मढे मोजण्याला

मढे मोजण्याला

लपेटून फासामधी कायद्याला
ससे वाकुल्या दावती पारध्याला

नको पाडसा आज कळपास सोडू
चुल्ह़ा तप्त टपला तुला रांधण्याला

जवानीत होता उतावीळ श्रावण
अता फ़ागही ना विचारीत त्याला

तुझी आत्मग्लानी वृथा-व्यर्थ आहे
कुणी येत नाही मढे मोजण्याला

करा की नका काम कोणी पुसेना
बिले चोख ठेवा; लुटा आंधळ्याला

इथे देवळाच्या चिखल भोवताली
स्मशाने चकाचक ’अभय’ तालुक्याला

- गंगाधर मुटे "अभय"
=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=

गझल: 

प्रतिसाद

जवानीत होता उतावीळ श्रावण
अता फागही ना विचारीत त्याला
आवडला हा शेर. 'फाल्गुन'साठी 'फाग' हा शब्द वापरला तरी फारसे बिघडले नाही.सहज वाटतो.
इतर शेर ठीक. बरेचसे पुरेसे उमगले नाहीत. वृथा-व्यर्थ खटकले.

भाषेचा वेगळा पोत आणि सामाजिक बांधीलकी दर्शविणारे विषय कवितेतून सातत्याने मांडण्यातली कळकळ हे मुटे ह्यांच्या गझलेतले हुकमी एक्के ह्याही गझलेत अनुभवायला मिळाले.

बाकी शेर त्या तळमळीच्या काही टक्के तरी परीणामकारक झाले असते तर आनंद झाला असता. शेवटचा शेर आवडला असे वाटत असताना त्यात अनावश्यकरित्या तखल्लुस आल्यामुळे रसभंग झाला.

वृथा-व्यर्थ बद्द्ल चित्तरंजन ह्यांनी लिहिलेले आहेच.

'फाग'च्या शेराचा अर्थ मात्र लक्षात येत नाहीये. जवानीत होता उतावीळ श्रावण इथपर्यंत ठीक आहे पण त्याला आता फाल्गुन विचारीत नाही म्हणजे नेमके काय? कुठल्या परंपरेचा संकेत वगैरे आहे का ह्या शेरात? मग जवानी कधी चैत्रात होती का श्रावणाची असे अनेक प्रश्न प्रत्येक शेर वाचताना पडत आहेत. सविस्तर खुलासा झाल्यास आनंद होईल.

धन्यवाद!

चित्तजी धन्यवाद,

(वृथा-व्यर्थ) निष्फळ होऊन व्यर्थ जाते, असे मला साधायचे होते. थेट नाही जमले.
अमर्यादित आशय मर्यादीत शब्दात गुंफताना ओढातान होत आहे, हे मला मान्य आहेच. पण मी अजूनही आशा सोडलेली नाही. यश येईल कधीतरी. :)

विजय दि. पाटील,

मतल्यामध्ये अर्थाचे दृष्टीने संभ्रम व जोडाक्षरी अलामत अशी जमीन तयार झाल्यानंतर तीच जमीन सर्व शेरामध्ये चालविण्याचा प्रयत्न केला. मी स्वतःला थोर/मान्यवर गझलकार समजत नाही, त्यामुळे प्रयोग करून पाहणे धोकादायक वाटत नाही. शिवाय प्रत्येक गझल बहारदार झाली पाहिजे, असेही वाटत नाही.

जेथपर्यंत आशयाचा सबंध आहे, वाचकाला त्याविषयाचा अभ्यास/जाणिव/माहिती असेल तरच आशय कळू शकेल. नाहीतर जो आशय/विचार गद्यात लिहिलेल्या पुस्तकातूनही समजणे कठीण जाते तो आशय/विचार बांधीव गझलेतील एका शेरातून कळेल, असे समजणेही चूकच ठरते.

