...मन माझे !

...मन माझे !

का उगीच तळमळते मन माझे ?
सारखेच मज छळते मन माझे !

दूर दूर पुनव फुले अवकाशी...
चांदण्यात दरवळते मन माझे !

ऐकशील सहजपणे जर केव्हा...
शांत शांत सळसळते मन माझे !

घाव घाव स्मरत बसे दिन-राती
एकटेच भळभळते मन माझे !

हे खरेच, दगड कधी बनतेही...
आसवांत विरघळते मन माझे !

ही उमेद वरवरची, थकलेली...
हे कळून मरगळते मन माझे !

घट्ट घट्ट पकड किती जगण्याची...
बंधनात वळवळते मन माझे !

हा बघून सतत खुला दरवाजा...
उंबऱ्यास अडखळते मन माझे !

हेच, हेच कळत कसे मज नाही...
का खरेच तुज कळते मन माझे ?

सांग तूच स्मरण असे कुठले ते...?
का तिथेच घुटमळते मन माझे ?

ये हळूच, अलगद ये हलक्याने...
सावकाश! डचमळते मन माझे !

आळ रोज मजवरती कसलेही...
रोज रोज चुरगळते मन माझे!

मी  विचार  भलभलते करतो का...?
...यामुळेच मग मळते मन माझे !!

- प्रदीप कुलकर्णी

गझल: 

प्रतिसाद

पुनःप्रकाशित केल्याबद्दल आभार.
कुलकर्णीसाहेब,
ऐकशील सहजपणे जर केव्हा...
शांत शांत सळसळते मन माझे !

हा बघून सतत खुला दरवाजा...
उंबऱ्यास अडखळते मन माझे !

ये हळूच, अलगद ये हलक्याने...
सावकाश! डचमळते मन माझे !

पुनःपुन्हा वाचूनही प्रत्येकवेळी तितकेच आवडतात.

प्रदीप,
गझल सुंदर आहे, पुन: प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद...
ये हळूच, अलगद ये हलक्याने...
सावकाश! डचमळते मन माझे !
आळ रोज मजवरती कसलेही...
रोज रोज चुरगळते मन माझे!
सुंदर!!!!!!!
- कुमार