अतोनात तिटकारा येतो

अतोनात तिटकारा येतो
घुसमटल्यावर वारा येतो !

सादर करते माफीनामा
खाली त्याचा पारा येतो

वादळात हरवू दे नौका
केव्हातरी किनारा येतो

रोज पहाटे स्वप्नांमध्ये
तो साराच्या-सारा येतो

त्याच्यावर मिसरा सुचताना
मोरपीशी शहारा येतो

मन आवरते दिवसाढवळ्या
रात्रीतून पसारा येतो

तो गेलेल्या रस्त्यालाही
अश्रूंचा भपकारा येतो

मिटवत जाते एक समस्या
प्रत्यय तोच दुबारा येतो

आदर्शांवर चाल जरासे
मागोमाग दरारा येतो

-सुप्रिया.

गझल: 

प्रतिसाद

घुसमटल्यावर वारा येतो - ही ओळ आवडली फार!

मोरपीस - असा शब्द असावा. त्याचे पीसी की पीशी की आणखी काय ह्याबद्दल शंका आहेत.

अश्रूंचा भपकारा ही संकल्पना नवीन असली तरी मनाला तितकीशी पटली नाही.

गझलेचा शेर ही 'न्यूजरीडींग' असल्याचा फील हल्ली अनेकांच्या गझलांतून येतो. ह्या गझलेतले काही शेर तसे वाटले.

कमी अधिक बोललो असल्यास क्षमस्व!

वादळात हरवू दे नौका
केव्हातरी किनारा येतो
वा.

अश्रूंचाही भपकारा येतो
वा.

>>>>मोरपीस - असा शब्द असावा. त्याचे पीसी की पीशी की आणखी काय ह्याबद्दल शंका आहेत.

कृपया तज्ञांनी शंकानिरसन करण्यास मदत करावी. :)

>>>>गझलेचा शेर ही 'न्यूजरीडींग' असल्याचा फील हल्ली अनेकांच्या गझलांतून येतो. ह्या गझलेतले काही शेर तसे वाटले.

न्यूजरीडींग' असल्याचा फील म्हणजे नेमके काय हे नेमक्या शेरांसकट स्पष्ट केल्यास समजून घेण्यास सुलभ होईल.

अवांतर-

>>>>हल्ली अनेकांच्या गझलांतून येतो.

कमी अधिक बोलले असल्यास क्षमस्व!

धन्यवाद !

-सुप्रिया.

माफ करा, वरील प्रतिसाद नीट्सा उमटला गेला नाही.
अवांतर-

>>>>हल्ली अनेकांच्या गझलांतून येतो.

हे इथे नमूद करण्यापेक्षा ज्या त्या गझलेखाली लिहिल्यास 'लेकी बोले सुने लागे' या प्रकाराने नवोदितांचे खच्चीकरण होण्यापेक्षा गझलेलेचे उदात्तिकरण होण्यास एकूणात मदत होईल अस आपल प्रांजळपणे वाटत आहे.

कमी अधिक बोलले असल्यास क्षमस्व!

धन्यवाद !

-सुप्रिया.

कृपया तज्ञांनी शंकानिरसन करण्यास मदत करावी. :)>>> सहमत.

न्यूजरीडींग म्हणजे - हे असे असे झाले आणि ते तसे तसे झाले. उदाहरण द्यायचे नव्हते पण आपल्या आग्रहाखातर देत आहे,

सादर करते माफीनामा
खाली त्याचा पारा येतो... घडलेल्या घटनेचा तपशील देणे हा गझलेचा शेर होऊ शकत नाही.

अवांतर->>>>हल्ली अनेकांच्या गझलांतून येतो.>>> समस्त आंतरजालावर जसे एम्बी, एफ्बी आणि आता एस्बीही सारख्या संकेतस्थळावरील गझला पाहिल्यास म्हणणे लक्षात येऊ शकेल.

प्रतिसादांवर(कुणाच्याही) विचार केला गेल्यास नवीन काहीतरी सापडते असा आपला एक अनुभव!

तो गेलेल्या रस्त्यालाही
अश्रूंचा भपकारा येतो

व्वा

वादळात हरवू दे नौका
केव्हातरी किनारा येतो

आदर्शांवर चाल जरासे
मागोमाग दरारा येतो

हे शेरही आवडले. गझल छान!

>>>>न्यूजरीडींग म्हणजे - हे असे असे झाले आणि ते तसे तसे झाले. उदाहरण द्यायचे नव्हते पण आपल्या आग्रहाखातर देत आहे,

सादर करते माफीनामा
खाली त्याचा पारा येतो... घडलेल्या घटनेचा तपशील देणे हा गझलेचा शेर होऊ शकत नाही.

