व्यथा

मी गुन्हे अक्षम्य केले ही खरी आहे  व्यथा
त्यांसही तू माफ केले ही  खरी आहे व्यथा

वाट मी चुकलो कितीदा, सांगती जे जे मला
काननी त्यांनीच नेले ही खरी आहे व्यथा

जुलुम आहे कोरडे हे वागणे, साकी, तुझे
त्यावरी हे रिक्त पेले ही खरी आहे व्यथा

लोकहो, पुसता कशाला प्रांत माझा कोणता
देश येथे फाटलेले ही खरी आहे व्यथा

जहर टीकेचे जनांच्या रिचवले असतेच मी
वाचल्यावाचून गेले ही खरी आहे व्यथा

गझल: 

प्रतिसाद

मी गुन्हे अक्षम्य केले ही खरी आहे  व्यथा
त्यांसही तू माफ केले ही  खरी आहे व्यथा
मतला फार फार आवडला. मस्त.
दुसऱ्या शेरातला 'काननी' टाळता येत नाही, असे दिसते आहे. 'जंगली' किंवा 'अन् वनी' होईल. पाढे वाचणे नसले तरी चालेलसे वाटते. मला काहिसे
वाट मी चुकलो कितीदा, नेहमी म्हणतेस तू
(आणि तू  रानात नेले ही खरी आहे व्यथा)
'तू' इथे प्रातिनिधिक. तुम्हाला काय वाटते?
जहर टीकेचे जनांच्या रिचवले असतेच मी
वाचल्यावाचून गेले ही खरी आहे व्यथा
वा! वा!  नेहमीच्या बोलीत 'जहर पचवणे' अधिक योग्य असते का? 'जनांच्या' ऐवजी 'तुमचे' आणता येईल काय?  
गझल चांगली आहे. आवडली.
 
 
 

दुसऱ्या शेरातला 'काननी' टाळता येत नाही, असे दिसते आहे. 'जंगली' किंवा 'अन् वनी' होईल. पाढे वाचणे नसले तरी चालेलसे वाटते.

असे करता येईल :
वाट मी चुकलो कितीदा, सांगती जे जे मला
काननी त्यांनीच नेले ही खरी आहे व्यथा

जहर टीकेचे जनांच्या रिचवले असतेच मी
वाचल्यावाचून गेले ही खरी आहे व्यथा
वा! वा!  नेहमीच्या बोलीत 'जहर पचवणे' अधिक योग्य असते का? 'जनांच्या' ऐवजी 'तुमचे' आणता येईल काय? 

काय करणार,'रिचवण्या'ची  सवय  झालीय !  ;)
'जनांच्या' ऐवजी 'तयांच्या' करता येईल.

वाट मी चुकलो कितीदा, सांगती जे जे मला
काननी त्यांनीच नेले ही खरी आहे व्यथा
हे चांगले वाटते.

एक लक्षात आले नाही 'केले' दोनदा आले आहे मतल्यात. मतला थोडा बदलून बघा.

वाटाड्या, साकी आणि मीरा -छान झाले आहेत.
नुसते वाचून भागणार नाही आता .मिलिंद, तुमच्या गझला 'अभ्यासाव्या' लागणार.
वा, वा!

मतला अगदी सहज आणिअर्थपूर्ण. साकीचा शेरही खूप आवडला. जहर 'पचवणे'च हवेसे वाटते; 'रिचवणे' नक्कीच खटकले. एकूण गझल आवडली. अनेकदा तुमच्या बर्‍याच गझला 'मराठी' कवितेच्या टेम्प्लेटची आणि समृद्ध शब्दभांडाराची मूर्तीमंत उदाहरणे म्हणून पाहण्याचा मोह टाळता येत नाही :-) या गझलांमधले बरेच शब्द आजही लक्षात राहिलेत. उदा. विभावरी वगैरे. असो.