सर्वांना समजेल असा शेर लिहायचा ठरवला तर सर्वांना माहीत असलेलाच आशय निवडावा लागेल, नाही का?

मुटे,

एकंदरीतच कविता ह्या साहीत्यप्रकाराबद्दल आपल्या मनात अमर्याद गैरसमज आहेत असे आपल्या प्रतिसादावरून दिसून येत आहे. असो, इच्छा असल्यास काहीही बदलू शकते म्हणजे माणूस, कविता, दृष्टीकोन, समजण्याची कुवत इ.इ.

आता आपल्या प्रतिसादावर बोलतो,

मतल्यामध्ये अर्थाचे दृष्टीने संभ्रम व जोडाक्षरी अलामत अशी जमीन तयार झाल्यानंतर तीच जमीन सर्व शेरामध्ये चालविण्याचा प्रयत्न केला.>>> म्हणजे काय?? इतर गझलकार ह्यापेक्षा काय वेगळे करतात? आणि अर्थाचे संभ्रम आणि जोडाक्षरी अलामत ह्याचा काय संबंध?

मी स्वतःला थोर/मान्यवर गझलकार समजत नाही, त्यामुळे प्रयोग करून पाहणे धोकादायक वाटत नाही.>>> कुठल्या महाभागाने हे तुम्हाला सांगीतले? हयाउलट जो सिद्धहस्त असतो तो लीलया प्रयोग करू शकतो. पैजामा धड चढवता येत नाही आणि त्यात अवघडातली अवघड फॅशन पाहिजे असे करायचे नसते.

शिवाय प्रत्येक गझल बहारदार झाली पाहिजे, असेही वाटत नाही.>>> गझलकाराच्या जन्माला येऊन एक शेर तरी तसा व्हावा ही काही फार अपेक्षा नाही.

सर्वांना समजेल असा शेर लिहायचा ठरवला तर सर्वांना माहीत असलेलाच आशय निवडावा लागेल, नाही का?>>> अहो मुटे, तुकाराम, मीर, कबीर ह्या आणि अशा अनेक कवींनी काय लिहिले आहे हे एकदा वेळ काढून वाचा म्हणजे तुमचे हे असले अनावश्यक गैरसमज दूर होतील.

रागावू नका, इन्टेन्शन लक्षात घ्या...पटले तर घ्या नाहीतर सोडून तर द्यायचेच आहे, नाही का?

विजय दि. पाटील,

तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे!
मला आजपर्यंत एकही शेर शेरासारखा लिहिता आलेला नाही आहे, हे तुमचे मत वाजवी आहे.

एकदम एवढे वाद का झाले समजले नाही.

जवानीत होता उतावीळ श्रावण
अता फ़ागही ना विचारीत त्याला

ह्या शेराचा मला लागलेला अर्थ असा की ती व्यक्ती ऐन तारुण्यात असताना श्रावणही त्याच्यासाठी उतावीळ होत असे, पण आता त्या व्यक्तीच्या तारुण्याचा बहर ओसरल्यानंतर तिला फाल्गुनमासही विचारत नाही. तसा फार थेट खयाल आहे. ह्या शेरातून घेण्यासारख्या दोनच गोष्टी आहेत, पहिल्या ओळीतील सहजता व दुसर्‍या ओळीतील 'फाग' ह्या शब्दाचा वापर! शिवाय, तारुण्य (जवानी) हे येथे प्रत्यक्ष तारुण्य, धनसंपत्ती, वलय वगैरे अर्थाने लागू करता येत यावे इतपत सुलभपणे योजलेले आहे. शेरातील खयाल विशेष नाही (उदाहरणार्थ चढता सूरज व इतर काही काव्यामध्ये येऊन गेलेलाच आहे) पण लहजा छान वाटला.

वृथा-व्यर्थ हे वृत्तासाठी झाल्यासारखे आले आहे असे वाटते.

