...दूर दूर !

...दूर दूर !

मी इथे तुझ्यात चूर...दूर दूर !
तू इथून दूर दूर...दूर दूर !

मेघ दाटले मनातल्या मनात...
नाचतो कुठे मयूर...दूर दूर ?

लागलीच भांडणे परस्परांत...
काढला कुणी कुसूर...दूर दूर ?

जा विचार...आग लागली कशास...?
चालला निघून धूर...दूर दूर !

नेमका न आणते तुझा सुगंध...
ही हवा तुला फितूर... दूर दूर !

एकटाच मी तमात, एकटाच...
चांदण्यात तू टिपूर...दूर दूर !

स्वप्नधुंद, सप्तरंगल्या जगात...
जायचे मला जरूर...दूर दूर !

पोचवू कसा तुझ्या मनात शुष्क...
काळजामधील पूर...दूर दूर !

का इथेच कोळशांत शोधतोस...?
सापडेल कोहिनूर...दूर दूर !

सांजवेळ ही रिती रिती उदास...
आणि आर्त, खिन्न सूर...दूर दूर !

- प्रदीप कुलकर्णी

गझल: 

प्रतिसाद

आग, कोहिनूर आणि सूर हे शेर खूप आवडले!

फितूर या शेरांत - हवा तर आली आहे, तिने तुझा सुगंध आणला नाहिये; मग "दूर दूर" कोण किंवा काय? असेच काहिसे "पूर" शेराबद्दलही वाटले. चू.भू.द्या.घ्या.

मी इथे तुझ्यात चूर...दूर दूर !
तू इथून दूर दूर...दूर दूर !
वाव्वा! दूर दूर मस्त आले आहे.

मेघ दाटले मनातल्या मनात...
नाचतो कुठे मयूर...दूर दूर ?
वाव्वा!

जा विचार...आग लागली कशास...?
चालला निघून धूर...दूर दूर !
वाव्वा! वा!

एकटाच मी तमात, एकटाच...
चांदण्यात तू टिपूर...दूर दूर !
वाव्वा!

सुरेख! गझल आवडली.
 

प्रदीप,
गझल (नेहमीप्रमाणे) आवडली. 'कोहिनूर'चा शेर / कल्पना तर अप्रतिमच.
नेमका न आणते तुझा सुगंध...
ही हवा तुला फितूर... दूर दूर ! ... सुंदर!
'आणि खिन्न सूर ....'- वा!
- कुमार

वा! सुंदर कल्पना, रचना, मांडणी!

नेमका न आणते तुझा सुगंध...
ही हवा तुला फितूर... दूर दूर ----- हा शेर
नेमका च आणते तुझा सुगंध...
ही हवा तुला फितूर... दूर दूर ---- असा लिहल्यास 'फितूर'ला  आणखी वजन येईल कां?
-- उत्तर यावे.


जयन्ता५२

अतिसुंदर!!!!!

मेघ दाटले मनातल्या मनात...
नाचतो कुठे मयूर...दूर दूर ?

पोचवू कसा तुझ्या मनात शुष्क...
काळजामधील पूर...दूर दूर !

का इथेच कोळशांत शोधतोस...?
सापडेल कोहिनूर...दूर दूर !

सांजवेळ ही रिती रिती उदास...
आणि आर्त, खिन्न सूर...दूर दूर !

फार फार आवडली गझल. नेहमीप्रमाणेच.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

मूळ शेरच अधिक वजनदार.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

गझल आवडली, वेगळा रदीफ , मस्त मांडणी.

एकटाच मी तमात, एकटाच...
चांदण्यात तू टिपूर...दूर दूर !

वा!