पौर्णिमा

चिंब हिरवळ, रात्र मखमल, गार गोरी पौर्णिमा
रातव्याचे थेंब न्हालेली टपोरी पौर्णिमा


चांदण्यांचे बाण सुटती मान ही वेळावता
केवढे घायाळ करते ही समोरी पौर्णिमा!


रातराणी श्वास हे वळले तिच्या ओठांकडे
नेमकी तेव्हाच लाज़ुन पाठमोरी पौर्णिमा?


रातरांगोळी तुझी मी वाट बघते राजसा
चंद्र होऊनी पुन्हा भरशील कोरी पौर्णिमा?


बघ मला, कोजागिरीचा चंद्रही पडु दे फिका
(ऐकले हल्ली जरा करते मुजोरी पौर्णिमा)

गझल: 

प्रतिसाद

मस्त गझल चक्रपाणि! पाठमोरी आणि मुजोरी हे शेर विशेष आवडले!!
एक प्रश्न - "रातवा"म्हणजे काय?

रातवा = रात्रभर पडत राहणारा पाऊस. झड. फक्त रात्रीच संततधार पडत राहणाऱया पावसाला हा शब्द वापरतात.
साभारः श्री. प्रदीप कुलकर्णी (मनोगत)
- चक्रपाणि जीवन चिटणीस

चिंब हिरवळ, रात्र मखमल, गार गोरी पौर्णिमा
रातव्याचे थेंब न्हालेली टपोरी पौर्णिमा
छान....एका रात्रीत (आणि तीही कोजागिरीच्या आधीची रात्र !)  `झालेली` ही गझल आवडली...फार छान.  शुभेच्छा.
 

 

वा वा चक्रपाणि,
अगदी नाजुक हळूवार गझल. छान आहे. आवडली.
ती ही बरोब्बर कोजागिरीच्या सुमुहूर्तावर. क्या बात है !! 
पंचांग पाहून लिहिता की काय?
आपला,
(शास्त्रीबुवा) धोंडोपंत
विडंबनासाठी चांगला कच्चा माल दिलात . ( आमचा "केश्या" आता खूष असेल)
दोन चार विडंबने 'पडली ' तर राग मानू नये ही विनंती.
आपला,
(मस्तीखोर) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

चक्रपाणि,
गझल खूपच आवडली. 'पौर्णिमा' ही रदीफ आणि काफियाचे शब्द छान जुळून आलेत.
रातराणी श्वास हे वळले तिच्या ओठांकडे
नेमकी तेव्हाच लाज़ुन पाठमोरी पौर्णिमा? - वा!
- कुमार

 

[quote="प्रदीप कुलकर्णी"]चिंब हिरवळ, रात्र मखमल, गार गोरी पौर्णिमारातव्याचे थेंब न्हालेली टपोरी पौर्णिमा
छान....एका रात्रीत (आणि तीही कोजागिरीच्या आधीची रात्र !)  `झालेली` ही गझल आवडली...फार छान.  शुभेच्छा.[/quote]


प्रदीपशी पूर्णपणे सहमत आहे.
पुढील गझलेसाठी शुभेच्छा.

चक्रपाणि,
ही  शब्ददे़खणी  गझल आवडली!
रातवा, रातरांगोळी,समोरी  सहीत र च्या अनुप्रासाने या गझलेला एक वेगळा, सुंदर बाज आला आहे.
मस्त!
जयन्ता५२

सुंदर ! शब्दांत काय जादू असते! पौर्णिमा जगल्याचा आनंद मिळाला .
'रातरांगोळी' हा शब्द फार आवडला ... कल्पनाही...(याच शेरातला दुसरा मिसरा जरा लक्ष घालून करावा लागेल असे वाटते; म्हणजे 'होवोनी' अशासारखा एखादा सूक्ष्म बदल. चूभू माफ असावी. )
एकूण गझल छानच.
कोजागरीच्या ऐन दिवशी सुचली असेल तरी उत्तमच. आपले आसमंताशी नाते असलेच पाहिजे. काय हरकत आहे ? अर्थात विपर्यास अथवा विवाद न करता...
 
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

अतिशय हळुवार  आणि देखण्या शब्दांनी नटलेली सुंदर गजल. खूप आवडली.

उत्तम काव्याची अनुभूती मिळाली. धन्यवाद.

प्रो. केरोनाना छत्रे

विश्वास !! धोंडोपंत तुम्ही आमच्यावर दाखवल्यावर आपला मान राखायलाच हवा.. दोनचार नाही पण एक विडंबन तरी पाडलेच.. ते इथे वाचा.
(आपल्या गझलांचा आणि विडंबनांचा चाहता) केशवसुमार