कसे जगावे...?


'कसे जगावे ...?..' प्रश्न एवढा खटकत राही
शरीर माझे, आत्मा माझा झटकत राही


उभा इथे मी आयुष्याच्या तीरावरती..
क्षणाक्षणाची वाळू खाली सटकत राही


शरीर गेले, तरी न त्याची गाथा सरली
जगास अवघ्या सांगत सत्ये भटकत राही


उगाच माझ्या आयुष्याची क्षेमखुशाली...
विचारून तो येता - जाता हटकत राही..!


कुठे कुणाला दिसला का तो ईश्वर सांगा...
..सवाल त्याच्या अस्तित्वाचा लटकत राही..


                              - प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, उदगीर


गझल: 

प्रतिसाद

एक एक शेर म्हणजे १०० नंबरी सोनं आहे प्राध्यापकसाहेब!! वाळू तर केवळ अप्रतिम शेर आहे.

मतल्यात - शरीर आत्म्याला झटकते की आत्मा शरीराला झटकतो - असा जरा गोंधळ उडतो. "माझे" ची द्विरुक्ती  टाळली तर स्पष्ट व्ह्यायला मदत होईल असे वाटते. उदा. "आत्मा माझा या देहाला झटकत राही" किंवा "आत्म्याला हे शरीर माझे झटकत राही" असे काहिसे...

एकूण मस्त गझल. पहिले २ शेर विशेष आहेत!.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
आपणास वाटते तसे दोन्ही अर्थ अर्थातच लागू पडतात. माझे म्हणणे असे की, काय हरकत आहे? एखादा आशय सदोष असेल तर मात्र अवश्य कळवा. शरीर किंवा आत्मा एकमेकांना झटकत राहतात; त्याहून माझा तर आशय असेही सांगत नाही का की 'कसे जगावे?' हा प्रश्नच शरीर आणि आत्मा या दोघांनाही झटकून जातो आहे ? कृपया, कळवावे. धन्यवाद.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

'एक एक शेर म्हणजे १०० नंबरी सोनं आहे ' हे पुलस्ति अगदी माझ्या मनातलं बोलले आहेत.
आपल्या प्रतिभेला दंडवत!

जयन्ता५२