इरेला पेटला आहे पिसारा

सुखाचा केवढा झाला पसारा
बिलगला वेदनेचाही पहारा

तुझ्या लाटेत सामावून घे ना
कधीचा थांबला आहे किनारा

तुझ्या वाणीत सारे भाव होते
नको सांगूस की केला पुकारा

तुझा रस्ता कधी चुकलो नसे मी
नसे ही बातमी आहे इशारा

किती चेकाळली स्वप्ने उराशी
पहा मिळताच थोडासा उबारा

अजुन तुडवीत आहे पाय काटे
अजुन नक्की नसे माझा निवारा

शरीराची उडाली फार थरथर
मनामध्ये कुठे होता शहारा?

मला सांगून गेला आपलेपण
तुझा तो एक ओळीचा उतारा

दुरुन नुसतेच तू नाचू नको ना
इरेला पेटला आहे पिसारा

जगाला पाहिजे ते ते म्हणू दे
'अजय' बिनधास्त वाजव तू नगारा

गझल: 

प्रतिसाद

किनारा, निवारा आणि उतारा हे शेर आवडले.

निवारा फारच!

एक ओळीचा उतारा ही संकल्पना भावली.

किनारा, निवारा छान.