मुळात या शेरातून घडलेल्या घटनेचा तपशील दिला गेलेला नसून ही एक आयुष्यभर, पिढ्यानपिढ्या होत राहणारी प्रक्रिया अतिशय खेदाने नमूद केलेली आहे.

>>>प्रतिसादांवर(कुणाच्याही) विचार केला गेल्यास नवीन काहीतरी सापडते असा आपला एक अनुभव!

सर्वकश अनुभव !!

धन्यवाद !

-सुप्रिया.

मुळात या शेरातून घडलेल्या घटनेचा तपशील दिला गेलेला नसून ही एक आयुष्यभर, पिढ्यानपिढ्या होत राहणारी प्रक्रिया अतिशय खेदाने नमूद केलेली आहे.

>>>
सुप्रियाजी,

आपण चर्चेस उत्सुक दिसत आहात म्हणून आणखी थोडे लिहितो,

शेराच्या कुठल्याही शब्दातून खेद व्यक्त होत नाहीये तेव्हा वाचकाला कसे कळणार? उपरोध, खेद, तिरकसपणा ह्या गोष्टीही शेरातून वाचकापर्यंत पोहोचतील अशा अंदाजात मांडता येऊ शकतात हे आपल्याला अनेक गझला वाचून लक्षात येईल.

दोन्ही ओळी जशाच्या तशा वाचल्यास हा शेर केवळ घडलेल्या(घडणार्‍या म्हणा हवे तर) घटनेचा तपशील देणारा वाटत राहतो. कवीच्या मनातली पार्श्वभूमी ताडण्यासाठी दुर्दैवाने अजून काही निर्माण झालेले नाहीये.

असो, प्रतिसाद सकारात्मकतेने घ्याल ही अपेक्षा.

आपण नवोदित नाही आहात हेही नमूद करतो :)

विजय पाटील ह्यांनी नमूद केलेला शेराबद्दल माझेही तेच मत झाले आहे. तो शेर फार सपाट आहे.छोट्या वृत्ताची अडचण आहे, असे म्हणता येईल.

मिटवत जाते एक समस्या
प्रत्यय तोच दुबारा येतो

आदर्शांवर चाल जरासे
मागोमाग दरारा येतो

ह्या शेरांबाबतही कमीअधिक तेच. रात्रीतून पसारा, वारा, किनारा, अश्रंचा भपकारा हे शेर छान. ۔मोरपीशी कानाला खटकते. असो. तुम्ही बऱ्याच वर्षांपासून निगुतीने गझललेखन करताहात. तुम्हाला निदान नवोदित म्हणता येणार नाही. असो. चूभूद्याघ्या.

विदिपाजी,

प्रतिसाद सकारात्मक घेण्याच्या बाबतीत आपण कायम निश्चिंत रहावे. परंतु दुर्दैवाने आपल्या वरील प्रतिसादाशी मी अंशतः सहमत होवू शकत नाही आहे कारण अतिव वेदना, खेद, तिरकसपणा शेरातून प्रतित झालेला कळण्यासाठी ठराविक शब्दांचीच नाही तर तो कळण्याच्या ठराविक मानसिकतेची जास्त गरज असावी.

मी स्वतःला नवोदित म्हणत आहे कारण दर्-दिवशी बरेच काही शिकत आहे इथे या गझलेच्या क्षेत्रात.

असो !

आपणही सकारात्मकता दाखवाल ही अपेक्षा.

-सुप्रिया.

चिंतरंजनजी,

कुठल्याही अनुमानाला येण्याआधी आपल्या मौल्यवान मतांचा नि त्या अनुषंगाने विदिपांच्या मतांचा पुनश्चः विचार करून पहाते.

धन्यवाद !

-सुप्रिया.

कारण अतिव वेदना, खेद, तिरकसपणा शेरातून प्रतित झालेला कळण्यासाठी ठराविक शब्दांचीच नाही तर तो कळण्याच्या ठराविक मानसिकतेची जास्त गरज असावी.>>>

रागावू नका, पण हे मत घाईचे असावे असे वाटत आहे. वाचणार्‍याला कवीच्या मनस्थितीत नेते ती प्रभावी कविता असे मला वाटत आले आहे कायम.

आपण अधिक विचार कराल तर खरोखरच आपल्या लक्षात येईल. किंवा आणखी काही संपर्कातल्या(इझिली अ‍ॅक्सेसिबल) तज्ञांशी चर्चा केल्यास उत्तम!

खरे आहे, चित्तरंजन ह्यांच्या मतांच्या अनुषंगाने जर माझ्या मतांचा विचार केला गेला तर कदाचित नवीन डायमेन्शन लाभेल.