इथे देवळाच्या चिखल भोवताली
स्मशाने चकाचक ’अभय’ तालुक्याला

पहिले दोन शेर विशेष रुचले नाहीत, क्षमस्व!

इथे देवळाच्या चिखल भोवताली
स्मशाने चकाचक ’अभय’ तालुक्याला

इथे देवळाच्या चिखल भोवताली
स्मशाने चकाचक ’अभय’ तालुक्याला

ह्या शेरातील पहिल्या ओळीत 'इथे देवळाच्या भोवताली चिखल' असा सहज शब्दक्रम घेता न येणे हे वृत्ताच्या बंधनामुळे झालेले दिसत आहे. नेमक्या अश्याच ठिकाणी आपल्या म्हणण्याला सफाईदार बनवायचे असते असे मी शिकलो. उदाहरणार्थ 'इथे देवळाभोवताली गटारे' वगैरे सुलभ व्हावे, कृपया गैरसमज नसावा,म ही दुरुस्ती नव्हे. तरीही मक्ता आवडला. तखल्लुसमुळे शेर कृत्रिम वाटत आहे असे काहीसे मत वर वाचले. मला तर वाटते की तेथे शब्दच नसता तरी (म्हणजे नुसतेच 'स्मशाने चकाचक तालुक्याला' असे असते तरी) ते पुरेसे झाले असते. ह्याचा अर्थ तेथे भरीचा शब्द घ्यावा लागलेला असावा. असा शब्द घेण्याऐवजी एखादा असा शब्द योजणे ज्याने अर्थाला अधिक झळाळी मिळेल किंवा शेर प्रभावी होईल, हे विचारात घेण्याजोगे वाटते.

श्रावणाचा शेर उलगडल्याबद्दल धन्यवाद आणि आभारी आहे बेफि.

>>

नको पाडसा आज कळपास सोडू
चुल्ह़ा तप्त टपला तुला रांधण्याला

हा शेर एकीचे/संघटनेचे महत्त्व विषद करतो. एकटा भटकलास तर तुझा नि:पात करण्यासाठी शत्रू टपूनच बसला आहे, असे सांगण्याचा प्रयत्न आहे.
* * *
लपेटून फासामधी कायद्याला
ससे वाकुल्या दावती पारध्याला

कायद्याची सद्यस्थिती दर्शविणारा शेर आहे. पण मांडणी विचित्र असल्याने शेर संभ्रम वाढवतो. जितका अधिक विचार केला तितका आणखी संभ्रम वाढण्याची शक्यता आहे.
मात्र हा शेर अर्थहीन नाही.

श्रावणाचा शेर उलगडल्याबद्दल धन्यवाद आणि आभारी आहे बेफि.

>>>>> पहिले दोन शेर विशेष रुचले नाहीत, क्षमस्व! >>>>

नको पाडसा आज कळपास सोडू
चुल्ह़ा तप्त टपला तुला रांधण्याला

हा शेर एकीचे/संघटनेचे महत्त्व विषद करतो. एकटा भटकलास तर तुझा नि:पात करण्यासाठी शत्रू टपूनच बसला आहे, असे सांगण्याचा प्रयत्न आहे.
* * *
लपेटून फासामधी कायद्याला
ससे वाकुल्या दावती पारध्याला

कायद्याची सद्यस्थिती दर्शविणारा शेर आहे. पण मांडणी विचित्र असल्याने शेर संभ्रम वाढवतो. जितका अधिक विचार केला तितका आणखी संभ्रम वाढण्याची शक्यता आहे.
मात्र हा शेर अर्थहीन नाही.

