तुझा दोष नाही

तुझा दोष नाही, तुझी चूक नाही
जळाने शमावी अशी भूक नाही

कसे धावते विश्व आश्चर्य आहे
कुणाच्याच हातात चाबूक नाही

लिलावी स्वतःलाच मांडेन म्हणतो
मला मोल माझेच ठाऊक नाही

जरा पाहता रोखुनी, ती म्हणाली
गझल तू करावीस; चेटूक नाही

कशाला कहाणी जगा ऐकवू मी
कुणी एवढा येथ भावूक नाही

जरी मानतो चौकटी काफ़ियांच्या
गझलकार हा कूपमंडूक नाही

-- मी अभिजीत

गझल: 

प्रतिसाद

कशाला कहाणी जगा ऐकवू मी
कुणी एवढा येथ भावूक नाही
वा.

लिलावी स्वतःलाच मांडेन म्हणतो
मला मोल माझेच ठाऊक नाही

वा.

कसे धावते विश्व आश्चर्य आहे
कुणाच्याच हातात चाबूक नाही
छान..
गझल एकंदर छान झाली आहे. तुमच्या ओळी एकंदर गोटीबंद असतात. जळाने भूक भागणे हे जरा नवीनच वाटले. गझल तू करावीस चेटूक नाही ही ओळही छान.

संपूर्ण गझल अप्रतिम.

धन्यवाद चित्तदा..!
धन्यवाद सुप्रिया..!

कसे धावते विश्व आश्चर्य आहे
कुणाच्याच हातात चाबूक नाही

लिलावी स्वतःलाच मांडेन म्हणतो
मला मोल माझेच ठाऊक नाही

अप्रतीम .
दोन्ही शेर खूप आवड्ले.

कसे धावते विश्व आश्चर्य आहे
कुणाच्याच हातात चाबूक नाही

मस्त शेर!

धन्यवाद!

जरी मानतो चौकटी काफ़ियांच्या
गझलकार हा कूपमंडूक नाही

ये ब्बात... बहोत खुब