..आता नको !




...आता नको !


जिवाचा कुणी यार आता नको !
कुणाचाच आधार आता नको !


नका  आत घेऊ कुणीही  मला...
खुले एकही दार आता नको !


रुकारात होकार देशील का ?
नकारात होकार आता नको !


मला प्यार आहेत काटेकुटे...
फुलांचा मला हार आता नको !


स्वतःचीच विक्री जिथे व्हायची....
असा चोरबाजार आता नको !


सतारीस माझ्या असे वाटते -
पुन्हा तोच झंकार आता नको !


नको भासविश्वातले हे जिणे...
खुळा स्वप्नसंसार आता नको !


मुक्यानेच सारे मना सोस तू...
कशाचीच तक्रार आता नको !


हसू येत आहे अटीचे तुझ्या -
`मजाही मजेदार आता नको !`


तुला वेळ होताच तेव्हा कुठे...?
दिलासे तुझे चार आता नको !


तुझे शाप, उःशाप होतीलही...
मिळाले मला फार...आता नको !


असे काजव्याने म्हणूही नये -
`सभोवार अंधार आता नको !`


- प्रदीप कुलकर्णी




गझल: 

प्रतिसाद

तुझे शाप, उशाःप होतीलही...
मिळाले मला फार...आता नको !

असे काजव्याने म्हणूही नये -
`सभोवार अंधार आता नको !`  हे शेर आवडले..

-मानस६

शेवटचा शेर आवड्ला.

प्रत्येक शेर उत्तम...!

दिलासे, काजवा आणि होकार हे शेर फार फार आवडले!
दार, हार, झंकार - हे जरा predictable वाटले. चू.भू.द्या.घ्या.

वाव्वा! गझल आवडली. सगळेच शेर छान आहेत. पण 'दिलासे', 'होकार', 'तक्रार', 'अंधार' फार फार आवडले.

स्वतःचीच विक्री जिथे व्हायची....
असा चोरबाजार आता नको !

नको भासविश्वातले हे जिणे...
खुळा स्वप्नसंसार आता नको !

- हे शेर खूपच छान आहेत. 'प्यार' हा शब्द ! कसातरी वाटतो. बदलता आला तर!!!
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०