इथे देवळाच्या चिखल भोवताली
स्मशाने चकाचक ’अभय’ तालुक्याला

कच्च्या मालाचे शोषण झाल्याने ओसाड पडलेला भूप्रदेश/प्रभाग म्हणजे ’भारत’ आणि ’भारताचे’ शोषण करून विकसित झालेला भूप्रदेश/प्रभाग म्हणजे ’इंडिया’. भारत आणि इंडिया यांच्यातील वाढत्या दरीवर भाष्य करणारा हा शेर आहे.
शेरात ’इथे’ हा शब्द आल्याने वाचकाच्या मनात ’इथे’ म्हणजे नेमके कुठे? व ’तिथे’ म्हणजे नेमके कुठे? हा आणि तसा तुलनात्मक विचार उत्पन्न व्हायलाच हवा. ’इथे’ चा उलगडा शेरात नसला तरी ’तिथे’ म्हणजे तालुक्याला (तालुका पातळीच्या शहरात) हे शेरात अधोरेखीत झालेले आहेच. त्यावरून ’इथे’ म्हणजे नेमके कुठे? हा प्रश्न उलगडायला मदत होते. मग तालुका पातळीच्या शहराची तुलना अन्य कोणत्या प्रभागाशी झालेली आहे एवढेच शोधणे बाकी उरते. देवळाच्या भोवताली चिखल आहे म्हणजे तो भाग अविकसित आहे, एवढा अविकसित आहे की; नागरी वस्ती आणि लोकांची मकाने जाऊ द्या, साक्षात देवाचे देऊळही चिखलाने वेढलेले आहे, एवढे लक्षात आले तर त्याचे उत्तरही अगदी सोपे आणि थेट मिळते.
भारत ओसाड व भकास असल्याने देवळेसुद्धा भकास झाली आहेत. मंदीरात जाणारा रस्ताही चिखलाने व्यापला आहे; मात्र इंडियातील तालुक्यासारख्या शहरातील स्मशानेसुद्धा चकाचक आहेत आणि हे आपोआप घडलेले नाही तर शहरातील स्मशानघाटांना सुद्धा शासकिय "अभय" आहे, अभय आहे म्हणून अनुदान आहे, अनुदान आहे म्हणून निधी आहे...... म्हणून स्मशाने चकाचक आहेत.

असा अर्थ वरील शेरातून काढता आला तरच शेर कळेल. या अर्थाव्यतिरिक्त दुसरा कुठलाच अर्थ शेरातून स्पष्टपणे निघत नसल्याने, परिणामत: शेराचा अर्थच न लागल्याने शेरच चुकला आहे, असे कुणाला वाटले तर ती चूक म्हणता येणार नाही.

आशय विषय पोचले व पटलेही पण एकंदर सफाई अजून पाहिजे होती
मला तुमचे अनेक शेर अनेकदा कोरडे वाटतात . ओलावा म्हणा किंवा आर्तता जास्त जाणवत नाही
आणि माझी तितकी पात्रता नसतानाही मला असे म्हणावेसे वाटत आहे की केवळ शेर करणे हे शायराचे काम नाही ते चांगले करणे अधिक चांगले करणे हे त्याचे काम आहे तर गझलकाराचे काम फक्त चांगले शेर करणे नसून अख्खी गझल चांगली करणे हे आहे

आपल्याला ही बाब महत्त्वाची वाटल्यास तसा विचार /प्रयत्न करू शकता

बाय द वे तशीही आपली एक शैली स्वतःची असते ही बाब मला आवडते

धन्यवाद सर

@वैवकु,
प्रथम एक बाब ध्यानात घ्या. मी जो आशय हाताळू पाहतो, तो आशय जसाच्या तसा घेऊन शेर रचणे, त्यातल्यात्यात सफ़ाईदार, आकर्षक, बांधीव, गोटीबंद शेर रचणे हे काम अशक्य असेल. म्हणून तर आजवर या नेहमीच्या आशयाला कोणी शिवायचा देखील प्रयत्न केला नाही. नाहीतर मला कशाला लिहावे लागले असते?

