नव्या यमांची नवीन भाषा

नव्या यमांची नवीन भाषा

मला कळाली पुन्हा नव्याने, नव्या पिकांची नवीन भाषा
कठीण मातीत रूजणार्‍या, नव्या बियांची नवीन भाषा

पुन्हा नव्याने नवीन फुटली, अबोलतेला नवीन वाचा
नवीन दृष्टी, नवे इरादे, निरक्षरांची नवीन भाषा

नभात झेपावण्यास देती, ढगांस टक्कर, विजेस चटके
नवीन किलबिल, नवीन कुजबुज, नव्या पिलांची नवीन भाषा

नशीब आहे विचित्र मोठे, कुणास रुजण्यास खडक-धोंडे
कठोर पाषाण भेदणार्‍या, नव्या मुळांची नवीन भाषा

अता मुखातून शोषितांच्या, ज्वलंत हुंकार बोलताहे
नवीन शस्त्रे, नव्या मशाली, अहिंसकांची नवीन भाषा

कुणास बाहूत घेत मृत्यू, विभागतो देह चिंधड्यांनी
यमास थोडी दया न उरली, नव्या यमांची नवीन भाषा

श्रमास मातीत गाडण्याला, नव्या दमाचा विरोध आहे
नवीन शाई, नवे मनसुबे, अभय जनांची नवीन भाषा

गंगाधर मुटे
..................................................

गझल: 

प्रतिसाद

वाह गंगाधरजी वाह
मस्त गझल...

अता मुखातून शोषितांच्या, ज्वलंत हुंकार बोलताहे
नवीन शस्त्रे, नव्या मशाली, अहिंसकांची नवीन भाषा

कुणास बाहूत घेत मृत्यू, विभागतो देह चिंधड्यांनी
यमास थोडी दया न उरली, नव्या यमांची नवीन भाषा

श्रमास मातीत गाडण्याला, नव्या दमाचा विरोध आहे
नवीन शाई, नवे मनसुबे, अभय जनांची नवीन भाषा

मलाही वरील शेर आवडले. नव्या यमांची ही ओळ थोडी बदलायला हवी असे वाटते. गझल उच्चारायला मजा येत आहे.

अभिनंदन व शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

gmmute

नशीब आहे विचित्र मोठे, कुणास रुजण्यास खडक-धोंडे
कठोर पाषाण भेदणार्‍या, नव्या मुळांची नवीन भाषा
या व्यतिरिक्त ही
फोटो खूप काही संदेश देतोय..

गझल छानच.
२ मधिल उल्यातही 'नवीन'हा शब्द २ वेळा चांगला नाही वाटला.

नशीब आहे विचित्र मोठे, कुणास रुजण्यास खडक-धोंडे
कठोर पाषाण भेदणार्‍या, नव्या मुळांची नवीन भाषा
या व्यतिरिक्त ही
फोटो खूप काही संदेश देतोय

असहमत.

काव्यामधील संदेश अमर्याद असतो.
काव्याच्या तुलनेने दृष्य चित्रातील संदेश मर्यादित असतो.

मात्र चित्रातील संदेश आकलन व्हायला काव्याच्या तुलनेने सुलभ असते.

छान गझल.......आवड्ली.

मस्त, छान झाली गझल तुमची

प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद.!