प्रवास


झोप काढली झकास आहे
तरी मासळी गळास आहे!


माळी बघतो स्वप्न नफ्याचे
कीड गोमट्या फळास आहे


कशी माजली बेपर्वाई
पर्वा याची कुणास आहे?


लाल सरींनी धरा भिजे अन -
क्रूर निळाई नभास आहे


पाट्या टाकत सूर्य चालला
गार शहारा उन्हास आहे


पिकते येथे ज्वार-बाजरी
आणि मागणी गव्हास आहे


काल उगाचच खुशीत होतो
आज अकारण उदास आहे...


कुणी उतरतो, कोणी चढतो
अव्याहत हा प्रवास आहे




गझल: 

प्रतिसाद

कशी माजली बेपर्वाई
पर्वा याची कुणास आहे?       वा..वा..
पाट्या टाकत सूर्य चालला
गार शहारा उन्हास आहे       छान, वेगळी कल्पना


पिकते येथे ज्वार-बाजरी
आणि मागणी गव्हास आहे       सुंदर


काल उगाचच खुशीत होतो
आज अकारण उदास आहे...    ज ब र द स्त


कुणी उतरतो, कोणी चढतो
अव्याहत हा प्रवास आहे                 मस्त
 
हे सर्व शेर आवडले...शुभेच्छा, पुलस्ती.

पुलस्ति,
गझल आवडली. 'गव्हास' मागणीचा शेर फारच सुंदर आहे.... समर्पकही.
काल उगाचच खुशीत होतो
आज अकारण उदास आहे... वा!
मक्ताही आवडला.
लाल सरींनी धरा भिजे अन -
क्रूर निळाई नभास आहे...  क्रूर हा शब्द योजण्याचं कारण सांगाल का?
- कुमार

पुलस्ति गझल आवडली.  प्रदीपशी आणि कुमारशी सहमत आहे.

काल उगाचच खुशीत होतो
आज अकारण उदास आहे...

हा शेर फारच आवडला. मस्त आहे.

मैं कभी चीखता हूँ ख़ुश होकर
फिर यकायक उदास होता हूँ

उर्दू डोक्यावर स्वार असताना वरील शेर मी कोणे एके काळी लिहिला होता तो आठवला.

कुमार,
     सामाजिकदृष्ट्या काहींच्या सुबत्तेचा, भरभराटीचा; इतर काहींच्या कल्पनातीत दुर्दशांशी संबंध असतोच... आणि पचायला कितीही जड असलं तरी हा संबंध कुठल्या ना कुठल्या पातळीवर "कार्य-कारण" संबंध असतो. लाल सरी ज्याच्यामुळे बरसताहेत त्याची निळाई म्हणून "क्रूर" आहे. माझ्या आधीच्या एका गझलेत एक शेर आहे - आलबेल या इथे, कत्तली तिथे जरी. या शेरात indifference असल्याची खंत आहे. "क्रूर" शेर, मला वाटते, त्यापुढचे अधिक तीव्र असे संक्रमण आहे. It is not just about indifference, it is about causation.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
-- पुलस्ति.

प्रदीपशी सहमत आहे!

जयन्ता५२

प्रतिसादांबद्दल सर्वांचे धन्यवाद!!

प्रदीपरावांशी सहमत आहे.
- चक्रपाणि जीवन चिटणीस