म्हणालो त्यातले काहीच मी करणार नाही

बनावाला तुझ्या बिल्कूल मी बधणार नाही
डिवच तू पाहिजे तितके, कधी चिडणार नाही

नको लावून घेऊ घोर माझ्या बोलण्याचा
म्हणालो त्यातले काहीच मी करणार नाही

जरासे पाहिले माझ्याकडे आत्मीयतेने
मनाचा घाव का येथे कुणा दिसणार नाही?

मला वगळून जगणे एवढे सोपे नसावे
तशी मुद्दाम ती माझी खबर पुसणार नाही

तुला सांगेन मी केव्हातरी माझी कहाणी
अता दु:खात इतके बोलणे जमणार नाही

जमावाचा कधी झालोच नाही हेच चुकले
कळाले एकट्याने सारखे निभणार नाही

ठरावाला बसावे चांगले ठरवायला, ते
कधी ठरणार नक्की....तेवढे ठरणार नाही

निघालो वल्कले नेसून कडव्या वास्तवाची
अता स्वप्नातही रेशीम कडमडणार नाही

इथे सारेच उत्सुक व्हायला 'कणखर' कधीचे
भला माणूस होण्या एकही धजणार नाही
------------------------------------------------
विजय दिनकर पाटील 'कणखर'

गझल: 

प्रतिसाद

नको लावून घेऊ घोर माझ्या बोलण्याचा
म्हणालो त्यातले काहीच मी करणार नाही
वाव्वा मस्त..

तुला सांगेन मी केव्हातरी माझी कहाणी
अता दु:खात इतके बोलणे जमणार नाही
वा..मस्त

गझल छानच आहे.

तुला सांगेन मी केव्हातरी माझी कहाणी
अता दु:खात इतके बोलणे जमणार नाही.......व्वा

सुंदर गझल. :)

तुला सांगेन मी केव्हातरी माझी कहाणी
अता दु:खात इतके बोलणे जमणार नाही

कणखरजी , छानच गझल व्वा...
फक्त तुमच्या कडून ही गझल ऐकायची राहिली तेवढीच रुखरुख आहे...

सुरेख गझल.

चित्तजी, डॉक, विद्यानंद, मुटेजी

मनापासून आभार आपणां सर्वांचे!!

निघालो वल्कले नेसून कडव्या वास्तवाची
अता स्वप्नातही रेशीम कडमडणार नाही

इथे सारेच उत्सुक व्हायला 'कणखर' कधीचे
भला माणूस होण्या एकही धजणार नाही

वा सुरेख गझल.

प्रशांत

मला वगळून जगणे एवढे सोपे नसावे
तशी मुद्दाम ती माझी खबर पुसणार नाही

खूप खास...
छान कल्पना...

निघालो वल्कले नेसून कडव्या वास्तवाची
अता स्वप्नातही रेशीम कडमडणार नाही

खुप सुन्दर.......

प्रशांत, अमित, तन्मय

मनापासून आभार!

निघालो वल्कले नेसून कडव्या वास्तवाची
अता स्वप्नातही रेशीम कडमडणार नाही
>>>

अप्रतिम!

गझल मस्तच! आज पुन्हा वाचली / ऐकली.