आयुष्य तारण राहिले...

एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले...

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते
***
अशी ही शेवटी माझ्या जिण्याची संपली यात्रा
जिथे मी भेटलो होतो तिथे मी थांबलो नाही!

अशा अनेक ओळींत मरणकल्पना मांडणाऱ्या सुरेश भटांना ही जाण्याची कल्पना ' मोह ' घालायची का ? आणि आता तर ' भट ' निघून गेले...

' सुरेश भट ' या दोन शब्दांत काय काय साठवलं होतं. ती भाववृत्ती , ती बेपर्वाई , ती तंद्री , ती मराठी गझलची खांद्यावर घेतलेली पताका , ते मराठी भाषेच्या अणूरेणूवरचं प्रेम , ती कवितेची तगमग , ती धुंदी , ते मैफली गाजवणं , ती बेहोषी , तो कैफ आणि एक बेछूटपणासुद्धा...

भटांना आम्ही गझल लिहिणारी मंडळी ' दादा ' म्हणायचो. '७५ ते '९० हा काळ म्हणजे गझलचा जणू सुवर्णकाळच होता. भटांचा करिश्मा होता. उर्दू शिकायची अहमहमिका चालली होती. लोक झपाटल्यासारखे गझलच्या मैफलींना गर्दी करायचे. भलेभले उत्तम कविता लिहिणारे मुक्तछंदातले कवीही गझलच्या मोहजालातून सुटले नाहीत.

भटांनी तर मराठी ' गझल ' रुजवायचा , एस्टॅब्लिश करण्याचा , तिला मान्यता मिळवून देण्याचा वसाच घेतला होता...

नवकवितेच्या लाटेतही भटांच्या कवितेनं '७५ पूवीर्च लक्ष वेधून घेतलं होतं. भटांच्या उत्कृष्ट तरल आणि तरीही प्रखर कवितेवर पु.ल. , लता मंगेशकर , राम शेवाळकर , मोठ-मोठे उर्दू कवी आणि साक्षेपी संपादनाबद्दल आग्रही असणाऱ्या मौज प्रकाशनानं शिक्कामोर्तब केलं होतं. '' कळ्यांची काळजी होती , फुलांचा मामला होता '' हा भटांचा नितांत सुंदर वाटणारा लेख म्हणजे एक गद्यकाव्यच होतं.

दोनच ओळीत , मनाला भिडणारा जीवनानुभव व्यक्त करायचा. त्या दोन ओळींना ' लॉजिकल एन्ड ' असला पाहिजे. सरसरून जाणाऱ्या कॅरमच्या स्ट्रायकरसारखी ओळ हवी , हे आव्हानच वाटायचं नि ' रदीफ ', ' काफिया ' समजून घेणं चालू व्हायचं.

भटांच्या गझला अभ्यासणं , हा गझल लिहिणारांचाही रियाझ असायचा. तंत्र आणि मंत्र असं दोन्ही शिकवायला या गझला वस्तुपाठ ठरायच्या. नुसत्या तंत्रानं गझल सिद्ध होत नाही , हेही आकळत होतं. गझल लिहायचा , शिकायचा हट्ट धरून बसलेले अनेक कवीही भटांच्या भवती गराडा घालायचे. महाराष्ट्रातल्या गावोगावी असा गोतावळा निर्माण व्हायचा.

भटांनी स्वत: गाऊन सादर केलेल्या गझलांच्या मैफली , निरनिराळ्या संस्थांच्या मदतीसाठी कार्यक्रम हा सिलसिला चालूच असायचा. यात आंबेजोगाई साहित्यसंमेलनातली भटांची मैफल म्हणजे एक मैलाचा दगड ठरली. माझ्यासकट अनेकांचं गझललेखन तिथून सुरू झालं.

भटांच्या गझलेनं खूप काही शिकवलं. शेरातला प्रत्येक शब्द अचूक आणि अपरिहार्य हवा , हे अवधान , भटांच्या गझलांनी दिलं. शिवाय प्रत्येक ओळीत ' काव्य ,' असलंच पाहिजे हा निकष होताच.

घिसंपिटं लिहिताना वैतागायचं. कागद फाडून टाकायचे. स्वत:ला दाद द्यावीशी वाटल्यावर मगच भटांना दाखवायचं...त्यांनी पापण्या आकुंचित करून तीक्ष्ण दृष्टीनं पाहून डरकाळीवजा ' व्वा ' केलं तर शेर खरंच जमलाय , हे कळे. भटांना गझला दाखवणं हा अनेकांचा ' नेमधर्म ' होता. अनेक कवींच्या गझलांना मशागत करायची गरज आहे , असं भट सांगत. मशागत म्हणजे काय , हे ज्यांना कळलं ते गझल लिहिण्यात यशस्वीही झाले.

