वरात : डॉ. श्रीकृष्ण राऊत

तसा न चंद्र राहिला, तशी न रात राहिली;
अजूनही तशीच तू तनामनात राहिली.


अजून आठवे मला सुरेख तीळ सावळा;
अमीट खूण ती तुझी सखे उरात राहिली.


शहारते पुन्हा पुन्हा गळ्यात गीत ते तुझे;
मधुर चोरटी मिठी तुझी स्वरात राहिली.


कधी कधी हवेत ह्या तुझाच स्पर्श जाणवे;
फिरून सावली तुझी जशी घरात राहिली.


पुसून लोचने जिथे तुझा निरोप घेतला;
अजून ती मनात ह्या तुझी वरात राहिली.

('गुलाल आणि इतर गझला' संग्रहातून)

भेटा: http://www.mazigazalmarathi.blogspot.com 

 

 

 

प्रतिसाद

डॉ. राऊत साहेब,
क्या बात है !!!  अप्रतिम गझल !!!!
आपला,
(चाहता) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

कधी कधी हवेत ह्या तुझाच स्पर्श जाणवे;
फिरून सावली तुझी जशी घरात राहिली.
वाव्वा!

गझल आवडली.

दुसरा जवाब असूच शकत नाही....! स्वरांत मिठी राहणे....!
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

मस्तच गझल आहे. सगळेच शेर फार आवडले.
- चक्रपाणि जीवन चिटणीस

रसिकवर
सर्वश्री(चाहते) धोंडोपंत,
चित्तरंजन भट,
संतोष कुलकर्णी,
आणि
चक्रपाणि,
आपण दिलेली दिलखुलास दाद
अधिक चांगलं लिहायला उर्जा देत राहील.
आपले मनःपूर्वक आभार
आणि
दिवाळीसह आपल्या गझललेखनास
हार्दिक शुभेच्छा.
-डॉ.श्रीकृष्ण राऊत

भावगीत! ही गझल नाही.
सुमार दर्जाची गझल आहे.
हा हिणकस किंवा तिरकस प्रतिसाद नाही, सरळसरळ प्रतिसाद आहे.