इथे प्रत्येक जण धुंदीत आहे

इथे प्रत्येक जण धुंदीत आहे फरक कळल्यास इतकासाच कळतो
कुणाला लागते दारू इथे तर कुणी शुद्धीतही कोरा बरळतो

रिकामा वेळ नसतो फारसा पण तरीही वेळ आम्ही काढतो अन्
रितेपण गच्च भरुनी रिक्तहस्ते रिते पेले रिकामे हिंदकळतो

कुणी रेटून नाही येत किंवा कुणी लोटूनसुद्धा देत नाही
रिकाम्या जलद लोकलचा प्रवासी तरी दारात आहे लोंबकळतो

इथे उद्ध्वस्त एकाकीपणाचा असा प्रासाद जंगी बांधला मी
इथे प्रत्येक खण माझ्या व्यथांच्या सुगंधी रोषणाईने उजळतो

कधीपासूनचा हा त्रास आहे तपासावेच आता कान, डोळे
मला गर्दीत बहिऱ्या चालताना असे का वाटते कोणी विव्हळतो ?

कुठे नेईल बेचैनी मनाची, कधी संपेलसुद्धा शोध माझा?
युगांनी माखला रेशीमरस्ता किती इतिहास, वस्त्या वावटळतो

गझल: 

प्रतिसाद

आजच वाचली! मस्तच!

कधीपासूनचा हा त्रास आहे तपासावेच आता कान, डोळे
मला गर्दीत बहिऱ्या चालताना असे का वाटते कोणी विव्हळतो ?

क्या बात है

अत्यंत सुरेख गझल.. सगळेच शेर आवडले.
मुशाय‍र्यात ऐकली होती, आता वाचतांना आणखी बारकावे ध्यानात आले.

"सांग कोठे माणसा.." ही गझलही प्रकाशित करा, चित्तदा.

ज्ञानेशराव,
तुम्ही म्हणता ती गझल प्रकाशित केली आहे.

ज्ञानेशराव,
तुम्ही म्हणता ती गझल प्रकाशित केली आहे.

अत्यंत सुरेख गझल.
सगळेच शेर आवडले.

पुन्हा वाचली... जबरदस्त!!! अजून जास्त आवडली!!! क्या बात है चित्तरंजन! फार छान!