एक अविस्मरणीय प्रसंग लक्षात आहे- भटांच्या आता आपल्यात नसलेल्या मुलासाठी हर्षूसाठी ते कोल्हापुरात येत. पुण्याचे गझलकार , कोल्हापूरची मंडळी अशी त्यांच्याभवती जमत. त्यांच्या तात्पुरत्या बिऱ्हाडात मैफली होत. त्याचदरम्यान कोल्हापुरातल्या मराठी भावगीतांच्या मैफलीत (बहुधा ' शब्द-सुरांच्या झुल्यावर ') मध्यंतरात भट स्टेजवर आले आणि एखाद्या अवलियाप्रमाणे शास्त्रीय संगीतावर , काव्यातल्या सांगीतिक गुणांवर , शब्दांच्या लयीवर , प्रासादिकतेवर नि सुगम संगीतात सापडणाऱ्या शास्त्रीय संगीताच्या वारशावर भरभरून बोलले... भटांच्या मनात गाणं मुरलं होतं. कदाचित याचमुळे त्यांच्या शब्दांचं ' मीटर ' कध्धीच चुकलेलं नसतं.

भट त्यांच्या कार्यक्रमात स्वत: कविता म्हणायचे. तरन्नुममधे. गझलच्या भावानुसार चाल त्यांनी स्वत: बांधलेली असायची. ...कविराजांचा जडदेह. श्रोतेमंडळी. भवतालचं सगळं हळुहळू अदृश्य व्हायचं. उरायची फक्त भटांची गझल.

'८० च्यानंतर भटांशी अधूनमधून भेट होत होती. एकदा नागपूरला गेल्यावर त्यांची ' मठी ' ही पाहिली होती...

मराठी गझल फोफावायला लागल्यावर तिच्यावर झालेली टीकाही आठवते. आम्ही ' अभिधा ' अनियतकालिकाचा गझल विशेषांक भटांना अर्पण केला होता. त्यात गझलचे अभ्यासक आणि कवी डॉ. सुरेशचंद नाडकर्णींनी मराठी गझलच्या वाटचालीचा विश्लेषक आढावा घेतला होता. नाडकर्णी म्हणाले होते ,' भटांच्या गझलेतले अनुभव , चीड , त्रागा , कैफियत त्यांचे स्वत:चे आहेत , पण तसेच अनुभव नवोदितांनी अनुकरणातून मांडणे म्हणजे गझलची खासियत नव्हे. प्रत्येकाची रचना ही त्याची स्वत:ची त्याच्या जगण्यातली असायला हवी '. भट तरी वेगळं कुठे सांगत होते ?

होता न साधा एवढा जो शब्द मी तुजला दिला
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले!

भटांनी गझलला शब्द दिला नि तो पाळला...भट नेहमीच त्यांच्या कवितेतून जगण्याचे हिशेब मांडत राहिले.

याच आता शेष माझ्या राहिल्या काही खुणा
दोन माझी आसवे अन् चार माझी अक्षरे!

आपण त्यांना अंतरलो , पण त्यांच्या शब्दांची चांदरात आपल्या मनातलं आकाश नेहमीच उजळत राहील!


- नीता भिसे

Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

"घिसंपिटं लिहिताना वैतागायचं. कागद फाडून टाकायचे. स्वत:ला दाद द्यावीशी वाटल्यावर मगच भटांना दाखवायचं...त्यांनी पापण्या आकुंचित करून तीक्ष्ण दृष्टीनं पाहून डरकाळीवजा ' व्वा ' केलं तर शेर खरंच जमलाय , हे कळे"....
"' भटांच्या गझलेतले अनुभव , चीड , त्रागा , कैफियत त्यांचे स्वत:चे आहेत , पण तसेच अनुभव नवोदितांनी अनुकरणातून मांडणे म्हणजे गझलची खासियत नव्हे. प्रत्येकाची रचना ही त्याची स्वत:ची त्याच्या जगण्यातली असायला हवी '. भट तरी वेगळं कुठे सांगत होते ?"....
-भटसाहेबांसारखा 'कवीच्या वेषातला नरसिंह' उसन्या किंवा जुनाट कल्पना मान्य करेल हे त्रिवार अशक्य! त्यांचा झेंडा मिरवू इच्छिणार्‍या (माझ्यासकट) अनेक नवोदितांसाठी चिन्तनीय लेख.
अजून असेच लेख दिलेत तर बरे होईल!

 

भटांच्यानंतरच मराठीत गझल सुप्रतिष्ठित झाली. आजही त्यांची गझल अभ्यास आणि आस्वाद या दोन्ही कारणांसाठी सतत आठवावी लागते. आपण भटांची संपूर्ण कविता एकत्र उपलब्ध व्हावी यासाठी काही करु शकू का?

ह्या कामी सदस्यांनीच पुढाकार घ्यावा. त्यासाठी स्वतंत्र लेखनप्रकार बनविलेला आहे.
कविवर्य सुरेश भटांच्या गझला, गीते, कविता सदस्य रसग्रहणासह इथे देऊ शकतात. आपण आवडलेल्या गझला इथे द्याव्यात. सोबत गझल का आवडली, हे सांगितल्यास उत्तम. काहीशे गझला जमा झाल्यावर ड्रुपल पुस्तकाच्या रूपाने एक दस्ताऐवज तयार करता येईल.