वेळी अवेळी



तू नको येऊ अता वेळी अवेळी
तोल जातो,भेटता वेळी अवेळी


हा खुळा भ्रमर विचारी त्या कळ्यांना!
"का मला बोलावता वेळी अवेळी?"


योजना आहे तुला छेडावयाची
आड येते सभ्यता वेळी अवेळी

सांग मी येऊ कसा स्वप्नात,सखये
हे असे तू जागता वेळी अवेळी

तू कसे जाणून घेशी नेमके,ते
जे न मज ये सांगता वेळी अवेळी


जयन्ता५२



गझल: 

प्रतिसाद

गझल आवडली. त्यातही

योजना आहे(असते हवे का) तुला छेडावयाची
आड येते सभ्यता वेळी अवेळी
वाव्वा!!

सांग मी येऊ कसा स्वप्नात,सखये
हे असे तू जागता वेळी अवेळी
वाव्वा!!

हे दोन्ही शेर मस्तच!  जाताजाता-- दुसऱ्या शेरात भ्रमर ऐवजी भुंगा हवे. भ्रमर वजनात बसत नाही.

सांग मी येऊ कसा स्वप्नात,सखये
हे असे तू जागता वेळी अवेळी

तू कसे जाणून घेशी नेमके,ते
जे न मज ये सांगता वेळी अवेळी

फारच आवडले जयन्ता.

मलाही हे २ शेर फार आवडले!

गझल छानच आहे.
तू कसे जाणून घेशी नेमके,ते
जे न मज ये सांगता वेळी अवेळी ... 'नेमके'नंतर स्वल्पविरामाची गरज वाटत नाही.
सर्वच शेर सुंदर आहेत. चित्तरंजनची सूचना योग्य; पण 'भुंग्या'चे फार अर्थ होतात. 'भ्रमर' हा काव्यात्म शब्द वाटतो. तरीही, वजनात बसणार शब्द आणखी परिपूर्णता आणील यात शंका नाही.
योजना आहे तुला छेडावयाची
आड येते सभ्यता वेळी अवेळी

सांग मी येऊ कसा स्वप्नात,सखये
हे असे तू जागता वेळी अवेळी
हे शेर फारच छान. 'योजना' हा शब्द (आणि भावही ) या गझलेच्या बाजाला गद्य व विसंगत वाटत नाही का ? आशय छानच. गझल छान असल्यामुळे या सूचना फक्त लक्षात असू द्याव्यात. फार मागे लागू नये.
अभिनंदन ! कीप अप् !


प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०