फुले' या अनेक वचनामुळे 'त्यांच्या पाकळ्या' असे आले आहे असे वाटते. 

 
चर्चा खमंग चालली आहे...

सहभागी होण्याचा मोह आवरला नाही.

मा.चक्रपाणि जीवन चिटणीस.....

(१) उर्दू व मराठी गझलेचा जवळचा सबंध असला तरी दोन्हीत वेगळेपणा असणार..हे नक्की!

(२) पु.ल. "रंग माझा वेगळा"च्या प्रस्तावनेत म्हणतात...

"वनस्पती शास्त्रज्ञाला चारचौघांपेक्षा फुल अधिक कळत असेल.पण त्याचे रंग आणि गंध प्रथम सामान्य माणसासारखे त्याला आकर्षीत करीत नाहीत असे थोडेच आहे?"

त्याचप्रमाणे ...'फोटो' तील 'चुंबितो ' गझलच्या शास्त्रीय जाणकारांना खटकत असला तरी...

"कवी आणि त्याच्या काव्याचा फैसला सामान्य लोक करीत असतात. स्वत: कवी किंवा समीक्षक नव्हेत. ज्या भाषेत काव्य लिहीले जाते, त्या भाषेत काव्य लेखन करणार्‍या कवीचे सर्वोच्च न्यायालय, म्हणजे ती भाषा बोलणारी सामान्य जनताच असते."

(३)"त्याची मला ना काळजी" बद्दल बोलताना असे वाटते की , तसे म्हणताना "त्याची  न मजला काळजी" पेक्षा सांगण्याच्या तीव्रतेचा सूर ओळीतील 'न' ची जागा बदलल्या मुळे कमी होतना दिसतो. उदा.

(अ) नाही त्याची मला काळजी.

(ब) त्याची नाही मला काळजी.

(क) त्याची मला नाही काळजी.

(ड) त्याची मला काळजी नाही
.

....त्यामुळे मूळ रचनाच अधिक चांगली वाटते.

(४) "मजला"

मजला , माझिया,मज,तुज अश्या शब्दांचा प्रयोग भटांसुद्धा केलाय , ते कधीही 'जुनाट वळणाचे वाटत नाहीत....याची अनेक उदाहरणे देता येतील्.जो पर्यंत मराठी भाषा टिकून आहे तो पर्यंत भटांच्या गझला नव्याच वाटतील आणि शब्दही!

आपला,

अ.ब.शि .

चर्चा भलत्याच मुद्द्यांवर होते आहे.व्रुत्त हे गझलेचे साधन आहे , साध्य नव्हे.शिवाय व्रुत्त पाळून लिहिणे म्हणजे काहीतरी भयंकर कठिण आणि दुष्कर काम आहे असा काही एक गैर-समज देखील बर्याच मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे, किंवा पसराविला गेला आहे.
गझलेत निव्वळ व्रुत्त असते का ? आपण ज्या गझला लिहितो आहोत , त्यांमध्ये जीवनाचे निदान काही अंशी तरी चित्रण / रूपण  होते आहे काय ? की आपण नुसत्याच व्रुत्तानसारी रचनांचे ढीग जमवतो आहोत , याचा विचार नव्या जुन्या ( विशेषतः जुन्या ) कवींनी करणे आवश्यक आहे असे वाटते.
मध्यंतरी पुण्यातील दोन सुप्रसिध्द कवींचे संग्रह वाचण्यात आले.या दोन्ही संग्रहांमध्ये गझला नसून केवळ व्रुत्ते होती , असे खेदाने नमूद करावेसे वाटते .अशा गझला लिहून , गझलेला मराठी साहित्यात मानाचे स्थान मिळेल अशी अपेक्षा करणे हास्यास्पद ठरेल.
 
 