'येतो' अशी रदीफ असल्याने वृत्तांत वाचत असल्यासारखे मलातरी वाटले नाही . आला /आली अशी रदीफ असती तर वाटले असते बहुधा . त्यामुळे तज्ज्ञांची मते पटली नाहीत क्षमस्व
'विधानात्मक' असे तर म्हणायचे नसेल ना तज्ज्ञांना ..? पण तसेही फारसे वाटत नाही

सादर करते माफीनामा
खाली त्याचा पारा येतो

सरळसोप्पा चांगला शेर आहे की !! मला वाटते हा शेर समजून घेताना यातले कथानक आधी समजून घ्यावे लागेल .तेही साधेसोपे आहे अनेकदा प्रत्ययाला येणारेही आहे शेरात एका स्त्रीचे मन उलगडण्याचा प्रयत्न झालेला आहे .त्याचा पारा खाली यावा म्हणून माफी तिलाच मागावी लागते ह्या बाबीकडे त्त्या स्त्रीची वेदना म्हणून पाहाता येते आहे
थोडक्यात शेरातला फेमेनाइनपणा अनुभवता आला पाहिजे !!!!!...इतके झाले की शेर सार्थकी लागेल बस !! जास्त काथ्याकूट आपोआपच बिनउपयोगी ठरावा असे वाटते!

सपाटपणा व शेरातून बातमी देणे ह्या दोन पूर्णपणे भिन्न बाबी आहेत. 'खाली त्याचा पारा येतो' हा शेर सपाट आहे हे मलाही वाटते, पण त्याबाबतीत वैवकु ह्यांनी नोंदवलेली मतेही महत्वाची आहेत असे माझे मत. ती मते:

१. (वैवकुंचे पहिले मत) शेर वाचताना त्याचे कथानक आधी समजून घेण्याचा प्रयत्न करणे - हे अनेक प्रथितयश शायरांच्या शेरांबाबतही करावे लागते. 'पंखुडी इक गुलाबकीसी है' हा शेर तद्दन सामान्य शेर आहे असे माझे मत आहे. पण नावाचा महिमा! तेथे कोणाला कथानकाची गरज भासत नाही. नांव वाचले की पुरेसे होते. नांव नवीन असले की 'हे हे शेरातून ध्वनीत व्हायला हवे' वगैरे अपेक्षा बळावू लागतात.

२. (वैवकुंचे दुसरे मत) शेरातील स्त्रीत्व समजता यायला हवे - गझल आणि स्त्री ह्या दोहोंमध्ये अजिबात संबंध येऊ न देण्याचे उदात्त कार्य गेल्या काही वर्षांतल्या गझलकारांनी मन लावून केलेले दिसते. पुरुषाने केलेल्या गझलांमध्ये स्त्रीबाबतचे शेर नगण्य प्रमाणात असणे किंवा नसणेच हे जणू श्रेष्ठतेचे लक्षणच! आणि उदाहरण म्हणून ज्यांचे शेर दिले जातात त्या उर्दू शायरांनी मात्र अधिकाधिक शेर 'स्त्रीवरील प्रेम' ह्या विषयावर रचलेले दिसतात. (आता ह्याला कृपया मराठीचा पोत वगैरे म्हंटले जाऊ नये). त्यात पुन्हा स्त्रीने शेर केला की तो वाचताना पुरुषी थाटात आस्वाद घ्यायचा आणि पुरुषाने शेर केला की आपल्यामते जे श्रेष्ठ गझलकार आहेत त्यांच्या शेरांच्या तुलनेत तो शेर इव्हॅल्युएट करायचा. भूमिकांमध्येच लोचा आहे. 'शेर आवडला, नाही आवडला' हे अगदी सहज पटण्यासारखे आहे. बाकीची चर्चा पूर्णपणे व्यक्तीसापेक्ष!

बाकी:

सपाटपणा आणि बातमी दिल्यासारखा शेर असणे ह्या पूर्णपणे भिन्न बाबी आहेत हे पुन्हा लिहितो.

जगातील प्रत्येक शेरात एक बातमी असतेच.

'बातमी' नसलेला फक्त एक मराठी किंवा उर्दू शेर उदाहरणार्थ द्या बरे कोणीतरी?

वैवकुंनी त्यांची मते मराठीतच दिलेली आहेत तेव्हा ती निदान मलातरी समजलेली आहेत त्यामुळे त्यावर केलेले कुठलेही निरुपण माझ्या दृष्टीने अनावश्यक आहे.

प्रत्येकाला त्याचे मत असते तेव्हा ते बदलावे म्हणून शब्दच्छल करत झुंडीच्या झुंडी आल्या तरी ते बदलत मात्र नसते एवढेच नमूद करतो. ते मत पुढेमागे त्या व्यक्तीलाच तपासून पहावे लागते आणि आवश्यक वाटल्यास त्यात बदल करावा लागतो.

असो, गणपती बाप्पा मोरया.

