डायरी



तुला विसरायचे म्हणतो जरी
पुन्हा उघडे जुनी तो डायरी


तुला लखलाभ देव्हारा तुझा
मला सोडायची ना पायरी


सुळावरही न त्याला समजले
कुणाचा क्रूस हा खांद्यावरी


भिकारी मध्यरात्री ओरडे
'नका लपवू ढगांनो भाकरी'


पुन्हा तू चांदणे माळून ये
किती अंधारले आहे घरी


असा पाऊस नव्हता पाहिला
तुझ्या येती सरीवरती सरी


बरोबर तू, न मी चुकलो कधी
चुकीची उत्तरे येती तरी


मला सिग्रेट लाडाने म्हणे
'तुझ्या ओठातली मी बासरी'


तुला जी वाटते साधी कथा
मला ती वाटली कादंबरी


न दिसली पापणीलाही कधी
अशी डोळ्यात स्वप्ने लाजरी


नको छेडू कधी तू भैरवी
निरंतर स्वर निनादो अंतरी

डॉ. प्रमोद बेजकर
गझल: 

प्रतिसाद

डायरी, पायरी, सरी, भाकरी खूपच आवडले. गझल छान, गमतीशीर आहे. बासरी वाचून आमच्यात धूम्रपान करणार्‍या मित्रमंडळींना "हरीप्रसाद" (चौरसिया) किंवा "बासरीवादक", "मुरलीधर" असे म्हणतात, त्याची प्रकर्षाने आठवण झाली :)
- चक्रपाणि जीवन चिटणीस

डॉक्टर,
ही गझल ठिक पण तुमच्या इतर गझलांइतकी प्रभावी  वाटली नाही.
पायरी, सरी, लाजरी हे शेर मस्त जमले आहेत! सिग्रेटचा शेर मात्र नाही भावला.कादंबरीचा शेरही नीटसा कळला नाही.
प्रामाणिक मत! राग नसावा.
जयन्ता५२

चांगला मिसरा !!!
कुणाचा क्रूस हा खांद्यावरी...
अस्पष्ट ध्येयनिष्ठांकडे केलेला हा एक संकेत वाटतो !!

सरी, भाकरी आणि क्रूस हे शेर आवडले!

छान गझल. आवडली.
तुला लखलाभ देव्हारा तुझा
मला सोडायची ना पायरी

पुन्हा तू चांदणे माळून ये
किती अंधारले आहे घरी

असा पाऊस नव्हता पाहिला
तुझ्या येती सरीवरती सरी


हे शेर खूप आवडले.
आपला,
(आनंदित) धोंडोपंत
मला सिग्रेट लाडाने म्हणे
'तुझ्या ओठातली मी बासरी'

हा शेर काढता आला तर बघा.  विडंबनात किंवा हझल मध्ये असले शेर ठीक आहेत. पण इथे ते शोभत नाहीत असे वाटते. गझलेची उंची ते कमी करतात.
अर्थात, हे आमचे वैयक्तिक मत आहे.
आपला,
(तौलनिक) धोंडोपंत

आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com