कैफ हा ओसाड का इतका ?

कैफ हा ओसाड का इतका ?
प्यायला आहेस मृगजळ का ?

वाळवंटी या निळाईच्या
एक विहरे मेघ पांढुरका

एक चिमणी आठवण आली
आणि मग झाला किती गलका

गडद मी खोली किती केली
रंग भिंतींचा तरी विटका

वाढली आवक गुलाबांची
वाढला दुर्गंधही सडका

काय बोहारीण ही जिनगी
आणि मी सदरा जुना मळका

राहती अद्याप काही जण
हा दिसे वाडा जरी पडका

तेवढा आहेस का नक्की ?
दाखवत आहेस तू जितका

ही खुज्यांची चालली स्पर्धा
कोण माझ्याहूनही बुटका?

केवढे आहे शहर परिचित ?
केवढा शहरास मी परका ?

लागला बाजार स्वप्नांचा
हिंड आता रात्रभर कडका

कोणते ब्रह्मांड आहे मी
कोणत्या ठिपक्यातला ठिपका ?

गझल: 

प्रतिसाद

वा, भाई, वा... हे क्लास शेर आहेत. बेहद्द खूष.

एक चिमणी आठवण आली
आणि मग झाला किती गलका

वाढली आवक गुलाबांची
वाढला दुर्गंधही सडका

राहती अद्याप काही जण
हा दिसे वाडा जरी पडका

तेवढा आहेस का नक्की ?
दाखवत आहेस तू जितका

व्वा व्वा चिमणी सदरा जितका बुटका परका ठिपका व्वा

जबरदस्त गझल...एकेक शेर खणखणीत, दणदणीत. सगळे शेर आवडले.

एक चिमणी आठवण आली
आणि मग झाला किती गलका

वा...

अप्रतिम मतला, सम्पुर्ण गझल आवडली!!