हे फुलांचे उधान झाडांना...

हे फुलांचे उधान झाडांना
एक उरले न पान झाडांना

थांबतो सावलीमधे कोणी
वाटतो हाच मान झाडांना

गूण हा त्या महान झाडांचा
खुटवती ते लहान झाडांना

ऐकती दूरच्या ऋतूंना ते
तीक्ष्ण असतात कान झाडांना

ते न पुसतात जात कोणाची
धर्म सारे समान झाडांना

का अताशा कमी पडे छाया
पाहिजे का दुकान झाडांना

र्‍हस्व होत्या सरी वळीवाच्या
दीर्घ होती तहान झाडांना

- वैभव देशमुख

गझल: 

प्रतिसाद

थांबतो सावलीमधे कोणी
वाटतो हाच मान झाडांना
..........क्या ब्बात!!!!

खूपच छान ,दमदार गझल!!!!

ऐकती दूरच्या ऋतूंना ते
तीक्ष्ण असतात कान झाडांना

का अताशा कमी पडे छाया
पाहिजे का दुकान झाडांना

आवडले...

थांबतो सावलीमधे कोणी
वाटतो हाच मान झाडांना
.
गूण हा त्या महान झाडांचा
खुटवती ते लहान झाडांना

आवडलेत.

सुंदर