नदीला सागराची ओढ असली तर असू द्या ना

नदीला सागराची ओढ असली तर असू द्या ना
मला तुमच्यामधे थोडा तरी सागर दिसू द्या ना

नका सांगू मला प्रेमात पडण्याचे नफे तोटे
तुम्ही फसलात ना! आता मलासुद्धा फसू द्या ना

जरासे मौन धरले तर तमाशा केवढा करता
मला माझ्याच सान्निध्यात घटकाभर बसू द्या ना

तगादा आत्महत्येचा कशाला लावता मागे?
गिधाडांनो मला जमिनीस तर आधी कसू द्या ना

किती ढाळाल नक्राश्रू, व्यथांना पाहुनी माझ्या
किती मी सांत्वने सोसू, मला थोडे हसू द्या ना

मला ही जिंदगी तर एक सोडा बाटली वाटे
सुखे मिळतील, आधी दु:ख सारे फसफसू द्या ना

बिया होऊन जगण्याचा वसा मी घेतला आहे
भले रुजणार कोठे ज्ञात नाही तर... नसू द्या ना

गझल: 

प्रतिसाद

जरासे मौन धरले तर तमाशा केवढा करता
मला माझ्याच सान्निध्यात घटकाभर बसू द्या ना
वा. मस्त... एकंदर छान झाली आहे गझल.

sundar gazal.

बिया होऊन जगण्याचा वसा मी घेतला आहे
भले रुजणार कोठे ज्ञात नाही तर... नसू द्या ना

vaa vaa

गझल आवडली.

बसू द्या ना आणि बिया हे शेर विशेष!

बिया होऊन जगण्याचा वसा मी घेतला आहे
भले रुजणार कोठे ज्ञात नाही तर... नसू द्या ना
वा. उत्तम. खालच्या ओळीने फार मजा आली आहे.

तगादा आत्महत्येचा कशाला लावता मागे?
गिधाडांनो मला जमिनीस तर आधी कसू द्या ना
शेर छान आहे. ( गिधाडांना केलेले आवाहन थोडे नाटकीय वाटू शकते. बाय द वे, ही जमीन एखाद्या गझलेची तर नाही ना? आपली गंमत :) )

धन्यवाद सर्वांना.

चित्त :) पण अगदी खरे सांगायचे तर बरेच दिवसात काहि लिहिले नाहीस? कधी लिहिणार काही सुचतेय की नाही? असे टोचणार्या लोकांमुळेच हा शेर घडला :)

छान आहे गझल.