वेगळी चर्चा टाकावी.

वादळात हरवू दे नौका
केव्हातरी किनारा येतो

रोज पहाटे स्वप्नांमध्ये
तो साराच्या-सारा येतो

वरिल दोन शेर लक्षात घेतले तर पहिल्या शेरामध्ये गझलकार क्ष व्यक्तिशी बोलताना व नन्तर च्या शेरमध्ये गझलकार त्या क्ष व्यक्तिविषयी बोलताना दिसतात . येथे विसन्गती वाटत रहाते. एकुण गझलेमध्ये हेच चित्र पहावयास मिळते .एक तर त्याच्याशी बोलणारे अथवा त्याच्याविषयी बोलणारे शेर आले असते तर गझलेत एकजिनशीणा आला असता, गझलेचा बाज खुलला असता, असे वाटते.
माझा अभिप्राय चुकीचाही असू शकेल कदाचित पण जे जाणवले ते लिहिले.

"माझा अभिप्राय चुकीचाही असू शकेल ......"

आपल्या प्रतिसादातील हाच भाग पटला पटिल साहेब ........
.....

धन्यवाद, पण हे आपले वैयक्तिक मत झाले.माझा उद्देश गझलेच्या एकूण भावानुशन्गाने आलेला परस्पर विरोध अधोरेखित करण्याचा होता. एरवी प्रत्येक शेर हा स्वतन्त्र असतोच.

>>>माझा उद्देश गझलेच्या एकूण भावानुशन्गाने आलेला परस्पर विरोध अधोरेखित करण्याचा होता.

Gazal asheehee vachalya jate hye mahitee navhate :)

DHNYWAD !

म्हणजे गझल लिहीण्याचे आहे , तसे गझल वाचण्याचेही तन्त्र अस्तीत्वात आहे तर...
खरे तर हा रसिक मनाच्या वाचकाचा प्रतिसाद आहे, समीक्षकाचा नव्हे.

सादर करणे यात त्या स्त्रीची व्यथा व्यक्त होते आहे.त्याच्यासमोर गीत अथवा नाच सादर केल्यासारखा माफीनामा सादर करून त्याच्या पुरुषी अहंकाराला खुश करून त्याचा पारा खाली आणावा लागतो, नमत घ्यायला लागत स्वत:ची चूक नसतांना असा भाव व्यक्त होतो.बहुतांश स्त्रियांची अशी भावना असू शकते ती या शेरातून मांडली आहे.मला शेराचा आशय व मांडणी आवडली.
ही गझल कोणत्या वृत्तातील आहे?

माफीनाम्याचा शेर सपाट असला तरी उथळ नाही असे मला वाटते. प्रत्येक शेरात काहीतरी चमत्कृती असलीच पाहिजे असे नाही, असे मला वाटते. तरीही, शेरात सांगायचा विचार अगदीच सरळपणे सांगितला तर त्यातली मजा कमी होते असे वाटते. अर्थात, प्रत्येकजण यातून गेलेलाच आहे. त्यामुळे कोणी वैयक्तिक घेण्याचे कारण नाही.

बेफिकीर यांच्यासाठी,
शेरांत जरी काही बातम्या दिसल्या तरी त्या सांगण्याची वेगळी पद्धत असू शकते. तुमच्या म्हणण्यानुसार हे शेर....

पुन्हा भेट घेण्या पुन्हा आठवावे
बसाव्यात गाठी नि गुंते सुटावे

नाही जरूर इतकी हातात हात घ्यायची
स्पर्शातल्या खुणांना हृदयांत गुंतवायची

तुझे नियम कशाला पाळू मी
कुणाकुणास आता टाळू मी

मुखी ओढणी फार ओढू नको
तुझी स्पंदने आज लपवू नको

--- अजय अनंत जोशी
------------------------------------------
दोघेही विश्वासाच्या दरडी कोसळत्या ठेवू
संबंधांचा घाट बंद होणे आवश्यक आहे

--- विजय दि. पाटील
----------------------------------------
मी करावा निवाडा जगाचा किती ?
कौल घ्यावा स्वतःच्या मनाचा किती ?

--- केदार पाटणकर
--------------------------------------
सांग ना देणार कुठवर सावली?
मेघ तो उंडारणारा एकटा

--- चित्तरंजन भट
-----------------------------------------------
बघू कोणते पाउल अंतिम ठरते
कुठे जाउनी सरतो रस्ता पाहू

--- वैभव देशमुख
--------------------------------------------
हसलास किती मज सांग जरा
क्षण एक पुरे जगण्यास खरा

--- मयुरेश साने

धन्यवाद..!

मात्रा वृत्तात आहे गझल.

प्रत्येकाचे मनःपुर्वक आभार.

-सुप्रिया.