आपले रडणे....एक रसग्रहण
आसवे म्हणजे कवन आहे जणू
आपले रडणे सृजन आहे जणू
-कविता शब्दांची असते. पहिल्या ओळीत आसवांना कवन म्हणून गझलकार दोन पातळ्यांवर अर्थसूचन करतो. एक म्हणजे आसवे स्वतः एक कविता आहेत. (साध्य). दुसरी पातळी म्हणजे, आसवांमुळेच एक कविता तयार होत आहे. (साधन).दुस-या ओळीमधून गझलकार असे सांगतो की, या आसवांच्या कवितेमुळे जे रुदन तयार होत आहे त्यात निर्मितीक्षमता आहे. गझलकार दुःख व्यक्त करून थांबत नाही. कहाणीचा तो अंत आहे, असे मानायला तो तयार नाही. उलट, त्यातूनही नवीन काही निघू शकेल अशी आशा व्यक्त करतो. रडणे ही हतबलता, असे मानण्याच्या मानसिकतेला गझलकार चांगलाच छेद देतो आणि व्यथेकडे नव्या दृष्टीने पाहायला लावतो.
एक होणे हे असे माझे-तुझे
सर्व पापांचे पतन आहे जणू
-आपण दोघे जर एक झालो तर माझ्या, तुझ्या किंवा आपल्या सर्व पापांमधून अनुक्रमे माझी, तुझी किंवा आपली मुक्ती होईल, असा आशय या शेरातून व्यक्त होतो. कोणतीही दोन मने जुळली तर कडवटपणा निघून जाऊन केवळ स्वच्छता उरेल, हा ओळींचा आशय आहे.
अद्वैताच्या ईश्वर-भक्त, प्रियकर-प्रेयसी अशा दोन प्रमुख पातळ्यांवर अर्थसूचन होते. या दोन पातळ्यांव्यतिरिक्त एखादी तिसरीही जोडी शक्य आहे आणि येथे वाचकाने स्वतःच्या जीवनाच्या संदर्भात अर्थ लावणे अपेक्षित आहे...
पांढरा ढग हिंडतो आहे असा
फार या गगनी वजन आहे जणू
- ढगाला कोणत्याही मानवप्राण्याने हात लावलेला असण्याची शक्यता नाही. लावलाच असेल तर त्याचे स्वरुप निश्चित सांगणे कठीण होईल. सर्वसाधारणपणे, ढग हलका असतो असा माणसाचा समज असतो. तो सरळमार्गी असतो अशीही एक ध्यानात न येणारी समजून मनात असते. हे समज निरुपद्रवी असल्याने त्यात बदल करण्याची कोणाची इच्छा नसते. येथे कवी ढगाचे तो-यात हिंडणे सुचवून त्याच्याबदद्लचे हे समज निकालात काढतो; शिवाय, आकाशात त्याचे वजन आहे म्हणूनच त्याला इतका तोरा आहे असा व्यत्यास मांडतो. वजन असण्याचा लौकिकार्थ निसर्गात वापरून कवी अर्थाची उंची गाठतो. ढगाला वजन असणे, हा विचार वाचकाला विचारात पाडतो.
केवढी ही श्वापदे माझ्यामधे !
एक मी आदीम वन आहे जणू
-माणसाला एक शरीर व एक आत्मा असतो. एका माणसाच्या शरीरात तार्किकदृष्ट्या एकच श्वापद राहू शकेल. संतांनी षड्रिपूंची नोंद केलेली असली तरी प्रत्यक्षात माणसाच्या मनोकायेत अनेक दोष असू शकतात आणि त्यांची संख्या Permutations and Combinations होऊन खूप वाढलेली असू शकते. अनेक दोषरूपी श्वापदे असणारी मानवी काया एखाद्या निबीड बनापेक्षा निराळी नाही.
श्वापद हा शब्द दोष याच अर्थाने घेण्याची गरज नाही. नैसर्गिक प्रेरणा हा अर्थही आणि किंबहुना तोच अर्थ शेराच्या संदर्भात अचूक असावा. नैसर्गिक प्रेरणांना दोष समजले जाऊन, त्यांना पैलू पाडले जाऊन कालौघात सुसंस्कृत केले गेले आहे. आदिम काळातील नैसर्गिक प्रेरणा नव्या शतकातही माझ्यात आहेत आणि या अर्थाने माझ्यात एक आदिम वन दडलेले आहे, असे कवी म्हणतो. केवळ त्याच्यात नाही तर सर्वांमधे ते आदिम वन आहे, असा सरळ ध्वनी शेरातून ऐकू येतो.
