य़ा जगण्याचे...

य़ा जगण्याचे आता मजला कौतुक वाटत नाही
चंद्रही तसा पूर्वीइतका सुंदर भासत नाही

कसली किंमत करता तुम्ही माझ्या त्या नात्याची?
ऐपत नाही घेण्याची, देण्याची दानत नाही!

छोट्यामोठ्या दु:खांचे संचार भोगतो आहे
एकहि आदिम तेजस्वी पण दु:ख झपाटत नाही

रोज विचारु नका तुम्ही मज तिच्या उत्तराबद्दल
इच्छा मजला उरली नाही, तुमची संपत नाही!

बोलत असतो केवळ आम्ही, नाते अबोल अमुचे
(कारण आम्हा त्याची भाषा बहुधा समजत नाही)

जे सुचते ते लिहून जातो, उलटत जातो पाने
जगल्याचे कुठलेच पुरावे मनात ठेवत नाही

गमावण्याचे भय सरता माणूस बेफ़िकिर होतो
जे आहे त्याचीही किंमत बहुधा राहत नाही

अजूनही त्या पत्रांमधली थरथर तशीच आहे
(कविता सुचण्यासाठी बाकी काही लागत नाही)

- नचिकेत जोशी

गझल: 

प्रतिसाद

आनंदयात्री, गझल एकंदर चांगलीच झाली आहे.

जे सुचते ते लिहून जातो, उलटत जातो पाने
जगल्याचे कुठलेच पुरावे मनात ठेवत नाही

वा! अगदी उत्तम.

मतलाही मस्त आहे.

चंद्रही तसा पूर्वीइतका सुंदर भासत नाही

ही ओळ मी
चंद्र तसाही पूर्वीइतका सुंदर भासत नाही
अशी वाचली.

कसली किंमत करता तुम्ही माझ्या त्या नात्याची?
ऐपत नाही घेण्याची, देण्याची दानत नाही!

वरच्या ओळीतले तुम्हीऐवजी दुसरे काही हवे होते असे वाटून गेले

बोलत असतो केवळ आम्ही, नाते अबोल अमुचे
(कारण आम्हा त्याची भाषा बहुधा समजत नाही)

त्याची भाषा म्हणजे कुणाची?

य़ा जगण्याचे आता मजला कौतुक वाटत नाही
चंद्रही तसा पूर्वीइतका सुंदर भासत नाही.....

सुरेख मतला!!!!!!!!

नुसता चंद्रच नाही तर जीवनातल्या इतर गोष्टी सुध्दा पुर्वी सारख्या नाहीत असे
सांगावयाचे असल्याने
'चंद्रही तसा' हेच योग्य ठरते.

जे सुचते ते लिहून जातो, उलटत जातो पाने
जगल्याचे कुठलेच पुरावे मनात ठेवत नाही...
अप्रतिम!!
आपण पान लिहून झाल्यावर पलटतो की उलटतो..मलाही संभ्रम आहे.

अजूनही त्या पत्रांमधली थरथर तशीच आहे
(कविता सुचण्यासाठी बाकी काही लागत नाही)...ये$$$ बात!!!!

एकंदर छान!!!!!

चित्तजी, त्याची म्हणजे नात्याची...
चंद्रही तसा लिहिण्याचे स्पष्टीकरण शाम यांनी दिलेलेच आहे, मी ही तसाच विचार केला होता..

आपले आभार!
शाम, आपलेही आभार! :)

शाम आणि आनंदयात्री,
चंद्रही अयोग्य आहे असे सुचवायचे नव्हतेच. का वापरला आहे ते स्पष्ट होतेच/आहेच. 'चंद्र तसाही' असे मला अधिक अपील झाले. लहजा, अर्थ आणि फोनेटिक्सच्या दृष्टीने.

त्याची म्हणजे नात्याची...

अच्छा. 'त्याची' मुळे थोडा रसभंग झाला. 'तुम्ही' आणि 'त्या' ह्या जोडगोळीमुळेह.

Aapratim Gazal..

Khup Avadali..

जे सुचते ते लिहून जातो, उलटत जातो पाने
जगल्याचे कुठलेच पुरावे मनात ठेवत नाही
मस्त!