बोलली डोळ्यातुनी ती आणि कविता सुचत गेली...

बोलली डोळ्यातुनी ती आणि कविता सुचत गेली, एक वाणी, एक भाषा, का कुणी नाही बनवली
व्यक्त करण्या प्रेम माझी जीभ ही अडखळत गेली, एक वाणी, एक भाषा, का कुणी नाही बनवली

बोलण्या जन्मास आली आणि हिंसक बनत गेली, एक वाणी, एक भाषा, का कुणी नाही बनवली
विखुरली धर्मात गेली, जात सांगुन विरत गेली, एक वाणी, एक भाषा, का कुणी नाही बनवली

बोलताना तोल जातो, माणसाला कळत नाही, शब्द तोंडातून गेल्यावर पुन्हा तो वळत नाही
सावरावे तू जगाला, तूच का धडपडत गेली, एक वाणी, एक भाषा.. का कुणी नाही बनवली

रोजचे हे बोलणेही, खूपसे सांगून जाते... काव्य नाही, फक्त गप्पाही म्हणे असतात रंजक
भाव शब्दातीत असतो, तोच का तू पुसत गेली, एक वाणी, एक भाषा, का कुणी नाही बनवली

चाळली इतिहास पाने, खूप काही गवसलेही, मात्र बखरींच्या तिथे कबरी कशाला बांधल्या त्या
गोष्ट कालातीत असते, तीच खोटी ठरत गेली, एक वाणी, एक भाषा, का कुणी नाही बनवली

जन्म पृथ्वीवर कुणाचा जाहला होता कशाला, उत्खनन मी करत गेलो, भांडणे कोठून आली
प्रश्न वादातीत होता... उत्तरे सापडत गेली, एक वाणी, एक भाषा, का कुणी नाही बनवली

तो कुणाचा मित्र आहे.. जो मलाही मित्र म्हणतो, हात हाती घेतले की, एक मोठा परिघ बनतो
होय पृथ्वी स्थूल आहे, मात्र तीही फिरत गेली, एक वाणी, एक भाषा, का कुणी नाही बनवली

मान्य की उत्पात झाले, अन नकाशे बनत गेले, माणसे सर्वत्र होती... मज पुरावे मिळत गेले
भाग भाषेचे बनवले अन व्यवस्था खचत गेली, एक वाणी, एक भाषा, का कुणी नाही बनवली

आदळत कानी कपाळी जी कधी पडलीय माझ्या, तीच भाषा बोलतो मी, वेगळे काहीच नाही
जन्मता कळलीच नाही, जन्मभर मग छळत गेली, एक वाणी, एक भाषा, का कुणी नाही बनवली

मी कुठे लिहिली 'जनार्दन' एकही मात्रा गजलची, आतुनी आवाज आला, लेखणी ही झरत गेली
एक प्रायोगीक रचना सिद्धता दाखवत गेली, एक वाणी, एक भाषा.. का कुणी नाही बनवली

- जनार्दन केशव म्हात्रे

गझल: 

प्रतिसाद

जनार्दन, शेवटपर्यंत निभावली आहेस रचना. मोठ्या वृत्तातील निराळा प्रयोग म्हणून मी याकडे पाहतो.

बोलताना तोल जातो, माणसाला कळत नाही, शब्द तोंडातून गेल्यावर पुन्हा तो वळत नाही
सावरावे तू जगाला, तूच का धडपडत गेली, एक वाणी, एक भाषा.. का कुणी नाही बनवली

शेर आवडले ..