एक आशयघन शेर. अर्थाचे दुहेरी तिहेरी पदर सरळ शक्य दिसतात. एक अर्थ ध्यानात येता येता दुसरा येऊन डोळे मिचकावतो.
आदिम शब्दात पहिली वेलांटी आहे पण गझलेच्या सोईसाठी गझलकाराने दुसरी वेलांटी दिलेली आहे. शेर कसदार असल्यामुळे या बाबीकडे दुर्लक्ष केले जावे.
पार दु:खाच्या निघाले दु:ख हे
पार गगनाच्या गगन आहे जणू
- एका सरळ कविकल्पनेतून कवी भरपूर दुःख आहे, हे सांगत आहे. दुःखाच्या पलीकडे काहीतरी असणे, ही कल्पना सामान्य बुध्दीला करता येत नाही. दुःखानंतर सुख व सुखानंतर दुःख ही आकलनीय कल्पना आहे. कवी म्हणत आहे की, इतके मोठे दुःख आहे की ते दुःखाच्याही पलीकडे चाललेले आहे. जणू काही आणखी एखादे आकाश या दिसणा-या आकाशाच्या पलीकडे आहे. साहित्यात दुःखाची बरेचदा खोलीच दर्शविली जाते पण येथे कवीने आकाशाची प्रतिमा योजून व्यापकता, अपरिमितता दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे.
इतर शेरांच्या तुलनेत किंचित डावा असा शेर आहे.
ओरखडणे वाटते घावापरी
खूप मी केले सहन आहे जणू
-खूप वेदना सहन केल्याचा संदर्भ असलेल्या शेरांमध्ये सहसा मनाच्या निबरतेकडे कल अधिक असतो. मन निबर होण्याऐवजी कोमलच झालेले आहे. साधा ओरखडाही कवीला त्याला घावाप्रमाणे वाटतो. ओरखड्याची चाहूल लागताच घावाचा परिणाम ध्यानात आल्यामुळे मन अधिक जागृत होऊन स्वतःचा संकोच करून घेते, कोमल होते. येथे अर्थ अपेक्षेपेक्षा भलतीकडे जातो. तार्किकदृष्ट्या गोंधळात टाकणारा पण मुद्दा विचाराधीन ठेवल्यास शेराचा अर्थ सुलभ होऊ शकतो.
सूक्ष्म भावनेचे चित्रण करणारा हा अर्थचमत्कृतीयुक्त शेर आहे.
बेडकांच्या चालल्या चर्चा किती
फार हे डबके गहन आहे जणू
- पावसाळ्यात बेडकांचे डरावणे सुपरिचित आहे. त्यांचा आवाज, विशेषतः पावसाळ्यात, इतका मोठा असतो की, निसर्गातील इतर कोणताही सजीव इतका मोठा आवाज करीत नसावा, अशी शंका यावी. त्यांची भाषा माणसाला कळत नसल्याने त्यांचे ओरडणे निरर्थक वाटते. कवीने यासंदर्भातील दुसरी शक्यता आपलीशी केलेली आहे. बेडकांची भाषा आपल्याला कळत नसली तरी त्यांना नक्कीच कळते आणि ज्या चिकाटीने ते ओरडत बसतात त्या अर्थी ते एखादी अर्थपूर्ण चर्चा करीत असावेत, असा कविकयास आहे. डबक्याच्या जवळपास बसूनच ते ओरडत असल्याने बहुधा पाण्याने भरलेल्या डबक्याबद्दलच खोलगहन चर्चा करीत असावेत, अशी कल्पना कवी करतो. चर्चेतील गहनतेला असणा-या खोलीचा डबके या पाण्याशी संबंधित घटकाशी संबंध गझलकाराने अतिशय चपखलपणे दाखविलेला आहे.
झाड आंब्याचे दिसेना एकही
जन्म हा बाभूळबन आहे जणू
- एक सरळ कविकल्पना. बाभूळीचे झाड काट्यांचे असते. आंब्याचे झाड फुलांचे नसते पण त्याला रसाळ आंबे लगडलेले असतात. बाभळीच्या एकाच झाडाला खूप काटे असतात, अनेक झाडे असलेले बन तर नक्कीच त्रासदायक असते. कविकल्पनेत स्वतःचा जन्म इतका वेदनांनी भरलेला आहे की, ते जणू एक बाभूळबन आहे. जन्मात एकही आंब्याचे झाड नाही म्हणजेच गोडवा नाही म्हणजेच सुख नाही.
