अधनंमधनं आनंदाची कडमड आहे

ही जगण्याची तालिम फुटकळ धडपड आहे
पडदा पडला, नाटक बसणे अवघड आहे

देहाचा डोलारा वरती दिसतो भक्कम
आतच आहे ती.....जी काही पडझड आहे

कोणी म्हणती जादू, कोणी काजळमाया
तू करते ते प्रेमच...बाकी बडबड आहे

आई बाबांना काशीला नेण्यासाठी
श्रावणबाळाची कोठे ही कावड आहे?

मी कोणाचे देणे जर का लागत नाही
दारावरती आली कसली झुंबड आहे?

गुरगुरणार्‍या प्रत्येकाचे खपवुन घेतो
कोडे पडते, का इतका मी बथ्थड आहे

सत्ता नुसती दु:खांची ना आता येथे
अधनंमधनं आनंदाची कडमड आहे

निव्वळ ताणत गेले, तुकडा पडला नाही
जीवन हे की केवळ भाकर वातड आहे?

गझल: 

प्रतिसाद

देहाचा डोलारा वरती दिसतो भक्कम
आतच आहे ती.....जी काही पडझड आहे
विजयजी ,फार सुंदर आहे गझल .हा शेर तर जाम आवडला

धन्यवाद कमलाकरजी!!

देहाचा डोलारा वरती दिसतो भक्कम
आतच आहे ती.....जी काही पडझड आहे ...छान

कोणी म्हणती जादू, कोणी काजळमाया
तू करते ते प्रेमच...बाकी बडबड आहे .... छान
म्हणती ऐवजी म्हणते?

मी कोणाचे देणे जर का लागत नाही
दारावरती आली कसली झुंबड आहे? ...खरे आहे

धन्यवाद अजयजी

पहिला, दुसरा आणि शेवटचा फार आवडले.. शुभेच्छा.

धन्यवाद बहर