...जाऊ दे मला !

...जाऊ दे मला !

सोड माझा हात...जाऊ दे मला !
फार झाली रात...जाऊ दे मला !

मी मलाही ओळखेनासा जिथे...
त्या स्थळी अज्ञात...जाऊ दे मला !

मी नवा झालो; मला रोखू नको...
टाकली मी कात...जाऊ दे मला !

ज्या ठिकाणी गार होतो जीव हा...
त्या ठिकाणी जात जाऊ दे मला !

पायरी सोडून माझे मागणे -
`उंबऱयाच्या आत जाऊ दे मला ! `

मी कशासाठी खरे-खोटे करू...?
- घाल तू रुजवात...जाऊ दे मला !

वाट मौनाची जरी आहे तरी...
गीत माझे गात जाऊ दे मला !

या कथेचा अंतही मी जाणतो...
ऐकली सुरवात...जाऊ दे मला !

एकदाची मोकळी झाली मने...
थांबली बरसात...जाऊ दे मला !

कौतुकाने पोट भरते हे खरे...
...पण शिव्याही खात जाऊ दे मला !!

येरझारा जन्म-मृत्यूच्या नको...
बास यातायात...जाऊ दे मला !

- प्रदीप कुलकर्णी

गझल: 

प्रतिसाद

प्रदीप,
खासी गझल!

या कथेचा अंतही मी जाणतो...
ऐकली सुरवात...जाऊ दे मला ! -- हा शेर स्मरणीय!उंबरा,कात,अज्ञात हेहि शेर मस्त जमले आहेत.

जयन्ता५२

प्रदीप,
गझल आवडली.
त्या स्थळी अज्ञात...जाऊ दे मला ! - वा!
'सुरुवात'/'अंत'चा शेरही असाच सुंदर आहे. 'कात', 'यातायात'ही विशेष आवडले.
- कुमार

त्या स्थळी अज्ञात...जाऊ दे मला ! - वा!
'सुरुवात'/'अंत'चा शेरही असाच सुंदर आहे. 'कात', 'यातायात'ही विशेष आवडले.

मलाही वाटते. गझल आवडली.

प्रदीपजींच्या गजल नेहमीच छान असतात. ही गजलही अपेक्षित आनंद देणारी आहे.

मी कशासाठी खरे-खोटे करू...?
- घाल तू रुजवात...जाऊ दे मला !

वाट मौनाची जरी आहे तरी...
गीत माझे गात जाऊ दे मला !

या कथेचा अंतही मी जाणतो...
ऐकली सुरवात...जाऊ दे मला !

हे विशेष आवडलेले शेर.

 

वा प्रदीपराव !!
फारच छान गझल. रदिफची निवड खासच असते तुमची.  
प्रत्येक शब्दाला योग्य न्याय देत तुम्ही लिहीता. तुमचे कौतुक वाटते.
आपला,
(संतुष्ट) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

नमस्कार प्रदीपराव,
आपल्या ह्या अप्रतिम गझलेचे विडंबन करण्याचे औधत्य आमच्या हातून घडले आहे.
आमचा दुसरा प्रतिसाद इथे  पहा.
आपला,
(मस्तीखोर) धोंडोपंत

खरोखर नितांत सुंदर गझल....
आवडली..
राज जैन
 

येरझारा जन्म-मृत्यूच्या नको...
बास यातायात...जाऊ दे मला !

हे विशेष आवडलेले !  माझ्या मनातील विचार जणु कागदावर वाचतेय ......असे वा!

येरझारा जन्म-मृत्यूच्या नको...
बास यातायात...जाऊ दे मला !

हे विशेष आवडलेले !  माझ्या मनातील विचार जणु कागदावर वाचतेय ......असे वा!