आधीच्या शेरांमधे तीन अक्षरी काफिये आहेत. या शेवटच्या शेरात पंचाक्षरी काफिया आहे.
‘आहे जणू’ या रदीफेमुळे कदाचित असण्याची शक्यता वरपांगी वाटते पण नीट लक्षात घेतले तर कळेल की, रदीफेत मध्ये गर्भित आत्मविश्वास आहे. 'आहे जणू' म्हणजे 'जणू' नसून 'नक्कीच' आहे.
गझलेत मनोव्यापारांपेक्षा निसर्गप्रतिमांचा अधिक वापर झालेला आहे. ही एक नीटस जन्माला घातलेली आणि जोपासलेली गझल आहे.
प्रतिसाद
चित्तरंजन भट
रवि, 25/05/2014 - 11:55
Permalink
केदार, सुरेख लेख. फार आवडला.
केदार, सुरेख लेख. फार आवडला. गझलेचे सौंदर्य छान उलगडून दाखवले आहे.
केदार पाटणकर
मंगळ, 27/05/2014 - 13:14
Permalink
चित्तरंजन, आभार.
चित्तरंजन, आभार. तुझ्यासारख्या जाणकारांकडून अशाच शाबासकीची अपेक्षा असते.
वैभव देशमुख
मंगळ, 27/05/2014 - 14:01
Permalink
खूप खूप धन्यवाद केदारजी...
खूप खूप धन्यवाद केदारजी... रसग्रहण फार आवडले. अर्थाचे काही नवे पदर आपल्या रसग्रहणामुळे उलगडले. पुन्हा एकदा आभार...
ज्ञानेश.
मंगळ, 27/05/2014 - 22:30
Permalink
एका सुंदर गझलेचे तितकेच सुंदर
एका सुंदर गझलेचे तितकेच सुंदर रसग्रहण ! लेख आवडला.
मात्र मला ’पांढरा ढग’ आणि ’बेडकांच्या चर्चा’ या दोन शेरांमध्ये एक उपहास जाणवला. पांढरा ढग म्हणजे प्रत्यक्ष वाफच. त्याला तसे काही वजन नसते. (पावसाळी ढग काळे असतात.) तो अशा काही तोर्यात हिंडतो आहे, जणू काही त्याला या गगनात फार वजन आहे. (प्रत्यक्ष तसे काही नाही.) ’वजन’ या शब्दावर इथे श्लेष आहे. स्वत:कडे काही नसतांना फुकाचा तोरा मिरवणार्या प्रवृत्तीवरचे हे भाष्य वाटते.
तसेच बेडकांच्या चर्चा या शेराबद्दल. डबके हे कधीच फारसे खोल नसते. म्हणूनच त्याला डबके म्हणतात. या डबक्याबद्दल इतकी चर्चा सुरू आहे जणू काही ते फार गहन असावे. (हे हल्ली नेटवर फार बघायला मिळते.) बेडकांच्या चर्चा या शेरात एक तीक्ष्ण उपहास जाणवतो, अर्थाच्या या शक्यतेची दखल घेतली जावी असे मला वाटते.
केदार पाटणकर
शनि, 31/05/2014 - 11:31
Permalink
ज्ञानेश, तुझ्याशी मी अगदी
ज्ञानेश, तुझ्याशी मी अगदी सहमत आहे. प्रत्येक शेरात एकापेक्षा अधिक अर्थ दडलेले आहेत. ही गझल अनेक अर्थ आपल्या पोटात घेऊन वावरत आहे.
बेफिकीर
सोम, 02/06/2014 - 21:26
Permalink
Masta rasagrahan!
Masta rasagrahan!
झाड आंब्याचे दिसेना एकही
बेडकांच्या चालल्या चर्चा किती
However, the whole GAZAL and the RASAGRAHAN are respectively enviable and lovable.
-'Befikeer'!
बेफिकीर
सोम, 02/06/2014 - 21:28
Permalink
I have been facing a problem.
I have been facing a problem. I can't write Marathi here. Besides, in my above reply, what I had written about those two lines has not got published.