ज्वानी भरात आहे, मदमस्त रात आहे...!


                     ज्वानी भरात आहे,मदमस्त रात आहे.

                      ज्वानी भरात आहे, मदमस्त रात आहे
                     मुखचन्द्र मेनकेचा, माझ्या करात आहे

                     जो ना दिसे कधीही, का पूजिता तयाला?
                     नारायणास शोधा, नक्की नरात आहे

                    फिरवून बोट माझे, ह्या ब्रेलच्या लिपीवर,
                    मी शोधितो स्वत:ला, ह्या अक्षरात आहे

                    मी खोदतो कधीचा, आटून जाय तॄष्णा,
                    केंव्हा मिळेल पाणी, कुठल्या थरात आहे?

                    हा श्वास मोकळा मी, घेताच जाणिले की,
                    बळ लांघण्या गिरी हा, माझ्या परात आहे

                    घ्या आज शायरांनो, भरुनी हरेक प्याला
                    दरिया रितेपणाचा, ह्या अंतरात आहे

                                                                 -मानस६

गझल: 

प्रतिसाद

मानसपंत,
जो ना दिसे कधीही, का पूजिता तयाला?
नारायणास शोधा, नक्की नरात आहे - वा!
हा शेर आवडला.
'ब्रेल /अक्षरात' हा शेरसुद्धा सुंदर आहे.
पण मतल्यातला हा मिसरा नाही आवडला - 'ज्वानी भरात आहे, मदमस्त रात आहे'
कवितेत/गझलेत शब्द प्रांजळ, सूचक असावेत; पण असे अगदी थेट उल्लेख नसावेत, असं मला वाटतं. (हे सापेक्ष आहे; पण मी माझ्यापुरते तरी असे शब्द/अर्थ टाळतो).
'गझल' या शब्दाचा मूळ अर्थ माझ्या ऐकीव माहितीप्रमाणे 'स्त्रीशी केलेला संवाद' असा आहे. हा संवाद आदब ठेवूनच हवा.
पुढे गालिबनं गझलेला (या संवादाच्या कक्षांनाही) व्यापक रूप दिलं; पण तरी मूळ अर्थाचं (आणि त्यातल्या आदबशीरपणाचं) भान लिखाणात असावं असं मला वाटतं.
- कुमार

वा...वा...मानस

जो ना दिसे कधीही, का पूजिता तयाला?
 नारायणास शोधा, नक्की नरात आहे                    छान


 मी खोदतो कधीचा, आटून जाय तॄष्णा,
  केंव्हा मिळेल पाणी, कुठल्या थरात आहे?          वा...वा...

हा श्वास मोकळा मी, घेताच जाणिले की,
बळ लांघण्या गिरी हा, माझ्या परात आहे             मस्त

घ्या आज शायरांनो, भरुनी हरेक प्याला
 दरिया रितेपणाचा, ह्या अंतरात आहे                      सुंदर कल्पना

मी खोदतो कधीचा, आटून जाय तॄष्णा,
  केंव्हा मिळेल पाणी, कुठल्या थरात आहे?          वा...वा...

असेच. ब्रेलची लिपीही. गझल फार छान.

नरात, अक्षरात आणि थरात हे शेर खूप खूप आवडले!!

मी खोदतो कधीचा, आटून जाय तॄष्णा,
केंव्हा मिळेल पाणी, कुठल्या थरात आहे?