आयुष्य माझे

मृगजळाच्या व्यर्थ मागे, धावले आयुष्य माझे
आज कळले, कोरडे का भासले आयुष्य माझे

प्रेम ना कोणी दिले अन, ना दिला कोणी जिव्हाळा
कौतुकाने मीच मग कुरवाळले आयुष्य माझे

मोगरा फुललाच नाही अंगणी माझ्या कधीही
त्यास हाती बांधुनी मी! उधळले आयुष्य माझे

पाहुनी बाहेर दु:खे झडप घेण्या थांबलेली
मी सुखाच्या दावणीला बांधले आयुष्य माझे

भाग्य हातांनी घडविले! भ्रम जरी माझा फुकटचा
खेळणे होते तुझ्या हातातले आयुष्य माझे

हासल्यावर तू, कळ्यांचा अंगणी वर्षाव झाला
वेचण्यासाठी फुलांना, वेचले आयुष्य माझे

झापडे लावून मोहाची वृथा फेऱ्यात फिरलो
देहरूपी जोखडाला जखडले आयुष्य माझे

गझल: 

प्रतिसाद

[quote=मिल्या]
प्रेम ना कोणी दिले अन, ना दिला कोणी जिव्हाळा
कौतुकाने मीच मग कुरवाळले आयुष्य माझे

मोगरा फुललाच नाही अंगणी माझ्या कधीही
त्यास हाती बांधुनी मी! उधळले आयुष्य माझे 

हासल्यावर तू, कळ्यांचा अंगणी वर्षाव झाला
वेचण्यासाठी फुलांना, वेचले आयुष्य माझे

[/quote]
व्वाव्वा! हे शेर खूप सहज आणि सुंदर झाले आहेत. यांत मिसर्‍यांमधली सहजताही प्रशंसनीय आहे.एकूण गझल छान झालीये. आवडली.
मतल्यात राहले खटकले. राहिले करून अलामतीची सूट घेता आली असती; आणि इतर काही काफिये आणता आले असते. मात्र पुरेसे चांगले काफिये हाताशी असताना शक्यतो अलामतीची सूट घेण्याचा मोह टाळावा, असे मला वाटते. हे लक्षात घेता मतल्यातील राहले खटकले. जाहले करता आले असते, पण ते मग जुनाट वाटले असते. राहले ऐवजी भासले, असेही मला सुचले. असो. कृपया चांगला काफिया सुचल्यास 'राहले' काढून टाकायचा विचार करता आल्यास पहा. 'जिव्हाळा देणे' हा शब्दप्रयोगसुद्धा जरा 'ऑड' वाटतो आहे.
पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.
- चक्रपाणि जीवन चिटणीस

प्रेम ना कोणी दिले अन, ना दिला कोणी जिव्हाळा
कौतुकाने मीच मग कुरवाळले आयुष्य माझे
क्या बात है! मस्त!

"खेळणे होते तुझ्या हातातले आयुष्य माझे" किंवा  "वेचण्यासाठी फुलांना, वेचले आयुष्य माझे"
वाव्वा. मतलाही फार आवडला. एकंदरच गझल चांगली झाली  आहे.

[quote=चक्रपाणि]
मतल्यात राहले खटकले. राहिले करून अलामतीची सूट घेता आली असती; आणि इतर काही काफिये आणता आले असते. मात्र पुरेसे चांगले काफिये हाताशी असताना शक्यतो अलामतीची सूट घेण्याचा मोह टाळावा, असे मला वाटते. हे लक्षात घेता मतल्यातील राहले खटकले. जाहले करता आले असते, पण ते मग जुनाट वाटले असते. राहले ऐवजी भासले, असेही मला सुचले. असो. कृपया चांगला काफिया सुचल्यास 'राहले' काढून टाकायचा विचार करता आल्यास पहा. 'जिव्हाळा देणे' हा शब्दप्रयोगसुद्धा जरा 'ऑड' वाटतो आहे.
पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.
- चक्रपाणि जीवन चिटणीस[/quote]
चक्रपाणी ह्यांच्या 'राहले'वरील मताशी सहमत आहे.

मृगजळाच्या व्यर्थ मागे, धावले आयुष्य माझे
आज कळले, कोरडे का चालले  आयुष्य माझे

असे काहीसे करता येईल. 

खूप धन्यवाद...
राहले विषयी पूर्ण सहमत आहे... घाई केली उगाच गजल टाकायला..
चक्रपाणी /चित्त : भासले आणि चालले दोन्ही बदल आवडले ... भासले जास्ती संयुक्तिक वाटतोय... तेव्हा तुमची परवानगि आहे असे गॄहीत धरून तो बदल करायला सांगत आहे..

दावणी, मोगरा आणि कळ्या हे शेर फार फार आवडले! कल्पना आणि अगदी सहज मांडणी...
पु.ले.शु.!!

या गझलेतील प्रत्येक शेर खणखणीत आहे...सारेच शेर, साऱयाच कल्पना आवडल्या.  त्या कल्पनांची साधी-सोपी मांडणी भावली. पुढील गझललेखनासाठी मनापासून शुभेच्छा.
 
पाहुनी बाहेर दु:खे झडप घेण्या थांबलेली
मी सुखाच्या दावणीला बांधले आयुष्य माझे

---वा!एकंदर गझल व  हा शेर खास!
पु ले शु

जयन्ता५२

कौतुकाने मीच मग कुरवाळले आयुष्य माझे

...क्या मिसरा है मियां  !!!

सर्वांनाच खूप खूप धन्यवाद!!!

श्री. मिल्या महाशय,
गझल उत्तम जमलेय. अप्रतिम. खूप आवडली.
आपला,
(खूष) धोंडोपंत
दुसर्‍या शेरात ऊला मिसर्‍यात "जाळले" क़ाफ़िया वापरून हुस्ने मतला करून पहा.  रंगत अजून वाढेल असे वाटते.
"........ जाळले आयुष्य माझे" हा ऊला मिसरा  आणि याला जोडून जे जळून गेले आहे त्या कोळशाला उराशी धरून " ........कुरवाळले आयुष्य माझे" हा बदल आम्ही करून पाहिला.
भन्नाट वाटतो. तुम्ही तुमच्या कल्पकतेने करून बघा.
आपला,
(पर्यायसूचक) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com