चर्चेतील सगळी मते वाचली. मजला, मज सारखे शब्द मी स्वतः कधी वापरले नाहीत, असे नाही. माझा मुद्दा इतकाच आहे, की शक्यतोवर ते टाळता आले तर बरे.गझलेच्या सौंदर्याला, मतितार्थाला, मिसर्‍यांच्या सहजपणाला बाधा न येता असे करता येत असेल, तर नक्कीच करावे.  ते वापरूच नयेत, असे मी म्हटलेले नाही. चर्चेत याविरुद्ध तलवारी उपसलेल्यांनी हा मुद्दा नीट समजून घेतलेला नाही, असे खेदपूर्वक नमूद करावेसे वाटते.
दुसरा मुद्दा आहे तंत्रशुद्धतेचा. याबाबत माझे मत मी आधीच स्पष्ट केले आहे, असे वाटते. पुनरुधृत करतो -
प्रथमदर्शनी पाहता गझल तांत्रिकदृष्ट्या बिनचूक निघाली की एका तंत्रशुद्ध गझलेचा अर्थ, वळणे, शब्दयोजना, प्रासादिकता सगळ्याचा आस्वाद घेण्यातला आनंद आपसूक द्विगुणित होतो, इतकेच माझे म्हणणे. अलामतीची किंवा अन्य सूट घेण्याच्या नादात, लयबद्धतेला अधिक महत्त्व देण्याच्या नादात मात्रांकडे, तंत्रशुद्धतेकडे कानाडोळा करणे आणि तंत्रशुद्ध पण तरीही कलात्मक, सुंदर, गोटीबंद गझल लिहिणे यांच्यातला फरक मला बाजारीकरणातून प्रेक्षकांच्या सोईसाठी प्रसिद्धीस आलेले २०-२० क्रिकेट आणि तंत्रशुद्धता आणि कलेचा संगम असलेले कसोटी क्रिकेट यांच्यातला फरकाइतकाच प्रकर्षाने जाणवतो. असो. कुणी कुणी काय करावे, हे वैयक्तिक जजमेन्ट आहे शेवटी; त्यात माझे मत नोंदवणारा मी कोण?
वैयक्तिकरित्या मला विचारले, तर मी मांडलेल्या मतांचा आग्रह मी नक्कीच धरेन, अट्टाहास/हट्ट/दुराग्रह नाही. याउप्पर यावर अधिक काही लिहिण्याची इच्छा नाही. धन्यवाद.
- चक्रपाणि जीवन चिटणीस

[quote=अमोल शिरसाट]
चित्तदा...शेरातील वरच्या ओळीतील 'फुले' या अनेक वचनामुळे 'त्यांच्या पाकळ्या' असे आले आहे असे वाटते.  [/quote] प्रिय अमोल, 'पाकळ्या'च्या आधी 'एकेक' आल्याने त्या ओळीत 'पाकळ्या'ऐवजी 'पाकळी' असायला हवे होते, असे मला वाटले. 

मजा आली..... प्रिय मित्रा अमोल....
अगदी मनातले बोललास.... आणि गजब भाषेत...
बहोत बढीया....

अगदी बरोबर 'फुले' या अनेक वचनामुळेच 'त्यांच्या पाकळ्या' असे आले आहे... 


"उत्तम लिहिण्यासाठी  HOW पेक्षा [तंत्रापेक्षा] WHAT जास्त महत्वाचे असते. तंत्रापेक्षा मंत्र महत्वाचा.."  सुरेश भट.

कर करात घे, तव, वदला....  सारखे शब्दप्रयोग टाळायला हवेत. पण मजला सारखा शब्दही..!!
मजला , माझिया,मज,तुज हे खरच कधीही जुनाट वळणाचे बिलकुल वाटत नाहीत....

साग्रसंगीत जेवण झाल्यावरही आपण चोरमटकी मुळे अतृप्त राहणार.. तर हा स्वयंपाक बनवणार्‍याचा गुन्हा म्हणावा लागेल की संपूर्ण जेवणात ज्याला चोरमटकी लागली त्याचे नशीब... चोरमटकीला अवाजवी महत्व देवून जेवणाचा निरस करण्यात काय अर्थ...
असो...
गझल तर मस्त आहेच आणि चर्चाही..
चू. भू. दे. घे.
या चर्चेमुळे आपण भावनेच्या भरात मागील "किनारा" गझलेवर अलामतीच्या बाबतीत अन्याय केला असे वाटते...
मी त्या गझलचा गुन्हेगारच...

तेव्हा केलेल्या सुचवण्या मान्य करून, त्यांच्याशी तेव्हा सहमत असलेल्यांची मते लक्षात घेऊन आपण त्या गझलेची सुधारीत आवृत्ती प्रसिद्ध केलीत; आणि आता तुम्हाला आमची मते अन्याय्य असल्याचा साक्षात्कार झाला, याचे नवल वाटले.
माझी सगळी मते अतिसामान्य वाचकाची मते म्हणून पहावीत; पटली, तर विचार करावा, अन्यथा सोडून द्यावीत. पटलेच पाहिजे असा आता आग्रह पण नाही, हट्ट तर मुळीच (नव्हता आणि आताही किंवा यापुढेही) नाही.
- चक्रपाणि जीवन चिटणीस

अमोलने म्हटलेले  'फुले ' हे अनेकवचन मान्य..
तरी ' एकेक ' म्हट्ल्यावर, ती प्रत्येक पाकळी स्वतंत्र जपली आहे ना..
मग "एकेक त्यांची पाकळी " असेच भावते.