खूप बोलू लागला अंधार नंतर

खूप बोलू लागला अंधार नंतर
नीज आली पण पहाटे चार नंतर

वेल जाईची पुन्हा फुलणार माझी
सांज अवघी लालसर होणार नंतर

पैठणीच्या रेशमाचे काय झाले
घेतली कोणी विकत जरतार नंतर

खूप आधी मी तुझ्यावर प्रेम केले
हा तुझ्यामाझ्यातला व्यवहार नंतर

राग आला ह्याच गोष्टीचा अचानक
चीड आली खूप तपशिलवार नंतर

काय तू आहे असे केलेस पूर्वी ?
काय तू आहेस रे करणार नंतर ?

आंधळा होतास तू संपूर्ण आधी
आणि मग... झालास बहिरा ठार नंतर

खूप तो आहे तसा सहृदय कसाई
कळवळा येईल त्याला फार नंतर

गप्प नव्हते प्रश्न बसले भोवताली
वाढले बेबंद जयजयकार नंतर

फक्त बिंदूएवढा काळोख होता
घेत गेला एक दैत्याकार नंतर

कोरडा झालो निरोपाच्या क्षणी पण
भिजवले एकांत मी क्रमवार नंतर

गझल: 

प्रतिसाद

मतला, व्यवहार,तपशिलवार ,ठार आणि दैत्याकार जास्त आवडले _/\_

वा, मस्तच गझ्ल.

मतला आणि तपशिलवार फारच आवडले.

खूप आधी आणि बिंदूएवढा हे शेर आवडले. मस्त झाले आहेत.