किनारा....

तिला मी  भेटतो आहे पुन्हा... रोका मला...
कितीदा देत आहे मी असा धोका मला...

क्षितीजाहूनही मी दूर गेलो एवढा..
जराही शक्य नाही ऐकणे हाका मला..

दिली संधी तरीही बोलली नाहीस तू..
अता मागू नको तू एकही मौका मला..

नकोसे वाटते आता तिचे मज नावही..
नकोसा काळजाचा त्यामुळे ठोका मला..

किनारा तू नकोरे दाखवू मज सागरा..
तिरावर न्यायची नाही कधी नौका मला..

गझल: 

प्रतिसाद

काळजाच्या ठोक्याचा शेर चांगला आहे. 'रोका मला' खटकले; मुझे रोको चे शब्दशः भाषांतर झाले आहे; आणि तसेही 'रोका'च्या मराठीपणाबद्दल संशय आहेच...त्याचप्रमाणे मौका सुद्धा जरासे खटकले. अलामत भंग होण्याचे गालबोटही लागले आहे. असो. पुढील वेळी थोडी अधिक काळजी घ्याल, अशी आशा आहे.
पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.
- चक्रपाणि जीवन चिटणीस

किनारा तू नकोरे दाखवू मज सागरा..
तिरावर न्यायची नाही कधी नौका मला..

चक्रपाणिंशी पूर्ण सहमत.

चक्रपाणि आणि पुलस्ति यांच्याशी मीही सहमत आहेच. तत्सम शब्द टाळले पाहिजेत. तरच गझल निर्दोष मानण्याची आपणही सवय ठेवावी.
यानिमित्ताने अलामतीबद्दल थोडेसे...
अलामत भंगच (अपरिहार्यपणे...म्हणजे अलामत जुळवणारा शब्दच भाषेत नसेल तर....! इतक्या अपरिहार्यपणे....) होत असेल तर मतल्यातच ती सोय करून ठेवावी. असे दादांनी (स्व. सुरेश भटांनी) 'बाराखडी'त लिहिले आहे. (अर्थात काही जण तेही मानत नाहीत, तो भाग अजून वेगळा.)
बाकी, मौका वगैरेबद्दल माझेही तसेच मत आहे. दुसरे असे की, 'तिरावर'पेक्षा सरळसरळ  'किनार्‍यावर'ही चालले असते. कारण पुन्हा 'तीर' हा र्‍हस्व झाला. या शब्दाच्या सामान्यरूपातही दीर्घात रूपांतर होत नाही.  मला वाटते, 'क्षितिजा'चेही तसेच...
वरील दोषांमुळे एक चांगली तब्येत असलेली गझल बिघडते आहे. कृपया, काळजी घ्यावी. मतला छानच आहे.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

नाही.  'मोका' हा शब्ददेखील मराठीत आहे.  ''रोकणे', 'रोखणे' ही दोन्ही क्रियापदे मराठीत आहेत.  'रोकणे' फारसे कुणी वापरताना दिसत नाही. 'मौका'ऐवजी 'मोका' वापरता येईल, असे वाटते.

मता आणि 'किनारा' विशेष. एकंदर छान आहे. पुढच्या गझलेसाठी शुभेच्छा !

रोखणे नक्कीच आहे; पण रोकणे पण आहे, हे बाकी नवीनच कळले. माहितीबद्दल धन्यवाद. मोका आहे; पण 'मौका' नक्कीच नसावे. पहिल्या मतल्यातच घेतली नसली तरी दुसरा मतला (सानी मतला?) लिहून अलामतीची सूट घेता आली असती. असो.
- चक्रपाणि जीवन चिटणीस