चला आपण या निमित्ताने सर्वांना (अर्थात ज्यांना माझा शेर अधिक सफ़ाईदार असायला पाहिजे होते, असे वाटते त्या सर्वांना) आव्हान देऊयात की वरील गझलेच्या जमीनीत खालील आशय घेऊन एक गोटीबंद शेर रचून दाखवावा. त्यासाठी चक्क २४ तासाचा अवधी देऊयात. कुणी जर चांगला आणि गोटीबंद शेर रचून दाखवला तर माझ्यासाठी ते आदर्श मॉडेल ठरेल.

* * * * *
कच्च्या मालाचे शोषण झाल्याने ओसाड पडलेला भूप्रदेश/प्रभाग म्हणजे ’भारत’ आणि ’भारताचे’ शोषण करून विकसित झालेला भूप्रदेश/प्रभाग म्हणजे ’इंडिया’.

"भारत" ओसाड व भकास असल्याने देवळेसुद्धा भकास झाली आहेत. मंदीरात जाणारा रस्ताही चिखलाने व्यापला आहे; मात्र इंडियातील तालुक्यासारख्या शहरातील स्मशानेसुद्धा चकाचक आहेत आणि हे आपोआप घडलेले नाही तर तालुक्यारख्या शहरांना व शहरातील स्मशानघाटांना सुद्धा शासकिय "अभय" आहे, अभय आहे म्हणून अनुदान आहे, अनुदान आहे म्हणून निधी आहे...... म्हणून स्मशाने चकाचक आहेत.

"इंडिया"ला शासनाचे अभय आहे म्हणून तिथे स्मशाने चकाचक आहेत. "भारत" बेवारस आहे म्हणून इथे सारं काही बकाल आहे.
* * * * *

मुटेसर काय हे आपण अश्याप्रकारचा हट्ट धरणे अत्यंतच बालिश वाटले असो माझ्याकडे जरा वेळ होता म्हणून मी प्रयत्न करून पाहत आहे अन्यथा अश्या आव्हानाना गझलेत थारा अजिबात दिला गेला नाही पाहिजे

स्मशान लखलखणारे बनले देवालयी अवस झाली
पॉश इंडियामध्ये भारतमाता बेवारस झाली

वैवकु,
काय केलंत आपण हे. जरा माझा प्रतिसाद नीट वाचा की राव!

वरील गझलेच्या जमीनीत खालील आशय घेऊन एक गोटीबंद शेर रचून दाखवावा.

असे स्पष्टपणे लिहिलेय मी.
सफ़ाईदार शेर लिहिण्याच्या नादात/छंदात/फ़ंदात आशयाची ऐशीतैशी होऊ नये, तेच तर हट्टाने मांडलेय मी!

I have failed to understand the whole issue, this is my new learning about this thred,

@बेफि,
यात विशेष काही नाही. गझलेकडे तुम्ही वेगळ्या दृष्टीकोणातून पाहतो, मी वेगळ्या.
साहित्याबद्दल तुमचा दृष्टीकोण वेगळा, माझा वेगळा.

कालचे माझे फ़ेसबूक स्टेटस असे होते.
____________________________________________
वास्तव हे वास्तव असते आणि ते अगदी वास्तवासारखंच असते.
ते ऐर्‍यागैर्‍याच्या मर्जीनुसार ओबडधोबड नसते,
ते कलाकाराच्या मर्जीनुसार सुबक अन रेखीव नसते,
ते साहित्यकाराच्या मर्जीनुसार मनोरंजक नसते,
ते कवीच्या मर्जीनुसार कल्पनातीत नसते,
ते गझलकाराच्या मर्जीनुसार गोटीबंद नसते,
.
.
ते केवळ वास्तव असते, जसं असते तसंच असते!!
_____________________________________________

https://www.facebook.com/gangadharmute
इथे पाहता येईल.

पटलेच पाहिजे, असेही नाही.

ओके ओके आता मुद्दा नीट समजला असे वाटते
तुमच्या मागणीप्रमाणे शेर नाहीच झाला त्याबद्दल क्षमस्व

धन्यवाद मुटेसर