घावामागून घाव घातले त्याबद्दल आभार..

हिंदीतील एक नामवंत कवी श्री.कुँवर बेचैन ह्यांची एक गझल अलिकडे कविताकोश ह्या वेब-साईटवर वाचण्यात आली.... त्या गझलेतील 'शुक्रिया' हे रदीफ, गझलेतील आशय,शैली, आणि मुख्य म्हणजे साधी भाषा ह्यामुळे ती गझल मनाला भावली..त्यातील काही निवडक शेरांचा भावानुवाद करायचा प्रयत्न केलाय..

 घावामागून घाव घातले, त्याबद्दल आभार

घावामागून घाव घातले, त्याबद्दल आभार.
पाषाणाला शिल्प बनवले, त्याबद्दल आभार.

जागत होतो, म्हणून कामे नवी करु शकलो,
हे निद्रे, तू मला सोडले, त्याबद्दल आभार.

आल्या नसत्या तुम्ही; ह्या शिड्या बनल्या असत्या का?
हे भिंतींनो, तुम्ही अडवले, त्याबद्दल आभार.

आता तर हे विश्वच माझे घर झाले आहे,
माझे घर हे असे जाळले, त्याबद्दल आभार.

दर्द मिळाला की मग कविता बहरून ही येते,
तर मग जे दुनियेने छळले, त्याबद्दल आभार

मनधरणीची कला अनोखी बघा मला आली,
'कुंवर', हे असे रुसून बसले, त्याबद्दल आभार

                           -मानस६
  मूळ गझल इथे  आहे

गझल: 

प्रतिसाद

एका चांगल्या हिंदी रचनेचा परिचय करून दिल्याबद्दल...

आपले आभार व अभिनंदनही.
मात्र गझलेच अनुवाद अवघड असतो हे खरे. एकदा गझल म्हटले की ती तिच्या सर्व वैशिष्ट्यांसहच यावी अशी अपेक्षा असते. भावानुवादातही.